Coronavirus : आयटी पार्क परिसरातील गावे स्वयंस्फूर्तीने बंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील गावांमधील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने पुढे येत आपला परिसर बंद ठेवला आहे. माण, मारुंजी, नेरे व जांबे या गावांमधील अंतर्गत रस्ते बंद असल्याने परिसरात शुकशुकाट आहे.

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील गावांमधील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने पुढे येत आपला परिसर बंद ठेवला आहे. माण, मारुंजी, नेरे व जांबे या गावांमधील अंतर्गत रस्ते बंद असल्याने परिसरात शुकशुकाट आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गावांमधील नागरिकांनी सुरक्षेची अधिक काळजी घेत आपला परिसर बंद ठेवला आहे. आयटी पार्कमधील कंपन्या बंद असल्याने मुख्य रस्तेही ओस पडले आहेत. भूमकर चौक, वाकड या परिसरातून आयटी पार्कमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा खडा पहारा असून, मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली आहे. पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. या परिसरात अद्याप कोरोनाचा फैलाव झालेला नाही. त्यामुळे परिसरालगत असणाऱ्या गावांमधील नागरिक अधिक सतर्क झाले आहे. त्यादृष्टीने सर्वांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. विविध कारणांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना पोलिस सोशल डिस्टन्सिंग राखत आहेत. याशिवाय पोलिस ठाण्याच्या मुख्यदाराजवळ सॅनिटायझिंग मशिन बसविले आहे. 

‘साहेब, गावी जायचंय पास मिळेल का?’ 
दुपारच्या कडक उन्हात एक व्यक्‍ती पोलिस ठाण्यामध्ये आला. ‘माझी बायको गर्भवती असून, तिला घेऊन अकोल्याला जायचे आहे. त्यासाठी पास मिळेल का’, अशी विचारणा केली. त्यावर अकोल्याला जाण्यापेक्षा आता घराबाहेर पडण्यात धोका आहे. त्यामुळे सध्या आहात तेथेच सुरक्षित राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages in the IT Park area spontaneously closed