coronavirus: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतंर्गत  येणाऱ्या परिसरात स्क्रिनिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत राज्यात मुंबईनंतर पुणे शहर हॉटस्पॉट ठरले आहे.त्यातही पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत

पुणे - पुण्यात हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतंर्गत येणाऱ्या परिसरात घरोघरी जाऊन आता डॉक्‍टर नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग असणाऱ्या संशयित रुग्णांचे तत्काळ निदान होऊन त्यांच्या चाचण्या करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचा थेट परिणाम उद्रेक कमी करण्यास मदत होईल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत राज्यात मुंबईनंतर पुणे शहर हॉटस्पॉट ठरले आहे. त्यातही पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत या परिसरात महापालिकेकडून सर्व्हे टिम निर्माण करून घरोघरी जाऊन माहिती घेतली जात होती. परंतु गेल्या काही दिवसात या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत रुग्णांची संख्या ही ८५ वर गेली आहे. पुणे शहरातील सर्वाधिक रुग्ण या परिसरातच आढळून आले आहेत. तर आतापर्यंत दगविलेल्या रुग्णांची जास्त संख्या देखील या परिसरातील आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने या परिसरातील प्रत्येक घरात जाऊन डॉक्‍टरच्या मदतीने स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणी दरम्यान आवश्‍यक असेल तर जागेवरच नागरिकांच्या घशातील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी दहा टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य दोन सहकारी यांचा समावेश असणार आहे. त्यासाठी पोलिसांची देखील मदत घेतली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात झोपडपट्टी आणि पेठांचा परिसर आहे. अतिशय दाटीवाटीचा आणि जास्त घनता असलेला हा भाग आहे. त्यामुळेच या भागात विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी महापालिकेकडून आता डॉक्‍टरांना देखील रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी हा उद्रेक रोखण्यास यामुळे मदत होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Screening started in the area under Bhavani Peth Regional Offices in pune