
Datta Jayanti 2022: दत्तजन्माची पौराणिक कथा काय आहे?
दत्त जयंती हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. याला दत्तात्रेय जयंती असेही म्हटतात. या दिवशी भगवान दत्तात्रयचा जन्म झाला होता. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली देवता दत्तात्रेय यांच्या जन्मदिवस उत्सव या दिवशी साजरा करतात.
सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त गुरु मानले जातात. दत्ताची उपासना करण्याचे तीन प्रकार सांगण्यात येतात. गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून ही उपासना होते. यंदा दत्त जयंती ७ डिसेंबर २०२२ रोजी बुधवारी साजरी होणार आहे.
आता बघू या दत्तजन्माची पौराणिक कथेविषयी सविस्तर माहिती...
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली.
त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.
अजून एक गोष्ट म्हणजे विष्णूच्या २४ अवतारांमधील सहावा अवतार भगवान दत्तात्रेयाविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायांत नितान्त आदर व श्रद्धाभाव आहे. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूच्या २४ अवतारांमधील सहावा अवतार मानला जातो. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे, ज्यांनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे.