पाळीव प्राण्यांची घ्या योग्य काळजी...

सुनील माळी - सकाळ वृत्तसेवा 
Monday, 27 April 2020

प्राण्यांपासून कोरोनाची लागण माणसाला होऊ शकत नाही, त्यामुळे सर्वप्रथम माणसांनी घाबरण्याचे कारण नाही, असे ज्येष्ठ पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. विनय गोऱ्हे यांनी सांगितले.

पुणे - न्यूयॉर्कमध्ये दोन मांजरांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी वाचून प्राणी पाळणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेतली तर, पाळीव प्राण्यांचे आरोग्य आपण चांगले राखू शकतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच, पाळीव प्राण्यांपासून विषाणू माणसामध्ये येण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील ब्रॉन्झ प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीपाठोपाठ आता दोन मांजरांनाही कोरोना झाल्याची बातमी आली आहे. त्यामुळे भारतातील प्राणिप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली. मात्र, योग्य काळजी घेतली तर पाळीव प्राण्यांची प्रकृती आपण ठणठणीत ठेवू शकतो, असा निर्वाळा पशुवैद्यक तज्ज्ञ तसेच, प्राणितज्ज्ञांनी दिला आहे. 

प्राण्यांपासून कोरोनाची लागण माणसाला होऊ शकत नाही, त्यामुळे सर्वप्रथम माणसांनी घाबरण्याचे कारण नाही, असे ज्येष्ठ पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. विनय गोऱ्हे यांनी सांगितले. अमेरिका औषध प्रशासन विभागाने 5 एप्रिलला प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा दाखला त्यांनी त्यासाठी दिला आहे. पाळीव प्राणी हा विषाणू पसरवू शकत नाही तर, माणसाकडूनच माणसाला त्याची लागण होऊ शकते, असे अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्‍शियस डिसिजेसचे संचालक डॉ. अँथोनी फौसी यांनीही स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राण्यांकडून माणसाला कोरोनाची लागण होत नसली तरी पाळीव प्राण्यांना माणसाकडून कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे या प्राण्यांना बाधित व्यक्तींपासून दूर ठेवण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळेच सकाळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याबरोबर पाळीव कुत्र्यालाही नेणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी पाळीव प्राण्याला नेऊ नये, तसेच या प्राण्यांची योग्य ती काळजी घ्यावी. 

श्वान प्रशिक्षक शलाका मुंदडा यांनी सांगितले की,  सध्या संचारबंदीमुळे रस्त्यावर फिरणाऱ्या पाळीव प्राण्यांना अन्न मिळू शकत नाही, त्यामुळे असे प्राणी दिसल्यास त्यांना तुम्ही पाणी तसेच, कोरडे अन्न देऊ शकता. 

अशी घ्या काळजी... 
- प्राण्यांना अंघोळ घालून त्यांना स्वच्छ केल्यानंतर, त्यांना अन्न दिल्यानंतर किंवा हात लावल्यानंतर तुम्ही साबणाने हात स्वच्छ धुवा. 
- प्राण्यांना रोज स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. 
- प्राण्यांना इतर माणसांपासून किंवा बाहेरच्या कुत्र्यांपासून लांब ठेवा. 
- कुत्र्याची निगा राखणारी कुटुंबातील व्यक्ती आजारी असेल तर, कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याने त्याची निगा राखावी. 
- कुत्र्यांसाठी सॅनिटायझर अजिबात वापरू नका, त्यांना त्याचा त्रास संभवतो. 
- प्राणी फिरून आल्यावर त्याचे पंजे साफ करा. 
- प्राण्यांची विष्ठा रस्त्यावर उघडी पडू देऊ नका, तिची योग्य विल्हेवाट लावा. 
- प्राण्याला कसलाही त्रास झाला तर पशुवैद्यकाशी संपर्क साधा. 

विषाणूच्या साथीत मांजरांचा मृत्यू  काही महिन्यांपूर्वी मांजरांमध्ये विशिष्ट विषाणूंची साथ पसरली होती. त्या साथीत पुण्यातली अनेक मांजरे मृत्युमुखी पडली. 
- ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. विनय गोऱ्हे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of your pet in lockdown