वाद धोनीच्या फलंदाजी क्रमाचा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 August 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिह धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता.

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिह धोनीला उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या एका निर्णयावरून फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर खापर फोडले जात असतानाच शुक्रवारी धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता,असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला. 

स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पावसामुळे लांबला होता. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 8 बाद 239 असे रोखले. पण, राखीव दिवशी 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताचे आघाडीचे चार फलंदाज 10 षटकांत 24 धावांत बाद झाल्यावर रवींद्र जडेजा (77) आणि धोनी (50) यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली होती. पण, त्यांची ही भागीदारी होण्यास उशीर झाला. भारताला 18 धावांनी पराभवाचा समाना करावा लागला. त्या वेळी धोनीच्या आधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याला पाठविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

बांगर म्हणाले,""त्या वेळी सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळाल्या. समालोचकही माझ्या नावाचा उल्लेख करू लागले होते. मात्र, खात्री बाळगा हा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता. फलंदाजीसाठी 5, 6 आणि सातव्या क्रमांकासाठी आम्ही लवचिकता ठेवली होती. कारण, आम्ही साधारण 30 ते 40व्या षटकांत यांना फलंदाजी येईल असे मानले होते.'' 

आधीच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हाणामारीच्या षटकांत धोनी खेळायला आल्यास फायदा होईल असे वाटल्यानेच उपांत्य फेरीत त्याला सहाव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय आम्ही बैठकीत घेतला होता. बांगर म्हणाले,""धोनीने त्याच्या नेहमीच्या पाचव्या स्थानावर न खेळता खालच्या क्रमांकावर खेळल्यास अखेरच्या षटकांत धावांचा वेग वाढवण्यास मदत होईल, असे कोहलीनेच सांगितले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत त्याला सहाव्या ख्रमांकावर पाठविण्यात आले.'' 

धोनीचा अनुभव आणि त्याची मॅच अखेरच्या षटकापर्यंत ताणून संपविण्याची आगळी पद्धत लक्षात घेता त्याला सातव्या क्रमांकावर खेळविण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने एकत्रित घेतला होता. त्याच्याशी केवळ माझ्या एकट्याचा संबंध नव्हता, याचा बांगर यांनी पुनरुच्चार केला. 

धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले, तर त्याच्या अनुभवाचा आणि आक्रमक खेळाचा आपल्याला फायदाच होईल,असा विचार होता. त्या पद्धतीने त्याचा विचार केला नसता,तर ती चूक ठरली असती आणि हे खेळाडूच नाही, तर संपूर्ण संघ व्यवस्थापन हे जाणून होते. 
-संजय बांगर, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni Batting at No 7