
शरीरातील प्राण : पवनपुत्र श्रीहनुमान
श्रीहनुमान जयंती साजरी होते तो आजचा चैत्र पौर्णिमेचा दिवस. ‘पवनपुत्र हनुमान की जय’ हा जयघोष सर्वांच्या परिचयाचा असतो. वायुदेवतेचे पुत्र असणारे श्रीहनुमंत हे शरीरातील प्राणवायुस्वरूप असतात. ‘यद्वै प्रणिति सः प्राणः।’ म्हणजे प्राणामुळे जीवन असते. मनुष्य जिवंत असला म्हणजे आपण प्राण आहे असे म्हणतो. निजबोध म्हणजे अस्तित्वाची जाणीवरूपी राम हा आत्मा आणि वायुपुत्र हनुमान हा प्राण, ह्या अध्यात्म शास्त्रातील उपमा लक्षात घेतल्या तर ‘जेथे राम तेथे हनुमान’ या संकल्पनेनुसार ‘जेथे जाणीव तेथे प्राण!’ हे स्पष्ट होते.
प्राण सर्वव्यापी आहे. म्हणूनच तो नित्य आणि नियमित आहे. श्रीहनुमान चिरंजीव म्हणवले जातात, ते यामुळेच. शरीरातील पंचप्राणांपैकी ‘प्राण’ हा सर्वांत महत्त्वाचा, इतर व्यान, उदानांवर प्राणाचेच आधिपत्य असते. प्राणस्वरूप श्रीहनुमंतांचा जन्म झाला आणि लगेचच त्यांच्या शक्तीचा आवाका लक्षात आला. उगवणाऱ्या सूर्यबिंबाला फळ समजून त्याने ते धरण्याचा प्रयत्न केला! तेव्हा स्वर्गाचा राजा इंद्र अक्षरशः हादरला. त्याने सूर्याकडे झेपावणाऱ्या बाल-मारुतीवर वज्रप्रहार केला. त्याने तो प्रहार चुकविला, पण त्यावेळी त्याच्या हनुवटीला मार बसला. म्हणून त्याचे नाव हनुमान किंवा हनुमंत असे पडले. हनुमंताला इजा झाल्यामुळे त्याचे वडील, अर्थात वायू कोपित झाले. क्षणभर वायूने आपली गती थांबविली. त्या क्षणी सर्व शरीराचीच काय; पण विश्र्वातील एकूणच हालचाल थांबली. वायूला प्रसन्न करण्यासाठी मेंदूतील सर्व शक्तिकेंद्रांनी, अर्थात विविध देवतांनी वायूची प्रार्थना केली. इतकेच नव्हे; तर हनुमंताला अनेक प्रकारच्या शक्ती प्रदान केल्या. त्याचे सार्वभौमत्व स्वीकारून वायूला खूष केले. तेव्हा कुठे वायू पूर्ववत झाला. चलनवलन सुरू झाले!
सर्वारंभ परित्यागी
श्रीहनुमान चिरंजीव असल्यामुळे त्यांना अंत नाही. हनुमंतांच्या शक्तीनेच सूर्याला उष्णता मिळते. आदर्श भक्ताची आणि योग्याची परमावस्था म्हणजे ‘सर्वारंभ परित्यागी!’ एकीकडे लोकसंग्रह व लोककल्याणार्थ कार्य करायचे, तर दुसरीकडे जाणीवरूपी रामचरणी लीन राहायचे, हा गुणही मिळाला. शरीराच्या ज्या भागाकडे आपण दुर्लक्ष करू, तिकडे प्राणशक्ती जात नाही. एखाद्या भागाला किंवा अवयवाला उपचार द्यायचा किंवा पुनर्जीवित करायचे असेल तर; त्याठिकाणी प्राणास निमंत्रण करून, म्हणजेच ‘प्राणिक हीलिंग’ करून उत्तम उपचार करता येतो. हनुमंत हे वायुपुत्र असल्यामुळे त्यांचे संतुलन हे तेल-मर्दनाने होते. म्हणून हनुमंतांना तेल-शेंदूर प्रिय असतो. शरीरातील वातदोषाचे संतुलन करण्यासाठी तैलाभ्यंग मसाज सर्वोत्कृष्ट ठरतो. कफदोषामुळे वायू अवरुद्ध होतो. रुई मांदाराची पाने किंवा फुले ही कफदोषनिवारक असल्यामुळे तीही हनुमंताला प्रिय असतात. महाशक्तीचे स्वरूप, वीरता, शौर्य, वीर्य यांचा मूर्तिमंत अवतार अशा श्रीहनुमंतांचा प्रिय वार म्हणजे शनिवार, यावर्षी शनिवारी श्रीहनुमान जयंती साजरी करण्याचा दुग्ध-शर्करायोग आला आहे.
