जिम्मीने रचला इतिहास; कसोटीत 600 बळी घेणारा पहिलाच वेगवान गोलंदाज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकविरुद्ध साउथम्प्टन कसोटीत पाचव्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं पाकचा कर्णधार अजहर अलीला बाद करत कसोटी कारकिर्दीत 600 बळींची संख्या गाठली.

साउथम्पट - इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) पाकविरुद्ध (Pakistan) साउथम्प्टन कसोटीत पाचव्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं पाकचा कर्णधार अजहर अलीला बाद करत कसोटी कारकिर्दीत 600 बळींची संख्या गाठली. तिसऱ्या कसोटीत त्याने सात गडी बाद केले. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात त्यानं दोन गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये 600 गडी बाद करणारा अँडरसन जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 600 बळींचा आकडा गाठलेले तिनही दिग्गज हे फिरकीपट्टू आहेत. 

जेम्स अँडरसनच्या आधी कोसटीमध्ये 600 पेक्षा जास्त गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये लंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्याने 133 कसोटीमध्ये 800 गडी बाद करून विश्वविक्रम केला आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नचा नंबर लागतो. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 गडी बाद केले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपट्टू अनिल कुंबळे आहे. भारताकडून 132 सामने खेळताना अनिल कुंबळेने 619 बळी घेतले आहेत. यामध्ये एका डावात सर्व दहा गडी बाद करण्याचा विक्रमही अनिल कुंबळेच्या नावावर आहे. 

कसोटी कारकिर्दीत जेम्स अँडरसनने आतापर्यंत 156 सामने खेळले आहेत. यात त्याने 600 बळींचा टप्पा गाठला असून एका डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी 29 वेळा केली आहे. तसंच एका सामन्यात 10 गडी बाद करण्याची किमया 3 वेळा केली आहे. इंग्लंडचा फिरकीपट्टू डोम बेसने नुकतंच म्हटलं होतं की, जेम्स अँडरसन देशातील सर्वात महान गोलंदाज आहे. 

अँडरसनने इंग्लंडसाठी 194 एकदिवसीय सामने तर 19 टी 20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 तर टी20 मध्ये 18 बळी घेतले आहेत. अँडरसनने भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक गडी बाद केले आहेत. भारताविरुद्ध खेळताना 110 तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 गडी बाद केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: James Anderson first fast bowler reach 600 test wickets