Bhagavad Gita : यज्ञाचे प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagavad Gita Types of Yajna Fasting vow worship Pranayama

उपवास, व्रतवैकल्ये, उपासना इत्यादी करणे म्हणजे तपोयज्ञ. प्राणायाम म्हणजे सुद्धा यज्ञच.

Bhagavad Gita : यज्ञाचे प्रकार

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।।

तत्त्वदर्शी ज्ञानी गुरू प्रणिपात केला असता, प्रश्न विचारल्यावर आणि सेवा केल्यावर ज्ञानाचा उपदेश करतात. बालमित्रांनो, यज्ञाचे अनेक प्रकार श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. जसे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याययज्ञ, ज्ञानयज्ञ, प्राणायामयज्ञ इत्यादी. आपल्या धनाचा दुसऱ्याच्या हितासाठी वापर करणे हा द्रव्ययज्ञ.

उपवास, व्रतवैकल्ये, उपासना इत्यादी करणे म्हणजे तपोयज्ञ. प्राणायाम म्हणजे सुद्धा यज्ञच. आपण आपल्या नकळत श्वास घेतो आणि सोडतो. त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचे नियमन करणे हा प्राणायामयज्ञ. तुम्ही करत असलेला अभ्यास, तुमचे शिक्षण म्हणजे स्वाध्याय आणि तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला केलेले अध्यापन हा ज्ञानयज्ञ.

तुमची आई स्वयंपाक करते तोही यज्ञच. वृक्ष सर्वांना फुले, फळे, लाकूड, सावली अर्पण करतात. हा वृक्षांनी परमात्म्यासाठी केलेला यज्ञ आहे. हे सृष्टिचक्र सुरू राहावे म्हणून प्रत्येकाने केलेला त्याग हाच खरा यज्ञाचा अर्थ आहे. श्रीकृष्ण सांगतो, या विश्वातील प्रत्येक घटक ब्रह्मच आहे आणि त्या ब्रह्माच्याच अस्तित्वात हे सर्व कर्मरूपी यज्ञ सुरू असतात.

हे ज्ञान झाले म्हणजे मोक्ष मिळतो. ते ज्ञान मिळवण्यासाठी काय करावे लागते ते पाहूया. सर्वप्रथम मला ज्ञान हवे आहे अशी तीव्र इच्छा मनात असायला हवी. नंतर तत्वदर्शी, ज्ञानी गुरूंकडे जाऊन अत्यंत नम्रपणे त्यांना प्रणाम करायला हवा.

आपल्या शिक्षकांविषयी अतिशय आदराची भावना विद्यार्थ्यांमध्ये असेल, तरच ते मनापासून शिकवतात. म्हणजे नम्रपणा ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी. गुरूंना उत्सुकतेने सरळ आणि निष्कपट मनाने विविध प्रश्न विचारून आपले शंका निरसन करून घेणे ही दुसरी पायरी.

आणि सेवा ही तिसरी पायरी. गुरुसेवेमुळे शिष्याला खूप काळ गुरूंचा सहवास लाभतो. आणि गुरूंचे वागणे बोलणे इतर शिष्यांना शिकवणे या सर्वांचेच प्रायोगिक ज्ञान शिष्याला मिळते. आणि तो ज्ञानसंपन्न होतो. असा ज्ञानसंपन्न शिष्य अर्जुनाने व्हावे, असे श्रीकृष्ण येथे सुचवतो.

- श्रुती आपटे

टॅग्स :educationculture