Appasaheb Dharmadhikari : समर्थ विचारांचे पाईक

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांची ज्येष्ठ निरूपणकार ही ओळख.
Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikarisakal

- अरुणचंद्र शं. पाठक

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांची ज्येष्ठ निरूपणकार ही ओळख. त्यांच्या समाजसेवेसाठी विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरणविषयक जाणिवा यातून हाती घेतलेले वृक्षारोपण व वनराई संवर्धनाचे काम, सार्वजनिक स्वच्छता आणि विशेषत्वाने नोंद करावी, असे व्यसनमुक्ती क्षेत्रातील त्यांचे काम!

त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने सहा वर्षांपूर्वी (२०१७मध्ये) त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मान केला, तर मागील वर्षी (२०२३) राज्य सरकारने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरविले. समर्थ रामदासांच्या विचारांचे पाईक असलेल्या आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा हा लेखाजोखा...

‘कोणाही जीवाचा न करो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।’ या उदात्त व व्यापक विचाराचा संस्कार त्यांनी समाज मनावर रुजवला. महाराष्ट्रभूषण पुरस्कार नानासाहेबांना मिळाला तो स्वीकारण्यासाठी नानासाहेब हयात नव्हते. आप्पासाहेबांनी तो स्वीकारला. या सोहळ्याला ४० लाखांहून अधिक लोक जमले होते.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील हे कुटुंब गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम करत. तेव्हा दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांच्याकडून ‘धर्माधिकारी’ ही सन्माननीय पदवी मिळाली. तेव्हापासून शेंडे कुटुंबीय धर्माधिकारी या नावाने ओळखले जातात. समाज व धर्म जागृतीची चारशे वर्षांची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.

श्री बैठकीचे स्वरूप व परिणाम

साधारणपणे मी २०११च्या सुमारास कल्याणला राहत होतो. तेव्हा रिक्षाने रेल्वे स्टेशनला जात असे. रिक्षाचालक प्रामुख्याने आदिवासी कुटुंबातले तरुण असत. त्यांच्या चर्चेतही बैठकीचा विषय असे. आपण आपले व्यवहार चोख केले पाहिजेत. त्यात प्रामाणिकपणा असला पाहिजे हा त्यांचा विषय असायचा तेव्हापासून माझे कुतूहल या बैठकांविषयी वाढले.

याच सुमारास उच्च न्यायालयातील काही कार्यालयीन कामासाठी जात असे, तेव्हा माझ्या कार्यालयातील शिपाई लक्ष्मण बागडे त्यांनी एक दिवस मला सांगितले की समोरच्या टेबलवर असलेला क्लर्क हा बैठकीतला सदस्य आहे. तेव्हा आपल्या कामामध्ये कोणतीही गडबड होणार नाही. फाईलमधील प्रत्येक पेपर व्यवस्थित तपासून तो मदत करेल.

परस्परांशी ओळखही नसताना कपाळावरील लावलेल्या विशिष्ट प्रकारच्या गंध आणि संवादाची सुरुवात जय सद्‍गुरूंच्या उच्चाराने करण्याची पद्धत यामुळे बागडे यांनी काढलेले उद्‍गार अक्षरशः खरे होते. ते समाजाच्या सर्व स्तरांमध्ये, विशेषतः आदिवासी व झोपडपट्टीत असलेल्या कुटुंबामध्ये परस्परास असलेला विश्वास धर्माधिकारी यांच्या बैठकीतून निर्माण झाला.

यातून मी अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आले नानांच्या प्रेरणेतून गावोगावी, वाड्यावस्त्यातून आठवड्यातून एक ते दोन वेळा बैठका होतात. बैठक म्हणजे तीन तासांचा शिस्तबद्ध सत्संग. एका बैठकीत २०० नामधारक सहभागी असतात. मनाचे श्लोक, दासबोधाचा मंगलाचरणाचा एक समास आणि त्यानंतर गेल्या बैठकीत झालेल्या समासाच्या पुढील समासावर निरूपण असा बैठकीचा साधारण क्रम असतो.

आळीपाळीने क्रमाने एक एक साधकाने दासबोधातील एका समासाचे वाचन करायचे. असे या बैठकीचे स्वरूप असते. यामुळे सामाजिक एकता, समरसता तयार होते. जातीपातीच्या, गरीब-श्रीमंतीच्या पलीकडे जाऊन एक विश्वास व परस्पर स्नेह उत्पन्न होतो. दूरवर पसरलेल्या कोकणातील समाजाला संघटित, व्यसनमुक्ती करून त्यांच्यावर संस्कार तसेच समाजप्रबोधन करण्याचे काम, समर्थांच्या दासबोधावर प्रासादिक निरूपण करून केले जाते.

यासाठी शेकडो खेडोपाडी व आदिवासींचे पाडे नानांनी व आप्पासाहेबांनी धुंडाळले आहेत. माणसे जोडली आहेत. या कामाचे वैशिष्ट्य असे, की कुठल्याही भागातील लहान-मोठ्या बैठकीमध्ये केंद्राकडून निरोप मिळाल्यावर नामधारकाचे नाव (बैठकीचा सदस्य) स्वतः उठून बैठकीचे नेतृत्व व निरूपण करतो.

सर्वसाधारण वाटणारा माणूस आपला दैनंदिन व्यवहार सांभाळत असताना सहजपणे दोन अडीच तास दासबोधातील समासावर निरूपण करतो, हे विशेष. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्रपणे बैठका असतात. आप्पांच्या काळात बालवयापासून संस्कार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. धर्माधिकारी कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे एवढी मोठी परंपरा असताना महाराज किंवा महंत म्हणून या आवेशात ते कधीही वागले नाहीत किंवा व्यक्तिगत मालमत्तेमध्ये फार वाढ झाली नाही.

नानासाहेब असतील आप्पासाहेब असतील किंवा त्यांचा मुलगा सचिन असेल... ते सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारी माणसे जोडली गेली. कर्मकांड, अंधश्रद्धा, पलायनवाद यांपासून दूर असलेले तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहाराची व प्रामाणिकपणाशी बैठकीची घातलेली सांगड त्यामुळे समर्थांचा विचार तळापर्यंत पोहोचला. मराठी व अन्य विविध भाषा उदाहरणार्थ हिंदी, तमिळी, बंगाली भाषांमधून वेगवेगळ्या क्षेत्रात महिला व पुरुष निरूपण करतात. त्यांच्या या कामामुळे विविध पुरस्कार मिळणे हे फारसे कौतुकाचे राहिलेले नाही.

धर्माधिकारी यांनी समर्थांची प्रेरणा समोर ठेवून त्यांनी लिहिलेल्या दासबोधाचे आजच्या संदर्भातील स्वरूप स्पष्ट करून सांगितले. समर्थ रामदासांनी केलेली राष्ट्रजागृती असामान्य होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, मारुती स्तोत्र, गणपती व अन्य देवतांच्या आरत्या या समर्थांच्या सर्व साहित्याचा आप्पासाहेबांनी सखोल अभ्यास केला आहे.

समर्थांनी प्रेरणा निर्माण केली, त्याप्रमाणे धर्माधिकारी कुटुंबीयांनी सलग तीन पिढ्या सामाजिक कार्यातून उपेक्षित समाज, मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलेला समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागृती निर्माण केली. समर्थांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे कार्य धर्माधिकारी कुटुंब करत आहे. आपले काम लोकांपर्यंत जात असताना जनमाणसात असलेली श्रद्धा अधिक प्रभावीपणे रुजविण्यासाठी समाज प्रबोधनाची कास धर्माधिकारी यांनी धरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com