'रणजी'वर विदर्भाचेच वर्चस्व; सलग दुसर्‍या वर्षी ठरले अजिंक्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 February 2019

अखेरच्या दिवसापर्यंत झालेल्या चुरशीच्या सामन्यात विदर्भाने बाजी मारत सौराष्ट्रावर 78 धावांनी विजय मिळविला आणि रणजी करंडकावर पुन्हा एकदा नाव कोरले

नागपूर : अखेरच्या दिवसापर्यंत झालेल्या चुरशीच्या सामन्यात विदर्भाने बाजी मारत सौराष्ट्रावर 78 धावांनी विजय मिळविला आणि रणजी करंडकावर पुन्हा एकदा नाव कोरले. आदित्य सरवटेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राच्या सर्व फलंदाजांना केवळ 127 धावांत बाद केले. 

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रासमोर विजयासाठी 206 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राचा डाव 127 धावांतच संपुष्टात आला. त्यांच्या फलंदाजांची मदार असलेला चेतेश्वर पुजारा दोन्ही डावांत अपयशी ठरला. 

विदर्भाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्राने 58 अवघ्या धावांत अर्धा संघ गमावला होता. गुरुवारी अखेरच्या दिवशी सौराष्ट्रला 148 धावांची गरज होती. आदित्य सरवटेच्या गोलंदाजीसमोर त्यांनी केवळ 69 धावांची भर घालता आली. त्यांचे तळातील पाचही फलंदाज सकाळच्या सत्रात बाद झाले आणि विदर्भाचा विजय निश्चित झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidharbha wins second ranji trophy title