गोवंश संवर्धनाला साथ पैदासकारांची

राज्यातील अभ्यासू पशुपालक आणि पशुतज्ज्ञांनी एकत्र येत खिलार, देवणी, डांगी, लाल कंधारी आणि गवळाऊ गोवंश पैदासकार संघ स्थापन झाले आहेत.
Cow
CowSakal

राज्यातील अभ्यासू पशुपालक आणि पशुतज्ज्ञांनी एकत्र येत खिलार, देवणी, डांगी, लाल कंधारी आणि गवळाऊ गोवंश पैदासकार संघ स्थापन झाले आहेत. त्याचबरोबरीने साहिवाल आणि थारपारकर क्लबच्या माध्यमातून गोवंश संवर्धन आणि प्रसार करण्यात येत आहे. याबाबत घेतलेला आढावा...

लालकंधारी पैदास केंद्र

लाल कंधारी हा मराठवाड्यातील गोवंश. शेती कामासाठी या बैलांना चांगली मागणी आहे. योग्य व्यवस्थापनात या गाई प्रतिदिन ४ ते ५ लिटर दूध देतात. या गोवंशाच्या संवर्धनासाठी पशुपालकांनी एकत्र येत मावलगाव (जि. लातूर) येथे २००३ मध्ये लाल कंधारी पैदास केंद्राची स्थापना केली.

याबाबत माहिती देताना केंद्राचे संस्थापक अध्यक्ष शरद पाटील म्हणाले की, लाल कंधारी हा शेती मशागतीसाठी गोवंश आहे. त्याचबरोबरीने गाईदेखील योग्य आहार व्यवस्थापनात सरासरी प्रति दिन ५ ते ६ लिटर दूध देतात. केंद्रातर्फे पशुपालकांना जातिवंत पैदाशीबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाते. चांगल्या पैदाशीतून दुधाळ गाय गोठ्यातच तयार करत आहोत. पैदाशीसाठी शुद्ध वळू निर्मितीवरदेखील भर दिला आहे. पशुपालनाच्या बरोबरीने गो आधारित शेतीला चालना दिली आहे. यासाठी पोतूळ (जि. औरंगाबाद) आणि कणेरी मठ (जि. कोल्हापूर) येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी जिवामृत, घनजिवामृत, गोमूत्रावर आधारित कीटकनाशक निर्मिती तसेच दूध, तूप तसेच इतर उत्पादनांच्या निर्मितीबाबत प्रशिक्षण दिले जाते. मावलगावामध्ये प्रत्येक घरी लाल कंधारी गाय आणि गो आधारित शेतीला चालना दिली आहे. या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. शरद पाटील : ७३५०५ १६९९४

देवणीसाठी पशुपालक एकत्र

देवणी हा मराठवाड्यातील महत्त्वाचा गोवंश. ओढकाम, शेतीकाम तसेच दुधासाठी हा गोवंश ओळखला जातो. याच्या संवर्धनासाठी प्रयोगशील पशुपालक आणि पशुतज्ज्ञांनी बारा वर्षांपूर्वी ‘देवणी गोवंश सुधार व गोपालक असोसिएशन’ची सुरुवात केली.

याबाबत माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर बोरगावकर म्हणाले, की आम्ही देवणी गोवंश सुधार आणि जातिवंत पैदाशीसाठी कार्यरत आहोत. सुमारे ३०० पशुपालक आमचे सभासद आहेत. देवणी गोवंशामध्ये वानेरा, बालंक्या आणि शेवरा हे उपप्रकार दिसतात. या तीनही प्रकारांचे संवर्धन आम्ही करतो. यासाठी पशुपालकांना शास्त्रीय मार्गदर्शन केले जाते. पशू स्पर्धांचे आयोजन केले जाते. ओढकाम, शेतीकामासाठी बैलजोडीला शेतकऱ्यांची पसंती आहे. गाय सरासरी दररोज सहा लिटरपर्यंत दूध देते. चांगले व्यवस्थापन असलेल्या गाई दररोज ८ ते १० लिटरपर्यंत दूध देत आहेत. अशा दुधाळ गाईंची नोंद घेतली आहे. जातिवंत वळूंची देखील नोंद ठेवल्याने पैदासीसाठी फायदा होत आहे.

