
‘आरोग्य वारी’ ला मिळणार देहू संस्थानची साथ
पुणे : दोन वर्षांच्या खंडांनंतर आषाढी वारी होत आहे. वैष्णवजन पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. जवळपास अठरा दिवसांचा पायी प्रवास ते करणार आहेत. त्यातून आरोग्य संगोपनाचा संदेश देण्यासाठी ‘साथ चल’ उपक्रमाद्वारे ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स ‘आरोग्य वारी’ घेऊन येत आहे. त्यास देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचीही साथ मिळाली आहे.
‘वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची’ ही संकल्पना यंदाच्या ‘साथ चल’ उपक्रमाची आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुदृढ आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याचा धडा कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत सर्वांना मिळाला आहे. त्यामुळेच वारीत सहभागी वारकऱ्यांसमवेत भाविकांनीही वारीत सहभागी होऊन दोन पावले चालावीत, आपल्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश ‘आरोग्य वारी’तून दिला जाणार आहे. यात देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, सोहळाप्रमुख, विश्वस्त, मानकरी सहभागी होणार आहेत.
उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. २०१८ व २०१९ मध्ये ‘साथ चल’ वारी झाली होती. मात्र, २०२० व २०२१ या दोन वर्षात कोरोनामुळे निर्बंध असल्याने ‘साथ चल’ वारी झाली नव्हती. आता तीन ठिकाणी हा राबविण्यात येणार आहे. त्यात सहभागी होऊन प्रत्येकाने दोन पावले चालायची आहेत. या निमित्ताने वारीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपले आरोग्य संगोपनाची शपथ घ्यायची आहे. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर आरोग्य वारी निघणार आहे.
आरोग्य वारी का?
वारीमध्ये सहभागी वैष्णवांसोबत दोन पावले चालण्याचा आनंद
‘साथ चल’ उपक्रमाच्या निमित्ताने चालण्याचा व्यायाम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती
स्वतःसह समाजहितासाठी स्वच्छतेचा सामूहिक संदेश
कुठे व किती वाजता सहभागी व्हाल?
बुधवार (ता. २२ जून) ः मोरवाडी चौक, फिनोलेक्स कंपनी प्रवेशद्वार ते एचए कॉलनी प्रवेशद्वार भुयारी मार्गापर्यंत चालणे व दोन्ही ठिकाणी शपथ : १.२ किमी : सकाळी ६
शुक्रवार (ता. २४ जून) ः महात्मा गांधी बसस्थानक, पुलगेट, पुणे कॅम्प येथे शपथ ः सकाळी ६.३०
देहू संस्थानचे पदाधिकारी म्हणतात...
‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्स केबल्सतर्फे आषाढी वारीत ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत कुटुंब व समाजाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ‘वारी विठुरायाची आणि आरोग्याच्या संगोपनाची’ हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे.
- नितीन महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू
चांगले आरोग्य असेल तर आपण महा-भयंकर कोरोना सारख्या रोगावरही मात करू शकतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी, सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि पर्यावरण चांगले राहावे, यासाठी नागरिक व भाविकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.
- माणिक महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख,
आध्यात्मिक वाटेवर चालताना उत्तम आरोग्य आवश्यक आहे. त्यासाठी चालणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. ‘सकाळ’चा ‘आरोग्य वारी’ हा उपक्रम समाजाला नक्कीच प्रेरणादायी आहे. आरोग्य संगोपनासाठी वारीत चालण्याचा आनंद घ्यावा.
- विशाल महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज संस्थान
‘सकाळ माध्यम समूहा’ने २०१८ आणि २०१९ या वर्षी वारीमध्ये ‘साथ चल’ उपक्रम राबविला होता. त्यात ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची’ हा संदेश दिला होता. यंदाच्या वारीत दिला जाणारा आरोग्यासाठीचा संदेश उत्तम आहे.
- संतोष महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख, संत तुकाराम महाराज संस्थान
आपण कोरोनाच्या संकटावर मात केली. त्यासाठी उत्तम आरोग्यच कारणीभूत आहे. यापुढेही आरोग्य चांगले राहण्यासाठी आचार, विचार, आहार, व्यायामाची गरज आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत ‘आरोग्याचे संगोपन करा, असा संदेश देण्यासाठी सहभागी व्हावे.
- संजय महाराज मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज संस्थान
वारकरी सांप्रदायाचे कायम-स्वरूपी व वारीतील दैवत विठ्ठल-रुक्मिणी आहे. त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. त्यामुळेच संतांचे व परमेश्वराचे नामस्मरण करत आषाढी वारीत सर्वजण सहभागी होतात. आपणही उत्तम आरोग्यासाठीही आपण दोन पावले चालणे आवश्यक आहे.
- अजित महाराज मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज संस्थान
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने आपल्या व समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हेच खरे सत्य आहे. यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ ‘साथ चल’ उपक्रमांतर्गत ‘आरोग्य वारी’ संकल्पना राबविणार आहे. हा स्तुत्य व चांगला उपक्रम आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे.
- भानुदास महाराज मोरे, विश्वस्त, संत तुकाराम महाराज संस्थान
Web Title: Dehu Sansthan Support Of Ashadhi Wari Sakal Media Group Finolex Cables
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..