हैदराबादची झुंज अपयशी; चेन्नईचा 4 धावांनी विजय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 April 2018

युसूफने 27 चेंडूत 1 चैकार 4 षटकारांसह 45 धावांची खेळी करून हैदराबादला सामन्यात आणले. पण, सात धावांच्या अंतरात प्रथम विल्यम्सन आणि नंतर युसूफ बाद झाले. त्यानंतरही ड्‌वेन ब्राव्होन टाकलेल्या अखेरच्या षटकांत 19 धावांची आवश्‍यकता असताना रशिद खाने 14 धावा झोडपल्या.

हैदराबाद : टी 20 क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर 4 धावांनी विजय मिळविला. पाच सामन्यातून त्यांचा हा चौथा विजय होता. 

प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 182 धावा केल्या. त्यानंतर हैदराबादच्या कर्णधार केन विल्यम्सनचे प्रयत्न अपुरे पडले. त्यांचा डाव 20 षटकांत 6 बाद 178 असा मर्यादित राहिला. 

विजयासाठी आव्हान करताना हैदराबाद संघासाठी चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर कर्दनकाळ ठरला. त्याच्या चार षटकांच्या हप्त्यातच यजमानांना बॅकफूटवर जावे लागले. चहरने चार षटकांत 15 धावांत 3 गडी बाद केले. त्याने एक षटक निर्धाव टाकले. जखमी धवनच्या जागी संधी मिळालेला रिकी भुई आणि मनीष पांडे भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाले. त्यानंतर चहरने दीपक हुडाचाही (1) अडथळा सहज दूर केला. एकाबाजूने कर्णधार विल्यम्सन खेळत असला, तरी 3 बाद 22 अशा स्थितीतून बाहेर पडताना हैदराबादच्या नाकीनऊ आले. शकिब अल हसन (24) बाद झाल्यावर चेन्नईने पठाणी हिसका अनुभवला. 

युसूफने 27 चेंडूत 1 चैकार 4 षटकारांसह 45 धावांची खेळी करून हैदराबादला सामन्यात आणले. पण, सात धावांच्या अंतरात प्रथम विल्यम्सन आणि नंतर युसूफ बाद झाले. त्यानंतरही ड्‌वेन ब्राव्होन टाकलेल्या अखेरच्या षटकांत 19 धावांची आवश्‍यकता असताना रशिद खाने 14 धावा झोडपल्या. मात्र, ब्राव्होने अखेरचा चेंडू टाकताना अनुभव पणाला लावत रशिदला मोठ्या फटक्‍यापासून वंचित ठेवले आणि ताणल्या गेलेल्या चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

त्यापूर्वी, चेन्नईच्या शेन वॉटसन, डु प्लेसिस या नव्या सलामीच्या जोडीला अपयश आले. पण, त्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या 112 धावांच्या भागीदारीने चेन्नईचे आव्हान उभे राहिले. रायुडू 37 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 79 धावा केल्या. रायुडू बाद झाल्यावर कर्णधार धोनीनेही 12 चेंडूत 25 धावांचा तडाखा दिला. रैना 54 धावांवर नाबाद राहिला. 

संक्षिप्त धावफलक :

चेन्नई 20 षटकांत 3 बाद 182 (अंबाती रायुडू 79 -37 चेंडू, 9 चौकार, 4 षटकार, सुरेश रैना नाबाद 54 -43 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, महेंद्रसिंह धोनी नाबाद 25) वि.वि. हैदराबाद 6 बाद 178 (केन विल्यम्सन 84 -51 चेंडू, 5 चौकार, 5 षटकार, युसूफ पठाण 45 -27 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, शकिब ल हसन 24, रशिद खान नाबाद 17, दिपक चहर 3-15)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket Match Hydrabad Loose Match Chennai Won by 4 Runs