- डॉ. भास्कर बोरगावकर : ९४०४३ ७९३८३

पावसाळी शेतीकामासाठी डांगी

नगर जिल्ह्यातील सह्याद्री रांगांतील अकोले तालुक्यात पशुपालकांनी डांगी गोवंशाचे चांगले संगोपन केले आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ते कळसूबाई, त्र्यंबकेश्‍वर ते जव्हारपर्यंत डांगी गोवंश दिसतो. महाराष्ट्र, गुजरात राज्यातील किमान सहा जिल्ह्यांतील चौदापेक्षा अधिक तालुक्यात डांगी गोवंशाचे संवर्धन केले जाते. डांगी गोवंश अभ्यासक विजय सांबरे म्हणाले, की स्थानिक डांगी गोपालकांचा पुढाकार आणि लोकपंचायत संस्थेच्या तांत्रिक साह्यातून नोव्हेंबर २०२० मध्ये ‘डांगी गोवंश पैदासकार व संवर्धक संघ’ स्थापन झाला. सध्या अकोले तालुक्यातील कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड या परिसरात आमचे काम सुरू आहे. भविष्यात पुणे ते अहवा (गुजरात) पट्ट्यातील सहा जिल्ह्यांतील चौदा तालुक्यांपर्यंत डांगी गोवंश संवर्धन आणि संगोपनाचे काम नेण्याचे नियोजन झाले आहे. हा गोवंश तेलकट त्वचेमुळे अति पावसाच्या डोंगराळ प्रदेशात शेती मशागतीसाठी उपयुक्त आहे. कळपाने चरणाऱ्या गाई तीन ते चार महिने प्रतिदिन सरासरी तीन ते चार लिटर दूध देतात. योग्य खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनात पशुपालकांच्याकडे प्रतिदिन सरासरी सात लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत. दुधातील फॅट ३.५ ते ४ पर्यंत मिळते.

- विजय सांबरे : ९६०४० ७४०१२

विदर्भ भूषण : गवळाऊ

विदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी बैलजोडीला चांगली मागणी आहे. काळाची गरज ओळखून गोवंशाचे संगोपन, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘गवळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. जातिवंत गवळाऊ गोवंश वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा आणि सेलू तालुक्यांतील पशुपालकांकडे आहे. गोवंशाच्या संवर्धनापुरते मर्यादित न राहता जातिवंत पैदास, दूध उत्पादन वाढ आणि प्रक्रिया उत्पादनांच्या विक्रीसाठी ही संस्था येत्या काळात कंपनीदेखील सुरू करणार आहे. याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज कालोकार (तळेगाव रघुजी, ता. आर्वी, जि. वर्धा) म्हणाले, की गेल्या दहा वर्षांपासून गवळाऊच्या संवर्धनासाठी एकत्र आलो. आमच्याकडे पशुपालकांकडील २५० जातिवंत गवळाऊ गाईंची नोंदणी आहे. विदर्भातील उष्ण तापमानाचा या गोवंशाच्या आरोग्य तसेच दूध उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. या गोवंशाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. सरासरी दररोज पाच ते सहा लिटर दूध उत्पादन मिळते. प्रयोगशील पशुपालकांकडे दररोज सात ते आठ लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत. दुधातील फॅट पाचपर्यंत आहे.

संस्थेचे सल्लागार आणि गोवंश अभ्यासक सजल कुलकर्णी म्हणाले, की दरवर्षी गीता जयंतीला प्रदर्शन होते. या माध्यामातून जातिवंत गाई, वळू पशुपालकांसमोर येतात. ज्या गावात गवळाऊ गाई जास्त प्रमाणात आहेत, तेथे रेतनासाठी जातिवंत वळू उपलब्ध करून देत आहोत. यातून जातिवंत कालवडी पशुपालकांकडे तयार होतील. सध्या पशुपालक गवळाऊ गाईचे दूध रतीब किंवा डेअरीला देतात. आर्वी परिसरातील काही पशुपालक खवा तयार करून २५० रुपये किलो दराने विक्री करतात. अलीकडे नागपूर शहरात तूप विक्रीस सुरुवात झाली आहे. पुष्पराज कालोकार : ९९२३७ ३९०६२

- सजल कुलकर्णी ः ९८८१४ ७९२३९

वाटचाल ‘साहिवाल क्लब’ची...

