दिल्लीच्या प्रदूषित हवेची चर्चा 'आयसीसी'मध्येही होणार!

वृत्तसंस्था
Friday, 8 December 2017

भारत-श्रीलंकेमधील कसोटी मालिकेतील तिसरा सामना दिल्लीत झाला होता. या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी 'मास्क' घालून क्षेत्ररक्षण केल्यामुळे दिल्लीतील प्रदूषित हवेचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आला.

दुबई : राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रदूषित वातावरणामध्ये क्रिकेट कसोटी सामन्याचे आयोजन करण्याचा 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळा'चा (बीसीसीआय) निर्णय योग्य होता की नाही, याचे उत्तर शोधण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'ने (आयसीसी) वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली आहे.

भारत-श्रीलंकेमधील कसोटी मालिकेतील तिसरा सामना दिल्लीत झाला होता. या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी 'मास्क' घालून क्षेत्ररक्षण केल्यामुळे दिल्लीतील प्रदूषित हवेचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आला. या कृतीबद्दल श्रीलंकेच्या खेळाडूंवर भारतीय माध्यमे आणि क्रिकेटप्रेमींकडून टीकाही झाली; पण भारताच्या महंमद शमीलाही या प्रदूषणाचा त्रास झाल्याचे समोर आले.

या सामन्याच्या आयोजनाविषयी श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापनाने तक्रार केली होती. या सर्व घडामोडींची दखल घेत 'नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत दिल्लीमध्ये कोणतेही सामने आयोजित केले जाणार नाहीत' अशी भूमिका 'बीसीसीआय'ने घेतली आहे.

येत्या फेब्रुवारीमध्ये होणा-या आयसीसीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार आहे. सध्या खराब किंवा प्रदूषित हवेसंदर्भात आयसीसीचे ठोस नियम अथवा निकष नाहीत. दिल्ली कसोटीतील वादंगानंतर यासंदर्भात नियम तयार केले जाण्याची शक्यता आहे. 'दिल्ली कसोटी कोणत्या वातावरणात झाली, याची दखल आम्ही घेतली आहे. तसेच, भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली, तर काय करावे यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जात आहे', असे आयसीसीने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket news India versus Sri Lanka Delhi Test Delhi Pollution ICC