Appasaheb Dharmadhikari : समाजप्रबोधनाची चळवळ

डॉ. दत्तात्रेय नारायण अर्थात आप्पासाहेब धर्माधिकारी चार दशकांपासून मानवी समाजासाठीची कल्याणकारी कार्ये अत्यंत जोमाने, तळमळीने आणि अत्यंत निष्काम भूमिकेतून साकारत आहेत.
Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikarisakal

डॉ. दत्तात्रेय नारायण अर्थात आप्पासाहेब धर्माधिकारी चार दशकांपासून मानवी समाजासाठीची कल्याणकारी कार्ये अत्यंत जोमाने, तळमळीने आणि अत्यंत निष्काम भूमिकेतून साकारत आहेत. त्यांनी मानवी समाजाच्या उन्नयनासाठी उभारलेली कल्याणकारी कार्ये वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

जनप्रबोधन

विज्ञानाच्या प्रगतीने मनुष्याचे भौतिक जीवन सुखी केले. तथापि मनुष्याच्या अंतरंग समृद्धीसाठी मानवी नीतिमूल्यांची जोपासना करणे गरजेचे आहे, तरच मनुष्य खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य सुखी आणि समाधानी होऊ शकेल. आप्पासाहेबांनी शाश्वत मूल्यांवर आधारित शिकवणीतून प्रत्येक व्यक्तीवर सुयोग्य संस्कार घडविलेले आहेत.

यातून प्रत्येकाला आवश्यक ते मानसिक सामर्थ्य देऊन मानवी कर्तव्यांप्रती कणखरपणा दिलेला आहे. व्यक्ती सुखी तर कुटुंब सुखी आणि पर्यायाने मानवी समाज सुखी आणि समाधानी होतो, हे सूत्र जाणूनच सामाजिक जागृतीसाठी संतपरंपरेची शाश्वत शिकवण ते देत आहेत.

राष्ट्रीय एकात्मता

आप्पासाहेबांनी राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यासाठी संतपरंपरेच्या शिकवणीतून प्रत्येकाला त्याच्या अंतरी असलेल्या चैतन्यशक्तीची ओळख करून दिलेली आहे. ही ओळख झाली की, प्रत्येकाच्या ध्यानात येते की समाजव्यवस्थेतील सर्व भेद मानवनिर्मित व कृत्रिम आहेत. जन्म होताना कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा शिक्का मनुष्याच्या पाठीवर नसतो. मग द्वेषभाव, मत्सर, तिरस्कार, वैरभाव का बरे जोपासायचा? परिणामस्वरूप त्यांनी शिकवणीद्वारे परस्परांबाबत बंधुभाव व आपुलकी निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता घडवून आणलेली आहे.

महिलांचा सन्मान

समाजव्यवस्थेत कुटुंब आणि समाजामध्ये महिलांना दुय्यम स्वरूपाचे स्थान प्राप्त झालेले आहे. याची प्रमुख दोन कारणे आहेत. एक म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती आणि दुसरे म्हणजे स्त्रियांकडे पाहण्याचा पूर्वापार दूषित दृष्टिकोन. म्हणून त्या उपेक्षित जीवन जगताना आढळतात. आप्पासाहेबांनी महिलांना आत्मिक बळ देणारी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी शिकवण दिली. परिणामस्वरूप, आज त्या सबला होऊन आत्मनिर्भर झाल्या आहेत. स्त्रियांबाबतची आदराची व सन्मानपूर्वक वागणुकीची शिकवण पुरुषवर्गाला देऊन स्त्रियांना कुटुंबात आणि पर्यायाने समाजात सन्मानाचे स्थान पुनश्च प्रदान केलेले आहे.

