युरोपप्रमाणे हवा शहरांचा विकास

आपल्याकडेही शहरे विशेषत: नदीकाठचे सुंदर आणि विकसित होऊ शकतात
Development of cities like Europe
Development of cities like Europe

दिग्दर्शक यश चोप्रा यांचे कोणतेही चित्रपट पाहा. नायक-नायिकांपेक्षा चित्रपटातील निसर्गदृश्‍यांचे अप्रुप वाटले आहे. विशेषत: स्वच्छ आणि टापटिपपणा, सुंदर बगीचे, नयनरम्य नदीकाठ, हिमशिखरे पाहून सर्वांनाच युरोप आणि विशेषत: स्वित्झर्लंडचे आकर्षण वाटू लागते. आपल्याकडेही शहरे विशेषत: नदीकाठचे सुंदर आणि विकसित होऊ शकतात. पुण्याजवळील लवासाचे उदाहरण घेतले तर युरोपातील अनेक शहरात फिरताना लवासातच फिरतोय की काय, असा भास होऊ लागतो.

जर्मनीत गेली अनेक वर्ष वास्तव्य करत मनात सतत एक विचार येतो की आपला देश युरोपसारखा समृद्ध होऊ शकेल काय? यावर उत्तर असे मिळते की, नदीकाठच्या गावांचा, शहरांचा विकास केल्यास एक ना एक दिवस आपला देश समृद्ध आणि सुंदर असेल. सध्या सुट्टीनिमित्त इटली आणि स्वित्झर्लंड येथे जाणे झाले, लाऊटरब्रुनें, इंटरलाकेन, लेक कोमो, वरेना, बेलाजीओ अशी अनेक नदीकाठावर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली सुंदर शहरे आणि गावे पाहून पुण्यातील लवासाची आठवण येते. इटलीत मिलान शहरानजिक ऑडिट करण्यासाठी गेलो असता तेथे लवासाचा विषय निघाला आणि त्या इटालियन व्यक्तीने मला लवासाची आठवण करून दिली. इटालियन व्यक्तीच्या तोंडून लवासाचे नाव ऐकून सुखद धक्का बसला. म्हणजे भारतासारख्या प्रगतिपथावर असलेल्या देशात भविष्यातले ते शहर आहे.

मी जेव्हा भारतात येतो तेव्हा लवासाला भेट देतो. कारण युरोपची शहरे पाहताना लवासाबद्दल आकर्षण वाटू लागते. आपल्या देशात कोणीतरी एक सुंदर शहराचे किंवा गावाचे स्वप्ने पहिले आणि ते साक्षात् साकारले देखील. जर्मनीत आल्यापासून माझे मतपरिवर्तन झाले आणि समजले कि ज्याने कोणी हे शहर वसविण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती दूरदृष्टी ठेवणारी असावी. आज युरोपात अनेक गावे आणि छोटी शहरे पाण्याभोवती विकसित झाली आहेत. इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांत लवासासारखी शहरे पाहायला मिळतात.

अर्थात लवासा उभे करण्याची प्रेरणा युरोपातील निसर्ग आणि नदीकाठावर वसलेल्या शहरापासून मिळाली असावी. पण सध्या अर्धवट काम राहिल्याने लवासाची आजची परिस्थिती क्लेशदायक आहे. याचे कारण म्हणजे आपल्या देशात असा एक पक्का समज आहे कि, कोण व्यक्ती करतोय केव्हा बोलतोय आणि तो कुठल्या विचारधारेचा आहे, यावर अवलंबून आहे. पण त्याजोडीला हा विचार कधीच केला जात नाही की तो बरोबर आहे की चूक. तो बरोबर असेल आणि सध्याच्या सत्तेमध्ये भागीदार नसेल तर त्या चांगल्या विषयाला केराची टोपली दाखविली जाते.

भविष्यात भारताची प्रगत देशांमध्ये गणना होईल तेव्हा लवासाचा उल्लेख आवर्जून होईल. युरोपातील शहरे पाहण्यासाठी भारतातून लाखो रुपये खर्च करून नागरिक येतात. पण या मंडळींना लवासाची माहिती दिल्यास, त्यातील बहुतांश लोक लवासाकडे वळतील. यानुसार भारतातील पैसे देशातच राहील आणि पर्यटनाला देखील वाव मिळेल.

समतोल हवा

आपल्या देशातही युरोपच्या धर्तीवर नदीकाठचे शहरे विकसित होऊ शकतात. जसे ठराविक लोकसंख्येमागे डॉक्टर आणि हॉस्पिटल्स तसेच शाळा, विद्यापीठ, आयटी पार्क म्हणजेच ज्या शहरात राहतोय तेथेच नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतील अशी शहरे. उच्च दर्जाचे रस्ते, फुटपाथ, स्वच्छता ठेवत शहराची स्वतःची आधुनिक सिव्हिक सिस्टिम विकसित करणे, जेणेकरून निसर्ग आणि शहरीकरणाचे समतोल राखला जाईल. लवासा शहराला गती मिळाली तर त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक शहरे देशात वसविली जाऊ शकतात. मी तर असे म्हणतो, की राज्य आणि केंद्र सरकारने असे शहर ताब्यात घेऊन लवासा पुन्हा एकदा उभे करून देशापुढे भविष्यातील शहराचे उदाहरण समोर ठेवावे. यामाध्यमातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.

यश चोप्रांचा स्वित्झर्लंडमध्ये पुतळा

भारतातील बॉलिवूडचे लोक चित्रिकरणासाठी युरोपाची निवड करतात. ती मंडळी देखील युरोपपेक्षा लवासाला पसंती देतील. स्वित्झर्लंड सरकारने याच कारणामुळे इंटरलाकेन येथे यश चोप्रा यांचा तीनशे किलोचा ब्रॉन्झचा पुतळा बसविला आहे. यश चोप्रा यांनी अनेक शूटिंग युरोपात केले आणि त्या कारणांमुळे लाखो भारतीय युरोप पाहायला येतात. भारतातही लवासा प्रकल्पातून प्रेरणा घेऊन अशी शहरे उभी राहिली तर देशाची प्रतिमा जगात उंचावेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com