पूजाअर्चा, प्रार्थना घरातच करावी - उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात,  धर्म,  भाषा,  प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावे.  सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याच रात्री असलेल्या "शब्बे बारात'' साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या वर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी घरातच करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केले.

पुणे - कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात,  धर्म,  भाषा,  प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावे.  सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याच रात्री असलेल्या "शब्बे बारात'' साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या वर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी घरातच करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी कॉंग्रेस या संबंधी निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, की राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्‍टर, पोलिस, पालिका कर्मचारी जीव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशनदुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु केला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्‍या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये.

कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, 

यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण  सर्वजण, एकजुटीने, शहाणपणाने, घरातंच थांबून, कोरोनाचे संकट परतवून लावू, असा निर्धार पवार यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worship prayer should be done at home ajit pawar