भक्तशिरोमणी हनुमान
‘रामकथे’मध्ये उल्लेख आहे की, सुग्रीवाने त्याच्या सैन्यातील कोट्यवधी वानर सीताशोधार्थ अष्टदिशांना पाठविले. वीरश्रेष्ठ हनुमंताजवळ श्रीरामांनी आपल्या बोटांतील एक मुद्रिका दिली. सीताशोधाचे कार्य मुख्य प्राणरूप असलेल्या श्रीहनुमंताच्या हातूनच होणार आहे, अशी जणू श्रीरामांना खात्रीच होती. सीताशोध म्हणजेच शरीराची शोधनप्रक्रिया. प्राण हा सर्वगामी असल्यामुळे त्याच्या हातूनच हे कार्य अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि खरोखरच प्राणशक्तीरूपी श्रीहनुमानांनी सीतादेवीला श्रीरामांची अंगठी दिली आणि जीवनातील एक महत्त्वाचे कार्य पार पाडले. हनुमंत हा महावीर महाबलाढ्य, बुद्धिमान तर होताच; परंतु भक्तशिरोमणीही होता. परमात्मा आणि भक्त, मालक आणि सेवक यांच्यातील आदर्श नाते हे श्रीराम आणि हनुमंतांचे. सुग्रीव, बिभीषण वगैरे सर्वच श्रीरामांच्या आज्ञेत होते. श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर ते त्यांच्या आज्ञेनुसार आपापल्या राज्यांत परत गेले, श्रीरामांच्या इच्छेनुसार आपापले काम करू लागले परंतु जाणीवरूपी राम आणि प्राणशक्तिरूपी हनुमान या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्या नेहमी एकत्रच असाव्यात. जोपर्यंत जाणीव कार्यरत राहून चेतनाशक्ती या पृथ्वीवर कुठल्याही प्रकारे आकारत राहील तोपर्यंत प्राणाशिवाय काहीच कार्य होणार नाही. म्हणूनच जेथे रामकथा तेथे हनुमंत प्रत्यक्ष हजर असतात व त्यांच्यासाठी एक आसन सोडण्याची पद्धतही असते.
घरातील एखादे मंगलकार्य आटोपले, की आपले नातलग, आप्त निरोप घेऊन आपापल्या घरी रवाना होतात. मागे राहतात ती सगळी घट्ट आणि सख्ख्या नात्याची माणसे. हनुमंत, अर्थातच प्राण हे श्रीरामाचे इतके सख्खे सोबती होते, वनवासाच्या काळात त्यांच्या अंतःकरणात झालेली रामजागृती इतकी पराकोटीची होती, की श्रीरामाच्या सहवासातून एक क्षणभरसुद्धा दूर राहणे त्यांना नको होते. आणि म्हणून श्रीहनुमान कायम श्रीरामचरणी राहिले. परमात्म्याकडून आलेली चेतनाशक्ती अणुरेणूंना पोहोचविण्याचे काम प्राण करीत असतो. श्रीहनुमंतांना जाणिवेकडून सतत चेतनाशक्तीचा जो प्रेमवर्षाव मिळतो तो ते शतपटींनी वाढवून सर्वांपर्यंत पोहोचवतात. एकदा परमेश्र्वरप्राप्ती झाली, की तो आनंद सर्वांपर्यंत पोहोचविणे हे खऱ्या भक्ताचे काम. परमेश्र्वरी प्राप्तीचा कधी संचय करता येत नाही. तो एक कैवल्यानुभव आहे. वाटल्याने तो शतगुणित होतो. अशा तऱ्हेने शरीरातील सर्व अणुरेणूंना प्राणामार्फत जाणिवेचा स्पर्श करून देण्याचे काम हनुमान उपासनेने साध्य होते.
रामरक्षेतील कीलक!
चैतन्याचा अनुभव येण्यासाठी श्रीरामकृपा लागतेच. ध्यानामुळे, आराध्याच्या उत्कट भक्तीने एक अवस्था अशी येते की त्यात शरीरभाव व मनोभाव यांचा लय होतो, शिल्लक राहते ती फक्त जाणीव आणि या अवस्थेत निर्गुण निराकाराचा, आत्मरूप आत्मारामाचा बोध होतो. देवतेचे प्रत्यक्ष दर्शन साधकाला होऊ शकते. मूळ निर्गुण, निराकार, स्वयंप्रकाशी जाणीव म्हणजेच विष्णुरूप आणि त्यांचा साकार अवतार रघुकुलोत्पन्न राम. पवनपुत्र हनुमान हे त्यांचे परमभक्त. म्हणूनच रामरक्षेमध्ये हनुमंताला कीलक (क्ल्यू- किल्ली) हे स्थान दिले आहे. कारण त्यांच्या कृपेनेच श्रीरामापर्यंत प्रवेश मिळून रामापर्यंत पोचता येते. ‘देव भावाचा भुकेला’ तितकाच हनुमानही श्रीरामसहवासाचा भुकेला आहे. प्राणांची चेतनेशी आणि जाणिवेशी झालेली ही तादात्म्यता आहे. रामकथेला भौगोलिक बंधन नाही. ती जातपात आणि भाषेच्या बंधनांपलीकडची असून, त्रिकालाबाधित सत्याच्या अस्तित्वासारखी आहे. जगात कुठेही जाणीव आणि प्राण, जाणीव आणि शरीर, म्हणजेच सीता, राम, हनुमान यांच्या लीला अखंड अनुभवाचा विषय राहतील. श्रीहनुमानांसारखे भक्त भक्तीची व्याख्या सोपी करतात. भक्ती नेमकी कशी करायची, तर हनुमानासारखी. हनुमानांचा अंतरात्मा श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी इतका व्यापलेला होता, की त्यांच्या हृदयात दुसऱ्या कशाला स्थानच नव्हते. अशा अवस्थेला पोचलेल्या भक्ताला श्रीराम आशीर्वाद देणारच. त्याच्यावर रामकृपा होणारच. आपणही या परमभक्ताची उपासना केली तर त्यांच्या आशीर्वादामुळे मोहमायारूपी सागराला उल्लंघून परमात्म्याने सोपविलेले कार्य पूर्ण करण्यास समर्थ होऊ.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखन संग्रहातून.)
Web Title: Article Writes On Shri Hanuman Jayanti
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..