पराभवातील पराक्रमाची गाथा! (अग्रलेख)

Team India in ICC Women's World Cup
Team India in ICC Women's World Cup

खरे तर भारतीय क्रिकेट आणि त्यातही सचिन तेंडुलकर-सौरभ गांगुली वा राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण किंवा आजच्या काळात विराट कोहली वा अजिंक्‍य रहाणे यांची फलंदाजी वगळता अन्य कोणता खेळ भारतीय क्रीडाप्रेमी मोठ्या जिव्हाळ्याने बघतात, यावर विश्‍वास ठेवणेच कठीण! सचिनच्या ऐन भरातील काळात भारतीय क्रिकेटचा दबदबा बराच वाढला, तरीही सचिन बाद होताच टीव्हीचे चॅनेल बदलणारे अनेक तथाकथित क्रिकेटप्रेमी सर्वांनाच ठाऊक असतील. मात्र, गेल्या दोन-तीन आठवड्यांत हे चित्र आरपार बदलून गेले आणि अचानक भारतीय महिला क्रिकेट 'टीआरपी'च्या अजेंड्यावर आले. त्यास अर्थातच मिताली राजच्या नेतृत्वाखालील युवतींनी इंग्लंडमध्ये झालेल्या महिला विश्‍वकरंडक स्पर्धेत केलेल्या दिमाखदार कामगिरीबरोबरच दाखवलेली जिगर आणि जिद्द कारणीभूत आहे. रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या जिगरबाज युवतींचे अवसान शेवटच्या काही षटकांत ढासळले आणि हातातोंडाशी आलेला विश्‍वकरंडक इंग्लंडमध्येच राहिला. त्याबद्दल क्रीडाप्रेमी हळहळ व्यक्‍त करत असतील. या युवतींनी ही स्पर्धा अनेक अर्थाने गाजवली; पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे 1983 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडमध्येच विश्‍वचषक जिंकला आणि कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ आदी खेळाडू 'हिरो' बनले. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे दिपवून टाकत असला, तरीही गेल्या 15 दिवसांत याच क्रिकेटप्रेमींना या भारतीय युवतींनी आपल्या खेळाने मोहित करून सोडले आणि त्या 'हिरो' झाल्या! भारतीय क्रिकेटमधील पुरुषी वर्चस्वाला या युवतींनी आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावर दिलेला हा शहच होता. आता नेमक्‍या शेवटच्या काही षटकांत या लढाऊ, जिद्दी युवतींचा संयम का सुटला, ही चर्चा दीर्घ काळ सुरू राहील. तरीही त्यांची कामगिरी अभिनंदनास पात्र आहे, यात शंका नाही. 

खरे तर मिताली राज, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, स्मृती मानधना, झूलन गोस्वामी, राजेश्‍वरी गायकवाड आदींच्या जिद्दीवरच हा संघ अंतिम सामन्याचा दरवाजा ठोठावत असताना, त्यांची गाठ पडली ती बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. तेव्हाच भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात धडधड होण्यास सुरवात झाली होती. मात्र, त्या सामन्यात हरमनप्रीतने धडाकेबाज फटकेबाजी करताना सचिन-सेहवाग-सौरभ यांच्या खेळाची आठवण करून दिली. खरे तर तिचा आवेश इतका जबरदस्त होता की त्यापुढे हे नामवंत फलंदाजही कमीच पडावेत. आठवण व्हायची असेल तर ती 1983 मध्ये कपिलदेवने झिम्बाब्वेविरुद्ध तुफानी फटकेबाजी करून केलेल्या 175 धावांची व्हावी! तिच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांनी कमाल केली आणि भारत अंतिम फेरीत पोचला. तेव्हाही गोलंदाजांच्याच करामतीवर इंग्लंडला 228 धावांवर रोखण्यात भारताला यश आले होते. त्यात झूलन गोस्वामीचा सिंहाचा वाटा होता. तिने दहा षटकांत अवघ्या 23 धावा देत, तीन बळी घेतले. हे 228 धावांचे आव्हान खरे तर भारताला सहज पेलवणारे होते आणि भले स्मृती मानधना शून्यावर बाद झाली आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करणारी कर्णधार मिताली राज 17 धावांवर दुर्दैवाने धावचीत झाली, तरी मुंबईची पूनम राऊत व हरमनप्रीत यांनी दणदणीत भागीदारी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. त्यानंतर अचानक पूनमला लचक भरली आणि पुढे सारेच या जिगरबाज युवतींच्या हातातून निसटून गेले. 'शेवटचा चेंडू पडेपर्यंत क्रिकेटमध्ये काहीच सांगता येत नाही,' असे विजय मर्चंट म्हणत. त्याचीच प्रचिती भारतीय युवतींनी केवळ या अंतिम सामन्यातच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत आणून दिली. 

आता या स्पर्धेमुळे मिताली असो की पूनम, हरमनप्रीत असो की स्मृती आणि राजेश्‍वरी असो की दीप्ती ही नावे घराघरांत जाऊन पोचली आहेत. यापूर्वी भारत महिला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता तो 2005 मध्ये. त्या संघातील मिताली राज आणि झूलन गोस्वामी या दोघीच यंदाच्या संघात होत्या. त्या आता पुढच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळतील की नाही, हा त्यांचे वय लक्षात घेता प्रश्‍नच आहे. मात्र, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा क्रिकेट नियामक मंडळाने नव्या युवतींना घडवण्यासाठी करून घ्यायला हवा. भारतीय क्रीडा विश्‍व म्हटले की सानिया मिर्झा, साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक अशी काही मोजकीच नावे निरूपमा मांकडच्या जमान्यानंतरच्या तरुण पिढीच्या ओठावर येत. आता त्यात या युवतींची भर पडली आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 'हिरो' म्हणूनही त्यांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरली जातील. यश आणि अपयश यात अंतर अगदीच थोडे असते, हे या महिलांनी दाखवून दिले. त्यामुळेच पराभवाच्या दु:खद आठवणींऐवजी, पराभूत होऊनही या युवतींनी मितालीच्या नेतृत्वाखाली रचली आहे ती पराक्रमाची गाथाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com