Coronavirus : ‘शांताबाई फेम’ गायक संजय लोंढे धान्यासाठी रांगेत

अनिल सावळे
Wednesday, 8 April 2020

एप्रिल-मेमध्ये तमाशा, लोकसंगीत इत्यादी कार्यक्रमांचा सीझन असतो. मात्र, कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. आज ७ एप्रिलला माझा वाढदिवस असतो. त्यामुळे लोणावळ्यात आयोजकांकडून कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतु तोही रद्द झाला. घरात भाजीपाला आणण्यासाठीही खिशात दमडी नसल्यामुळे डोळ्यासमोर केवळ अंधार आहे. सरकारकडून लोककलावंतांना मदतीचा हात मिळत नाही. मायबाप रसिकांनी आता मदतीचा हात पुढे करावा.
- संजय लोंढे, गायक

पुणे - कोरोनामुळे लॉकडाउन सुरू असल्याने झोपडपट्टीतील गरीब, बेघर मजुरांना अन्नधान्यासाठी झगडावे लागत आहे. त्याचप्रमाणे गरीब लोककलावंतांचीही आता उपासमार होऊ लागली आहे. महाराष्ट्रात आपल्या गाण्यातून धमाल उडवून देणारे ‘शांताबाई’ फेम गायक आणि लोककलावंत संजय लोंढे यांनाही त्याचा फटका बसला आहे. अन्नधान्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ त्यांच्यावरही आली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे शहरातील गरीब नागरिकांना दररोज मुलाबाळांचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न पडत आहे. लोककलावंतांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. काही ठिकाणी गरीब, बेघर मजुरांना अन्नधान्याचे वाटप सुरू आहे. मात्र, मंगळवार पेठेतील राजेवाडी येथील झोपडपट्टीच्या भागात गरिबांना धान्य मिळत नाही, अशी तक्रार तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या फोनवर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेच या ठिकाणी जाऊन धान्याचे वितरण केले. 

धान्य मिळण्यासाठी लागलेल्या रांगेत या भागातील गरजू लोककलावंतांमध्ये गायक, ढोलकी वादक आणि वादकांचा समावेश होता. त्या रांगेत गायक-संगीतकार संजय लोंढे उभे होते. ‘शांताबाई’ या गाण्याने काही वर्षांपूर्वी त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली होती. मात्र, या उपेक्षित लोककलावंताची झालेली सध्याची परिस्थिती पाहून शासकीय अधिकारीही हेलावून गेले.

झोपडपट्ट्यांमध्ये आणि निवारा केंद्रात अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. त्याप्रमाणे गरीब, गरजू लोककलावंतांच्या अडचणीकडे लक्ष दिले जात असून त्यांना तातडीने धान्य, किराणा मालाचे वितरण करण्यात येत आहे. सामाजिक संस्था आणि दानशूर लोकांनी गरीब नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावे.
- तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार पुणे शहर

जगाला हादरवून सोडणाऱ्या ‘कोरोना’पासून वाचण्याचा इतका साधा उपाय आज तरी दुसरा नाही, म्हणूनच... ‘घरातच असा, घरातच बसा’ कुटुंबासोबत...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shantabai fame sanjay londhe in line for grain