INDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत

Friday, 14 December 2018

पर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे रोखले होते. अपेक्षेपेक्षा पर्थची खेळपट्टी पहिले तीन तास खूप चांगली राहिली ज्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. मार्कस हॅरीसच्या 70 धावांना अ‍ॅरॉन फिंच आणि ट्रॅव्हीस हेडच्या अर्धशतकांची साथ लाभली आणि  ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखेरीला सहा बाद 277 धावा जमा केल्या. 

पर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे रोखले होते. अपेक्षेपेक्षा पर्थची खेळपट्टी पहिले तीन तास खूप चांगली राहिली ज्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. मार्कस हॅरीसच्या 70 धावांना अ‍ॅरॉन फिंच आणि ट्रॅव्हीस हेडच्या अर्धशतकांची साथ लाभली आणि  ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखेरीला सहा बाद 277 धावा जमा केल्या. 

नाणेफेक जिंकून टीम पेनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या कसोटी सामन्यातला संघ कायम ठेवला. भारताने रोहित शर्माच्या जागी हनुमा विहारी आणि अश्विनच्या जागी उमेश यादवला संधी दिली. विराट कोहलीने चार वेगवान गोलंदाजांसह सामन्यात उतरायचा निर्णय घेऊन धक्का दिला. ऑप्टस स्टेडियमच्या खेळपट्टीवरून गवताचा एक थर काढला गेला होता तरीही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना खूप साथ देईल असा सगळ्यांचा अंदाज होता. झाले उलटे, कारण खेळ चालू झाल्यावर चेंडू बॅटवर चांगला यायला लागला. सलामीच्या फलंदाजांनी त्याचा फायदा घेत मोठ्या मैदानात चेंडू मारून पटापट धावा जमा केल्या. 

ईशांत शर्मा, बुमरा आणि मोहंमद शमीने टप्पा पकडून गोलंदाजी केली. त्यामानाने उमेश यादवने काहीसा स्वैर मारा केल्याने धावसंख्येला थोडी गती मिळाली. उपहारापर्यंत सलामीची जोडी नाबाद परतल्यावर चिंता वाटू लागली. संघात एकतरी फिरकी गोलंदाज हवा होता असे वाटू लागले. प्रथम मार्कस हॅरीसने अर्धशतक पूर्ण केले. हॅरीस स्थानिक खेळाडू असल्याने प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले. अ‍ॅरॉन फिंचने पाठोपाठ अर्धशतक पूर्ण केल्यावर लगेच विकेट गमावली. बुमराने फिंचला पायचित केले. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी आलेला उस्मान ख्वाजा पहिल्यापासून अस्वस्थ होता. उमेश यादवला बाहेर जाणार्‍या चेंडूवर फटका मारताना ख्वाजा बाद झाला. नंतर आश्चर्य म्हणजे जम बसलेल्या हॅरीसला बदली गोलंदाज हनुमा विहारीने बाद केले. 

उपहारानंतर ईशांत शर्माला स्क्वेअरकटचा फटका मारताना पीटर हॅडस्कोंबचा उडालेला झेल विराट कोहलीने जणू हवेतून पकडून आणला. योग्य वेळी उंच उजवीकडे उडी मारून कोहलीने झेल पकडला. बिनबाद 112 धावसंख्येवरून अचानक धावफलक 4 बाद 148 दिसू लागला. पहिला डाव लवकर संपवता येईल का असा विचार भारतीय गोलंदाजांच्या डोक्यात शिरू लागला असताना शॉन मार्शला ट्रॅव्हीस हेड येऊन मिळाला. दोघांनी भारतीय गोलंदाजांना सहजी तोंड देत मस्त भागीदारी रचली. त्यातून विहारीच्या गोलंदाजीवर शॉन मार्शचा झेल रिषभ पंतने सोडला. 

विहारीनेच 84 धावांची भागीदारी मोडली. स्लिपमधे उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेने वेगाने उडालेला झेल पकडला. ट्रॅव्हीस हेडने पहिल्या कसोटीत चमक दाखवली होती. तोच फॉर्म तो दुसर्‍या कसोटीत दाखवून गेला. शैलीदार अर्धशतकी खेळी करून हेडने छाप पाडली. 58 धावांवर खेळणारा हेड डोकेदुखी ठरू लागला असताना त्याने स्वत:च्या हाताने विकेट फेकली. ईशांतला मोठा फटका मारताना हेड झेलबाद झाल्यावर भारतीय संघाने उसासा सोडला. 

पहिल्या दिवशीच्या शेवटच्या अर्ध्या तासात दुसर्‍या नव्या चेंडूवर पर्थची खेळपट्टी थोडी जादू दाखवत होती. कर्णधार टीम पेनने पॅट कमिन्सच्या साथीने अजून पडझड होऊन न देता 6 बाद 277 धावांची मजल गाठली. दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव लवकरात लवकर संपवायला भारतीय गोलंदाजांना तगडे प्रयत्न करावे लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsAUS australia scores first day second Test