झाकली मुठ सव्वालाखाची; वर्ल्ड कपबाबत कानउघडणी नाहीच

शैलेश नागवेकर
Friday, 26 July 2019

- विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकायला निघालेल्या टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले त्यानंतर भारतीय क्रिकेटचे वातावरण ढवळून निघाले होते.

- चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न प्रमुख फलंदाजांचे अपयश आणि संघातील दुफळी असे अनेक मुद्दे पुढे आले होते.

नवी दिल्ली : विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकायला निघालेल्या टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले त्यानंतर भारतीय क्रिकेटचे वातावरण ढवळून निघाले होते. चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न प्रमुख फलंदाजांचे अपयश आणि संघातील दुफळी असे अनेक मुद्दे पुढे आले होते. लागलीच प्रशासकीय समितीने संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल अशी घोषणा केली त्यातून सत्य बाहेर येईल असे अनेकांना वाटू लागले होते. परंतु रात गई बात गई...ती घोषणा हवेतच विरली आता त्याच प्रशासकीय समितीने आढावा बैठक होणार नसल्याचे जाहीर केले आणि त्यासाठी पुरेसा वेळ नसल्याचे कारण दिले.

भारतीय संघाचे आव्हान 9 जुलै रोजी संपुष्टात आले त्यानंतर काही दिवस खेळाडू इंग्लंडमध्ये राहिले आणि रविवारी म्हणजेच 14 तारखेला तेथून निघाले. आज 26 तारीख झाली तरी कर्णधार किंवा संघ व्यवस्थापनाबरोबर आढावा बैठक घेण्यास वेळ मिळाला नाही. या पुढेही तो मिळणार नाही कारण काही दिवसांतच आता भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी प्रयाण करणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवडीची बैठक मुंबईत झाली या बैठकीच्या वेळी आढावा बैठक होऊ शकली असती. आता प्रथेप्रमाणे दौऱ्यातील व्यवस्थापक अहवाल सादर करत असतात त्यावरच चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रवि शास्त्री यांच्या संघ व्यवस्थापनाला या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी मुदवाढ देण्यात आली आहे या दरम्यान नव्या संघ व्यवस्थापनाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तोपर्यंत सर्व काही विस्मृतीत गेलेले असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup review meeting cancelled by COA