Aashadhi Ekadashi 2023: ‘दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति…’; विठ्ठलाच्या आरतीचा नक्की अर्थ काय?

वर्षानुवर्षे आपण म्हणत असलेल्या या आरत्यांचा अर्थही लक्षात घ्यायला हवा. परवा दिवशी आषाढी एकादशी (दि.२९) आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या विठ्ठलाच्या आरतीचा अर्थ.
Vitthal Decoration
Vitthal DecorationSakal

कोणतीही पूजा असो किंवा देवीदेवतांची साधना असो, यामध्ये आरती करण्याला मोठं महत्त्व आहे. आपण वर्षानुवर्षे आऱत्या ऐकत, म्हणत असतो. पण त्या आरत्यांच्या अर्थाबद्दल कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

गणेशोत्सव, नवरात्री, सत्यनारायणाची पूजा असो, आपण नेहमी आरत्या म्हणतो. त्यामुळे म्हणता म्हणता नकळतपणे आरत्या पाठ होऊन जातात. काही वेळा आऱत्यांमधले शब्द चुकतात. त्याबद्दल सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चाही आपल्याला माहित असतील. म्हणजे गणपतीच्या आरतीमध्ये फणीवर वंदना ऐवजी फळीवर वंदना म्हणणं. अशा चुका सध्या चेष्टेचा आणि विनोदाचा विषयही होत असतो.

Vitthal Decoration
Aashadhi Ekadashi : ईदच्‍या दिवशी ‘आषाढी’मुळे कुर्बानी नाहीच! 'पंढरपूर'नंतर 'या' गावचाही ऐतिहासिक निर्णय

पण हे झालं चुकांचं, चुका आपण लक्षात आल्यावर सुधारतो. पण या आरत्यांच्या अर्थाचं काय? वर्षानुवर्षे आपण म्हणत असलेल्या या आरत्यांचा अर्थही लक्षात घ्यायला हवा. परवा दिवशी आषाढी एकादशी (दि.२९) आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या विठ्ठलाच्या आरतीचा अर्थ.

प्रत्येक देवाप्रमाणे विठ्ठलाच्याही दोन तीन आरत्या आहेत.. त्यापैकी युगे अठ्ठावीस विटेवरी उभा या आरतीचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. या व्यतिरिक्त येई ओ विठ्ठले माझे माऊली ये, आरती अनंत भुजा, संत सनकादिक भक्त मिळाले अनेक, ओवाळू आरती माझ्या पंढरीराया या विठ्ठलाच्या आरत्याही प्रसिद्ध आहेत. संत नामदेव, संत एकनाथ महाराज अशा संतांनी या आरत्यांची रचना केलेली आहे.

युगे अठ्ठावीस... या आरतीचा अर्थ काय?

युगे अठ्ठावीस या शब्दापासून आपण सुरुवात करूया. आपल्या सर्वांना ४ युगे माहित आहेत. ती म्हणजे सत्य युग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलीयुग. या चार युगांची १२ हजार दिव्यवर्षे अध्यात्मात मानलेली आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे अशी एक हजार चतुर्युगे. त्याला कल्प म्हणतात. यामध्ये एकूण १४ मनू असतात, म्हणजे प्रत्येक मनुचा कालखंड ७१ चतुर्युगे. त्याला मन्वंतर म्हणतात.

Vitthal Decoration
Ashadhi Ekadashi 2023 : रूक्मिणी रूसली अन् द्वारकाधीश श्री कृष्ण पंढरीनरगीत येऊन पांडुरंग झाले!

ब्रह्मदेवाचं आयुर्मान १०० ब्राह्मवर्षे इतकं मानलं जातं. त्यातली ५० ब्राह्मवर्षे संपली आहेत. ५१ व्या वर्षातला पहिला श्वेतवाराह हा कल्प सध्या चालू आहे. त्याच्या सुरुवातीला सृष्टी पुन्हा उत्पन्न झाली. तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरं पूर्ण झाली. सध्या सातवं मन्वंतर सुरू आहे. वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगं मोजली तर सध्याचं कलियुग अठ्ठाविसावं युग आहे. विठ्ठल अठ्ठावीस युगे म्हणजे सृष्टीच्याही आधीपासून विटेवर उभा आहे.

