जो जीता वो सिकंदर (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार हे 'ट्‌वेंटी- 20'चे वैशिष्ट्य 'आयपीएल'च्या अंतिम सामन्यात अनुभवायला मिळाले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे 'आयपीएल'च्या सामन्यांतून भारतीय संघाची पुढची फळी तयार होत असल्याचा दिलासाही मिळाला.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा एका हिंदी चित्रपटात डायलॉग आहे... तुम आपुनको दस मारा, आपुनने तुमको दो मारा.... मगर सॉलिड मारा... यंदाच्या 'आयपीएल'मध्ये मुंबई-पुणे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये असेच काहीसे घडले. तीन सामन्यांत 'पुणे सुपरजायंट'ने 'मुंबई इंडियन्सन'ला पराभूत केले; परंतु अंतिम सामन्यात आणि तेही अखेरच्या क्षणी मुंबईने पंच मारून विजेतेपदाचा करंडक तिसऱ्यांदा उंचावण्याचा पराक्रम केला. 'आयपीएल' कितीही बदनाम झालेली असो किंवा तिच्यामुळे 'बीसीसीआय'मधील प्रशासनात कितीही उलथापालथ झालेली असो; उत्कंठा शिगेस पोचणारे अशा प्रकारचे सामने होत आहेत, तोपर्यंत 'आयपीएल'ची लोकप्रियता कायम राहील. कमालीची उत्सुकता असलेल्या या अंतिम सामन्याने तुमचा इतिहास-भूगोल कितीही पक्का असला, तरी जो निर्णायक क्षणी जिंकतो तोच सिकंदर असतो हे पुन्हा एकदा सिद्ध केले. वास्तविक पाहता संपूर्ण सामन्याचा विचार केला तर 95 टक्के खेळावर पुण्याचे वर्चस्व होते; मुंबईने अखेरच्या पाच टक्‍क्‍यांचा (पाच षटकांचा) जबरदस्त खेळ केला आणि पुण्यासाठी होत्याचे नव्हते केले. हीच तर खरी 'ट्‌वेन्टी-20'या प्रकाराची गंमत आणि महती आहे. तरीसुद्धा जिद्द आणि चिकाटी असली की गमावलेली बाजीसुद्धा कशी पलटवता येते हे मुंबईने दाखवून दिले. विजयासाठी 130 धावा या काही फार नव्हत्या. त्यात याच मुंबईला तीनदा पराभूत केलेले असल्याने पुण्यासाठी तर कठीण नव्हत्याच; पण प्रत्येक धावेसाठी पुण्याला झुंजवायचे याच निर्धाराने मुंबईचा संघ मैदानात उतरला आणि अखेरच्या चेंडूवर मोहीम फत्ते करून विजयाचा करंडक पुण्याच्या हातातून हिरावून घेतला.

खरे तर हा सामना पुण्याने काही षटके राखून जिंकायला हवा होता; हा साखळी सामना असता तर तसे घडलेही असते, परंतु अंतिम सामन्याचे दडपण कसे असते हे या सामन्याने सिद्ध केले. 1983 मध्ये कपिलदेवच्या संघाने 60 षटकांतील 183 ही धावसंख्याही त्यावेळच्या अतिबलाढ्य वेस्ट इंडीज संघासमोर निर्णायक ठरवली होती. वास्तविक पुण्याच्या संघात असे अंतिम सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचाही अनुभव असलेले महेंद्रसिंह धोनी, स्टीव स्मिथ असे दिग्गज खेळाडू होते. तरीही त्यांचा अनुभव कामी आला नाही म्हणजे अशा प्रकारच्या झटपट क्रिकेटमध्ये आदल्या दिवशी तुम्ही किती पराक्रम केला याला महत्त्व नसून त्या दिवशी होणारा तुमचा खेळ हाच निर्णायक ठरतो.

कोण जिंकला, कोण हरला यापेक्षा प्रेक्षकांना अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार अनुभवायला मिळाला. होत्याचे नव्हते होणारे आणि अखेरच्या चेंडूवर निकाल लागलेल्या 'आयपीएल'च्या सामन्यांकडे प्रश्‍नांकित चेहऱ्यांनी पाहिले जाते. त्याला कारणही तसेच आहे. मध्यंतरीच्या सट्टेबाजी आणि स्पॉटफिक्‍सिंग प्रकरणानंतर 'आयपीएल'कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. या स्पर्धेचे हे दहावे वर्ष. प्रत्येक वर्षांत काही ना काही वाद ठरलेलाच; परंतु यंदा सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासन समिती या 'तिसऱ्या डोळ्यां'समोर ही स्पर्धा कोणत्याही वादाशिवाय पार पडली. तरीही कानपूरपासून मुंबईपर्यंत काही सट्टेबाजांची मुद्देमालांसह धरपकड झाली. पण कोठेही सामने फिक्‍स करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे कानावर आले नाही. कोणत्याही वादाशिवाय 'आयपीएल' पार पाडली याचे श्रेय अर्थातच प्रशासन समिती घेईल, 'हे आम्ही अगोदरच करायला हवे होते,' असे सर्वोच्च न्यायालयही म्हणेल. मुंबई जिंकले, पुणे हरले यापेक्षा 'बीसीसीआय'च्या प्रशासनात कोणाची सरशी झाली हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा ठरतो.

'आयपीएल' ही फ्रॅंचाईसींची स्पर्धा. देशादेशांमधल्या स्पर्धा संपून हा पूर्णपणे व्यावसायिक स्पर्धाप्रकार सुरू झाल्यानंतर अस्मिता विरघळून जातील, असे वाटले होते. पण या वेळी पुणेकर आणि मुंबईकरांच्या आपापल्या शहरांच्या अस्मितांना विलक्षण धार आलेली दिसली आणि सोशल मीडियावरून तिचे अनेक आविष्कार उमटले.

आपलाच संघ म्हणून प्रत्येक जण या सर्कशीत उतरत असतो; परंतु या स्पर्धेने देशातील अनेक नव्या ताऱ्यांचा भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदय केला आहे. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह अशी किती तरी नावे घेता येतील. याच हार्दिकचा भाऊ कुणाल ज्याला अजून कोणत्याही राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही, तो अंतिम सामन्याचा मानकरी ठरतो. त्याने किती योगदान दिले यापेक्षा त्याची कणखर मनोवृत्ती आंतरराष्ट्रीय संघात येण्यापूर्वीच पक्की होते. हे भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे. पुणेकर राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, नितीन राणा, ऋषभ पंत असे किती तरी चेहरे या 'आयपीएल'मधून पुढे आले. ऋषभकडे तर धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. विराट कोहलीनंतरही ही नवी पिढी पाठोपाठ तयार होत आहे. ही 'आयपीएल'ची दुसरी बाजू म्हणायला हरकत नाही. 'आयपीएल'च्या या अनुभवाच्या जोरावर काही दिवसांतच इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेत विराट सेना विजेतेपद राखणार काय, हा प्रश्न आता महत्त्वाचा आहे. संघमालकांसाठी जीव तोडून खेळ केलात, आता देशासाठी असाच खेळ करा आणि पुन्हा एकदा 'टीम इंडिया'चा झेंडा मानाने फडकवा, हीच अपेक्षा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl t-20 champions lessons