हुंडाप्रथेचे निर्मूलन

आजपर्यंत हुंडाप्रथेच्या राक्षसाने मानवी समाजाचे अतोनात नुकसान केलेले आहे. आप्पासाहेबांनी पुरुषवर्गाला शिकवण देताना निक्षून सांगितलेले आहे की, लग्नाच्या बाजारात पुरुषाची जनावरासारखी बोली लागते, यासारखी लाजिरवाणी घटना आयुष्यात नाही, तसेच त्यांनी ‘परधन पापाय’ची शिकवण देऊन प्रत्येक पुरुषाला स्वकर्तव्याची जाणीव करून देऊन स्वावलंबी बनविलेले आहे. त्यांच्या शिकवणीचे लाभार्थी हुंडामागणी ही घृणास्पद आणि लज्जास्पद घटना मानून, तसे आचरण प्रत्यक्षात करतात.

प्रौढ साक्षरता अभियान

देशाचा प्रत्येक नागरिक त्याच्या साक्षरतेच्या पातळीवरून ओळखला जातो. साक्षरतेमुळे राष्ट्रीय एकात्मतेत भर पडते. हे जाणून आप्पासाहेबांनी शिकवण ग्रहण करणाऱ्या अनेक निरक्षर प्रौढ व्यक्तींमध्ये शिक्षण घेण्याची ओढ निर्माण केली. असे जीवन अधिक अर्थपूर्ण, स्वावलंबी व सरस असल्याचे या व्यक्तींवर बिंबविले. अशा व्यक्ती शिकण्यासाठी तयार झालेल्या पाहून आप्पासाहेबांनी खेडोपाडी, आदिवासी वाड्यांमध्ये नियमित स्वरूपाची प्रौढ साक्षरता केंद्रे विनामूल्य, विनादेणगी व विनाअनुदान सुरू केली असून ती उत्तम रीतीने कार्यान्वित आहेत.

आदिवासींच्या जीवनात स्थिरता

आदिवासींची निवासस्थाने अत्यंत दुर्गम स्थानी आहेत. ती समाजधारेच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेली असल्याने अनेक प्रकारचे अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, निरक्षरता यांना ते बळी पडत आलेले आहेत. परिणामस्वरूप, आदिवासी बांधव अत्यंत कष्टात आणि दारिद्र्यात जीवन कंठीत असतात.

असे दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांमध्ये सर्वांगाने संपन्नता यावी, यासाठी आप्पासाहेबांनी अनेक आदिवासी वाड्यांवर श्रीबैठका आयोजित केलेल्या आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे असंख्य आदिवासी बांधव परंपरागत वाईट चालीरीती, अज्ञान, विभूतिपूजा, अंधश्रद्धांपासून मुक्त झालेले आहेत.

ग्राम स्वच्छता अभियान

सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्या परिसराची स्वच्छता राखली तर अनेक प्रकारच्या रोगराईला प्रतिबंध घातला जाऊ शकतो आणि स्वतःसाठीसुद्धा प्रसन्न परिसराचा लाभ घेता येतो. आप्पासाहेबांनी शिकवणीद्वारे या जाणिवांचे बीज प्रत्येकामध्ये रुजविले. परिणामस्वरूप, अनेक गावांमधून ग्राम स्वच्छता अभियान परिणामकारक पद्धतीने राबविले गेलेले आहे.

शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप

शालेय शिक्षण घेणाऱ्या अनेक गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तरे इत्यादी साहित्याची गरज असते. केवळ परिस्थितीमुळे ते यांपासून वंचित राहतात. आप्पासाहेबांनी अशा गरजू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक ठिकाणी विनामूल्य शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू केलेले असून, ते अखंडपणे वाढत्या प्रमाणात पुढेही सुरू राहणार आहे.

या सर्व बाबींसोबत आप्पासाहेबांनी अनेक ठिकाणी विहिरी आणि कालव्यांमधील गाळ बाहेर काढणे, पाणपोया निर्माण करणे, बसथांब्यावर शेड्सची उभारणी करणे, मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरे आयोजित करणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी शिबिरे आयोजित करणे आदी अनेक समाजोपयोगी कार्ये संचालित केलेली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com