धोनीने ग्लोव्हज्‌वरील 'बलिदान' लोगो काढला

वृत्तसंस्था
Sunday, 9 June 2019

महेंद्रसिंग धोनीने आपल्या ग्लोव्हज्‌वरील 'बलिदान' सन्मानचिन्ह काढले आहे, त्यामुळे वाद टळला आहे.

लंडन : महेंद्रसिंग धोनीने आपल्या ग्लोव्हज्‌वरील 'बलिदान' सन्मानचिन्ह काढले आहे, त्यामुळे वाद टळला आहे. सलामीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीच्यावेळी धोनीच्या यष्टीरक्षणाच्या ग्लोव्हज्‌वर हे सन्मानचिन्ह होते, त्यावेळी आयसीसीने ते काढण्याची सूचना भारतीय क्रिकेट मंडळास केली होती.

धोनीच्या ग्लोव्हज्‌वर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीच्यावेळी हे सन्मानचिन्ह नसणार असे संकेत रोहित शर्माने दिले होते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आमचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेपर्यंत प्रतीक्षा करा, असे सांगितले होते. आता धोनीने ग्लोव्हज्‌वरील सन्मानचिन्ह ठेवले असते, तर त्याला सुरुवातीस ताकीद देण्यात आली असती आणि त्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली असती. ही रक्कम सुरुवातीस 25 टक्के आणि त्यानंतर 50 आणि 75 टक्के अशा स्वरुपात असते. धोनीने एका वर्षात हे केल्यासही त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

भारतीय संघाने याबाबतचा निर्णय धोनीवर सोपवला होता. अर्थात आयसीसीच्या निर्णयावर भारतीय संघ नाराज आहे. धोनी वगळता भारतीय संघातील कोणासही लष्करात मानद पद नाही. धोनी मैदानाबाहेर गेल्यास हे सन्मानचिन्ह अन्य खेळाडू कसा वापरू शकेल, अशी विचारणा झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhoni removed the 'Balidan' insignia on the gloves