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

जेव्हा विठ्ठल रुक्मिणी एकत्र उभे असतात, त्यावेळी विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रखुमाई दिसते. ही रखुमाई विठ्ठलाच्या बाजूला शोभून दिसते.  

पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा

पुंडलिक आणि विठ्ठल भेटीची कथा तर तुम्हाला माहित असेलच. आपल्या आईबाबांची सेवा करत असताना विठ्ठलभक्त पुंडलिकाच्या भेटीला साक्षात पांडुरंग आला. मात्र आपण आईवडिलांची सेवा करत असल्याने त्याने पांडुरंगाला विटेवर उभा राहून वाट पाहायला लावली. त्या कथेचा संदर्भ या ओळीमध्ये येतो.

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा

भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी विठ्ठलाने अवतार घेतला. त्याच्या चरणी जगाचा उद्धार करण्यासाठी भीमा नदी वाहत आहे. भीमा म्हणजेच चंद्रभागा नदी. महाराष्ट्रातल्या पवित्र नद्यांमध्ये चंद्रभागेची गणना केली जाते. या नदीतलं स्नान पुण्य मानलं जातं.

रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा

रखुमाई, रुक्मिणी म्हणजे विठ्ठलाची पत्नी हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. रखमाई वल्लभा म्हणजे रखुमाईचा पती पण मग राईच्या वल्लभा का म्हणतात? राहीच्या वल्लभा असा मूळ शब्द आहे. राही म्हणजे राधा. विठ्ठल हा विष्णुचा अवतार मानला जातो. विष्णुच्या कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी कृष्णाची पत्नी होती. तर राधा त्याची प्रेयसी मानली जाते.

 यावरुन रुक्मिणी कृष्णावर रागावली होती, अशी कथाही आढळते. विठ्ठल हा कृष्णाचा पुढचा अवतार, असंही दशावतारामध्ये सांगितलं आहे. त्यामुळेच विठ्ठलाच्या आरतीमध्ये रखुमाईसोबत राई, राहीचाही उल्लेख आढळतो. याशिवाय राईच्या वल्लभा म्हणजे पृथ्वीच्या वल्लभा असा अर्थ असल्याच्याही चर्चा आहेत.

गरुड हनुमंत पुढे उभे राहती

यामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन करण्यात आलं आहे. विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीमाळा आहेत. त्याच्या कमरेवर दोन्ही हात ठेवलेले आहेत. तसंच त्याने कमरेला पितांबर परिधान केलं आहे आणि कपाळावर कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. देव सुरवर नित्य येती भेटी म्हणजे सर्व श्रेष्ठ देवीदेवता विठ्ठलाच्या भेटीसाठी येत असतात. शिवाय गरुड आणि हनुमंत हात जोडून त्याच्यासमोर उभे असतात. हे वर्णन विष्णूच्या वर्णनासारखंच आहे. हनुमंताचा उल्लेख असण्याचं कारण म्हणजे श्रीराम हे विष्णूचा सहावा अवतार आहेत. आणि श्रीरामांसोबत कायम हनुमान असतो. विठ्ठल अवतारातही हनुमंत सोबत आहे. तर विष्णूचं वाहन असलेला गरुडही विठ्ठल अवतारात सोबत आहे. म्हणून त्याचाही उल्लेख आहे.

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती

कुर्वंड्या म्हणजे द्रोणातले दिवे. भक्तजन कुर्वंड्या म्हणजे द्रोणातून दिवे घेऊन येतात आणि ते चंद्रभागेतून सोडून देतात. आरतीत पुढे म्हणतात की दिंडी पताका आणि ध्वज घेऊन भक्तगण, वारकरी येतात. ते आनंदाने देहभान हरपून नाचत असतात.

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति

आषाढीला वारकरी येतात आणि चंद्रभागा म्हणजे भीमा नदीमध्ये पवित्र होण्यासाठी स्नान करतात. क्षणभर झालेल्या विठ्ठलाच्या दर्शनाने ते भवसागरातून मुक्त होतात. म्हणजे आत्यंतिक आनंद, समाधान, राग लोभ यांच्यापासून मुक्ती मिळवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com