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील कृषी पदवीधर, प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘साहिवाल क्लब’ स्थापन केला. क्लबच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देताना पुणे कृषी महाविद्यालयातील पशुतज्ज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले की, शेतीत प्रयोगशीलता सांभाळण्याबरोबरच गोसंवर्धन व शास्त्रीय नोंदी ठेवू शकणाऱ्यांना आम्ही क्लबचे सदस्य केले आहे. अभ्यासू पशुपालक गटाच्या माध्यमातून जातिवंत साहिवाल कालवडींची पैदास, व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार, स्वच्छ दूधनिर्मिती आणि दूधविक्रीचे नियोजन आहे.

आम्ही राजस्थान आणि हरियाना राज्यांतून जातिवंत साहिवाल गाई आणल्या. आता गटातील पशुपालकांकडे जातिवंत कालवडी आणि वळू तयार झाले आहेत. गटात १०० पशुपालक असून, बहुतांश कृषी पदवीधर आहेत. या पशुपालकांकडे सध्या ४००० साहिवाल गाई आहेत. गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. गोवंश सुधारणेच्या बरोबरीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री, गोमूत्र, शेणापासून सेंद्रिय खते, घरोघरी बायोगॅस, शेणस्लरीचा शेती आणि फळबागांमध्ये वापर सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत पुणे शहरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रास सुरुवात होत आहे. पशुपालकांना कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतून साहिवाल गोवंशाची रेतमात्राही उपलब्ध करून देत आहोत, त्यामुळे जातिवंत पैदास गोठ्यात वाढणार आहे. पहिल्या वेताच्या गाईचे प्रतिदिन सरासरी ६ ते ८ लिटर दुग्धोत्पादन आहे, पुढे ते वाढते. दुधाचे फॅट ४.५ ते ५.२ पर्यंत मिळते. केवळ दूध, तूप उत्पादनाचे उद्दिष्ट न ठेवता दूधप्रक्रिया, गोबरगॅस, गांडूळ खत, जिवामृत, दशपर्णी तसेच गोमूत्र अर्क आदींचीही निर्मिती आणि त्यातून नफा वाढ हा उद्देश आहे. ग्रामीण भागात दुधाला ६० ते ६५ रुपये, तर शहरात ८० ते ९० रुपये प्रतिलिटर दर मिळतो. तुपाची २५०० ते ३००० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते.

- डॉ. सोमनाथ माने : ९८८१७ २१०२२

वृंदावन थारपारकर क्लब

पाच वर्षांपूर्वी पुणे शहरातील चंद्रकांत भरेकर यांनी थारपारकर देशी गाईंच्या संवर्धनासाठी मित्रांच्या सहकार्याने ‘वृंदावन थारपारकर देशी काऊ क्लब’ सुरू केला. गोसंवर्धनाबरोबरीने दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, गोमूत्र, शेण आधारित उत्पादने आणि देशी गोवंश प्रसाराचे ध्येय क्लबतर्फे ठेवण्यात आले आहे. याबाबत भरेकर म्हणाले, की भूकुम (ता. मुळशी, जि. पुणे) येथे माझ्या २५ एकर क्षेत्रावरील फळबागेमध्ये थारपारकर गोसंगोपनाला सुरुवात केली.

