रोहित शर्माचा धडाका; भारताचा मालिका विजय 

वृत्तसंस्था
Monday, 5 August 2019

पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजचा 22 धावांनी पराभव करून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 

विंडीजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 22 धावांनी मात 
लॉडरहिल (फ्लोरिडा) - पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडीजचा 22 धावांनी पराभव करून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 167 धावांची मजल मारली. रोहित शर्माच्या 67 धावांनंतर कृणाल पंड्याच्या अखेरच्या टप्प्यातील फटकेबाजीने भारताचे आव्हान उभे राहिले. त्यानंतर विंडीजला रोवमॅन पॉवेलच्या (54) फटकेबाजीनंतरही उभा राहू शकला नाही. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा विंडीजच्या 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा झाल्या होत्या. डकवर्थ लुईसनुसार त्यावेळी विंडीजसमोर 120 धावांचे आव्हान निश्‍चित करण्यात आले होते. पावसामुळे पुढे खेळ सुरू न झाल्यामुळे भारताला विजयी घोषित करण्यात आले. 

आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा विंडीजच्या सलामीच्या जोडीला झटपट गुंडाळले. भुवनेश्‍वरने एविन लुईसला भोपळा फोडण्यापूर्वीच बाद केले. त्यानंतर आयपीएलमध्ये सलामीला फटकेबाजी करणाऱ्या सुनील नारायणला वॉशिंग्टन सुंदरने चकवले. त्यानंतर निकोलस पूरनला (19) साथीला घेत पॉवेलने 76 धावांची भागीदारी केली. मात्र, 14व्या षटकाने त्यांना कोंडीत पकडले. कृणाल पंड्याने दोन चेंडूच्या अंतराने पूरन आणि पॉवेल यांना बाद केले. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा विंडीजच्या 4 बाद 98 धावा झाल्या होत्या. 

त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला तुफानी सुरवात करून दिली. पहिल्या सामन्यात शनिवारी भारतीय फलंदाजांची 96 धावांचा पाठलाग करताना दमछाक झाली होती. मात्र, आज प्रथम फलंदाजी घेतल्यावर भारतीय फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. रोहित, शिखर यांची सुरवातच विंडीज गोलंदाजांचे खच्चीकरण करणारी होती. त्यांनी 8 षटकांतच 67 धावांची सलामी दिली. त्यावेळी भारताला शिखरची विकेट गमवावी लागली. त्यानंतर रोहितने आपला धडाका कायम ठेवताना टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर करत शानदार अर्धशतक झळकावले. रोहित 51 चेंडूंत 6 चौकार, 3 षटकारांसह 67 धावांची खेळी करून बाद झाला. रिषभ पंत पुन्हा एकदा संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. विराट कोहली आणि मनिष पांडे पाठोपाठ बाद झाले. अशा वेळी कृणाल पंड्याने 13 चेंडूंत दोन षटकारासंह 20 धावांचा दणका देत भारताचे आव्हान उभे केले. 

संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकांत 5 बाद 167 (रोहित शर्मा 67 -51 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, शिखर धवन 23, विराट कोहली 28, कृणाल पंड्या नाबाद 20, ओशान थॉमस 2-27, शेल्डन कॉट्रेल 2-25) डकवर्थ लुईस नियमानुसार वि.वि. वेस्ट इंडिज 15.3 षटकांत 4 बाद 98 (रोवमॅन पॉवेल 54, कृणाल पंड्या 2-23)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India win ODI series