Appasaheb Dharmadhikari : मौखिक निरूपणातून समाजशिक्षण

‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग’ येथून आप्पासाहेब जगभर पसरलेला हा सगळा कार्यभाग सांभाळत असतात.
Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikarisakal

‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग’ येथून आप्पासाहेब जगभर पसरलेला हा सगळा कार्यभाग सांभाळत असतात. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.

त्यांचे अमूल्य विचार ऐकून आत्मसात करणाऱ्या श्री सदस्यांवर आलेल्या प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभे करणे, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे आप्पासाहेबांचे मूळ कार्य.

भाषण आणि निरूपण या दोन शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. भाषण ऐकून बदल घडेल हे सांगू शकत नाही, परंतु निरूपण श्रवण केल्याने माणसाच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो, हे निश्चित आहे. त्यातून आप्पासाहेबांच्या मौखिक निरुपणाचा प्रसाद मिळाला, तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यात आप्पासाहेब यांचे मार्गदर्शन लाभले, त्यांना जगण्याची योग्य दिशा मिळाली आहे, हे सत्य नाकारता येऊ शकत नाही.

तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३पासून केली. ग्रंथराज श्रीमत दासबोध घराघरांत कोणी पोहोचवला असेल तर ते आहेत नानासाहेब!!!

समर्थ बैठका

श्रीमत दासबोध या ग्रंथाचा आधार घेऊन आपल्या प्रासादिक वाणीने, मौखिक निरुपणाच्या साहाय्याने नानासाहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले. आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, आजूबाजूंच्या राज्यातच नव्हे, तर भारतासह अन्य अनेक देशांमध्ये या मौखिक निरूपणाच्या साहाय्याने, वेगवेगळ्या भाषांमध्ये श्री समर्थ बैठका सुरू आहेत.

ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी त्यांचे लाखोंच्या संख्येने असलेले सदस्य हे निरूपण ऐकण्यासाठी आवर्जून जात असतात. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल, असे हे कार्य आप्पासाहेब रेवदंडा येथे बसून कसे काय करतात... हे प्रत्येकासाठी आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे. दिवसेंदिवस ही सदस्यसंख्या वाढत जात असताना दिसत आहे.

आता महाराष्ट्रात सत्कार समारंभ घ्यायचा असेल आणि तिथे सर्व सदस्यांना एकत्र करायचं असेल तर अशी एखादी जागा कुठे शिल्लक असेल का, असा विचार येतो. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील सदस्यांना या बैठकीमधून मार्गदर्शन मिळत असते. अनेक प्रकारच्या व्यसनांमध्ये अडकलेले लोक बैठकीतील उत्तम विचारांमुळे हळू हळू व्यसनांपासून दूर जातात, अशी कित्येक उदाहरणे बैठकीत ऐकायला मिळतात.

अशी कोणती ताकद मौखिक निरूपणामध्ये असावी, याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही.

ठरलेल्या दिवशी एक एक करून काही मिनिटांमध्ये १०००-२००० सदस्य एकत्र येऊन हॉल भरून जातात. निरूपण सुरू असताना तिथे एवढी शांतता असते की, आतमध्ये किती जण बसले आहेत, याचा अंदाज बाहेरून लावायचा असेल तर रांगेत लावलेल्या चपलांवरून लागू शकतो. एवढी शिस्त, एवढी शांत बसण्याची ताकद सदस्यांमध्ये कुठून येत असेल, असा प्रश्न नेहमी पडतो.

आप्पासाहेब आपल्या अध्यात्मासोबत आचरणाबद्दलसुद्धा मौखिक निरूपण देत असतात. खरोखर जो ही शिकवण अंतःकरणात घेतो, त्याचे पुढील दिवस सुगीचे असतात, यात शंका नाही. सतत मोबाईलमध्ये व्यग्र असलेली आताची तरुण पिढी आणि अध्यात्म निरूपण याचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. परंतु आप्पासाहेबांच्या बैठकीमध्ये हे चित्र एकदम उलट दिसून येते. जास्तीत जास्त तरुण मुले यामध्ये समाविष्ट झालेली दिसून येतात.

निरूपणाची अवीट गोडी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसत आहे. परमार्थ हा विषय तसा खूप गहन आहे. तो समजावून घेण्यासाठी आप्पासाहेबांची साथ कायम असणे गरजेचे आहे. अध्यात्माची, ईश्वराची योग्य ती ओळख होण्यासाठी साथ लागते ती योग्य व्यक्तिमत्त्वाची... आणि लाखो श्री सदस्यांच्या आयुष्यातील ते आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत.

श्रीमत् दासबोध हा असा ग्रंथ आहे की, त्यामध्ये एकही चित्र नाही, वरवर वाचण्याचा प्रयत्न केला तर त्याचा खरा अर्थ कळत नाही. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यावर आध्यात्मिक निरूपण मिळणे हे गरजेचे आहे. आप्पासाहेब यांचे आध्यात्मिक ज्ञान हे वाखाणण्याजोगे आहे. श्रीमत् दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी वापरलेली भाषा ही सहज कळेल अशी असली, तरी त्यामध्ये आध्यात्मिक अर्थ ओतप्रोत भरलेला आहे.

नेमका तोच अर्थ आप्पासाहेब आपल्या निरूपणातून काढून देत असतात. संसारात गुरफटलेल्या माणसांना पिंड ब्रह्मांडाची निर्मिती, मूळमाया, त्रिगुण, षड्गुणेश्वर, अष्टधा प्रकृती, शिवशक्ती, पंचमहाभूते अशा शब्दांचा अर्थ कळणे खूप कठीण आहे. हे शब्द कोणत्याही अभ्यासक्रमात सहजासहजी येत नाहीत. परंतु अतिमहत्त्वाच्या शब्दांची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, हे जाणून आप्पासाहेब यांनी मूळ ईश्वराची ओळख आपल्या निरुपणातून देण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे.

पद्‍मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेली ३० वर्षे निरूपण करत असून, अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरू केल्या आणि आदिवासी वाड्या-वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्‍तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे.

बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, आध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी मागील वर्षी ‘महाराष्ट्र भूषण’चे मानकरी ठरले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार म्हणून गेली तीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, बालसंस्कार, पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांचे प्रचंड योगदान आहे. वाढदिवसानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com