राजस्थानमधील पशुसंवर्धन विभागाच्या परवानगीने स्थानिक पशुपालकांकडून आम्ही पहिल्या टप्प्यात १५ गाई आणि वळू आणला. पुढे टप्प्याटप्प्याने १५ ते २० गाई आणत गेलो. आता आमच्या गोठ्यामध्येच जातिवंत दुधाळ गाई आणि वळू तयार झाले आहेत. या गाईंची योग्य व्यवस्थापनात दिवसाला १२ ते १६ लिटर दूध देण्याची क्षमता आहे. दुधातील फॅट ५.४ पर्यंत आहे. आम्ही प्रत्येक गाय, वळू, कालवडीची नोंद ठेवली आहे. यामध्ये आरोग्य, दुग्धोत्पादन, लसीकरण, डीएनए टेस्ट आदींचा समावेश आहे. प्रत्येक जनावराला टॅगिंग केले आहे. दररोज १५ लिटर दुग्धोत्पादन असलेल्या गाई स्वतंत्र ठेवून त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन आणि त्यांच्यापासून जन्मलेल्या कालवडींचे संगोपन करीत आहोत. जे. के. ट्रस्ट संस्थेच्या मदतीने चार गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले.

सध्या गोठ्यामध्ये गोवंश संशोधनासाठी २५ थारपारकर, २० गीर आणि २५ साहिवाल तसेच १५ कपिला गाईंचे संगोपन करण्यात येत आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांना थारपारकर गाई, वळू देण्यात आले आहेत. प्रक्षेत्रावर डेअरीची उभारणी केली आहे. सध्या प्रतिदिन २०० लिटर दुधाचे संकलन होते. दररोज सकाळी पुणे शहरातील क्लब मेंबर्स, ग्राहकांना मागणीनुसार १ ते २ लिटर दूध बॉटल पॅक करून पोहोचविले जाते. क्लब मेंबरसाठी ९० रुपये आणि ग्राहकांना ९९ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. प्रयोगशाळेतून दूध, तुपातील घटकांची तपासणी आणि प्रमाणीकरण केले जाते.

डेअरीमध्ये दुधाच्या बरोबरीने दही, ताक, श्रीखंड, पनीर, लोणी, कुल्फी, पेढे, खवानिर्मिती केली जाते. याचबरोबरीने पंचगव्यापासून साबण, उटणे, शाम्पू, तसेच शेण, औषधी वनस्पतींच्या मिश्रणातून धूपकांडी, अगरबत्ती, दंतमंजन निर्मिती केली जाते. गोवंश संवर्धनातील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र सरकारतर्फे वृंदावन थारपारकर देशी काऊ क्लबला राष्ट्रीय स्तरावरील कामधेनू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- चंद्रकांत भरेकर - ९८२२८ ८२२५५

खिलार : महाराष्ट्राची शान...

खिलार हा राज्यातील देखणा गोवंश. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील खिलार गोपालकांनी संशोधन, संगोपनाला चालना देण्यासाठी २०१५ मध्ये ‘खिलार कॅटल ब्रिडर असोसिएशन''ची स्थापना केली. याबाबत अधिक माहिती देताना करगणी (जि. सांगली) येथील पशुधन विकास अधिकारी आणि संस्थेचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. अविनाश चव्हाण म्हणाले, की संस्थेच्या माध्यमातून जातिवंत खिलार पैदास आणि जनजागृतीवर भर दिला आहे. खिलार गोवंश शेती आणि ओढकामासाठी प्रसिद्ध आहे. खिलार गाई सरासरी प्रति दिन २.५ ते ३ लिटर दूध देतात. काही पशुपालकांकडील जातिवंत दुधाळ गाई ५ ते ७ लिटर दूध देतात. या गाईंची नोंद घेतली आहे. त्यांचा जातिवंत पैदाशीसाठी उपयोग करीत आहोत. या गोवंशाच्या संवर्धनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. खिलारमध्ये साधारणपणे नऊ उपप्रकार दिसतात. यामध्ये आटपाडी, म्हसवड, कोसा, पंढरपुरी, डफळ्या, काजळ्या खिलार असे उपप्रकार शेतकऱ्यांकडे दिसतात. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी खिलार संगोपनाकडे वळले आहेत. शेण, गोमूत्र स्लरीचा वापर फळबागांच्यामध्ये वाढला आहे. त्यादृष्टीनेही जनजागृती करत आहोत.

- डॉ. अविनाश चव्हाण : ९७६६८ ०७६५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com