अश्विन, ईशांतच्या गोलंदाजीने इंग्लंडचे फलंदाज फ्लाॅप

शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या दोन तासांच्या खेळावर भारतीय गोलंदाजांची हुकूमत दिसली. किटॉन जेनिंग्जसह कर्णधार ज्यो रूटची अत्यंत महत्त्वाची विकेट काढणार्‍या अश्विनने इंग्लिश फलंदाजांना सातत्याने प्रश्न विचारले.

एजबॅस्टन : कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या दोन तासांच्या खेळावर भारतीय गोलंदाजांची हुकूमत दिसली. किटॉन जेनिंग्जसह कर्णधार ज्यो रूटची अत्यंत महत्त्वाची विकेट काढणार्‍या अश्विनने इंग्लिश फलंदाजांना सातत्याने प्रश्न विचारले. ईशांत शर्माने तीन फलंदाजांना बाद करून भारतीय संघाचे पहिल्या कसोटीतील आव्हान कायम ठेवले. 

 

उपहाराकरता खेळ थांबला असताना इंग्लंडच्या 6 बाद 86  धावा झाल्या होत्या आणि 99 धावांची एकूण आघाडी झाली. तिसर्‍या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यावर एजबॅस्टनची खेळपट्टी गोलंदाजांना काय मदत करते याकडे लक्ष होते. अश्विनने पहिल्या चेंडूपासून टप्पा बरोबर पकडला. चेंडू मुद्दाम जोरात वळवून तो फलंदाजांच्या मनात शंका निर्माण करत होता. त्याचाच योग्य परिणाम झाला जेव्हा त्याने सलामीचा फलंदाज किटन जेनिंग्जला बाद केले. जेनिंग्ज बाद झाला तो चेंडू भसकन वळला आणि लोकेश राहुलने वेगाने आलेला झेल बरोबर पकडला. 

पहिल्या डावात सुंदर फलंदाजी करणार्‍या ज्यो रूटला अश्विन किंवा शमी जास्त त्रास देऊ शकत नव्हते कारण रूट बरोबर चेंडूजवळ पाय टाकून वाकून फलंदाजी करत होता. मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा जमा करत होता. नव्याने फलंदाजीला आलेला डेव्हिड मलानचे फिरकी खेळायचे तंत्र चांगले नसल्याने जरा घाई करत होता. 

अश्विनने ज्यो रूटला बाद केले तो चेंडूही वळला आणि रूटने मारलेला फटका लोकेश राहुलने पकडला. 14 धावा करून जम बसल्यावर आपला झेल पकडलेला बघून रूटने अगदी डोक्याला हात लावला. दडपण झुगारून नेहमी धावा कशा काढता येतील याचा विचार करणार्‍या जॉनी बेअरस्टोने किल्ला लढवत इंग्लंडची आघाडी 99 पर्यंत पुढे नेली. उपहाराला खेळ थांबायला पाच मिनिटे बाकी असताना ईशांत शर्माने बेअरस्टोला 28 धावांवर आणि बेन स्टोकसला बाद करून कमाल केली.

Web Title: England vs India test series