esakal | स्मरण संस्कृतीचे... : सोम उपासना I Sanskruti
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Balaji Tambe

स्मरण संस्कृतीचे... : सोम उपासना

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

महाप्रतापी अर्जुनाला ऐनवेळी प्रश्न पडला, ‘मी युद्ध का करू? यश मिळालं तरी त्याचं काय करू?’ भर कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्‌गीतेचा उपदेश केला आणि कर्मयोग समजावला. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी आपल्यालाही भगवद्‌गीतेवर आधारलेली ‘सोम’ उपासना दिलेली आहे. श्रीगुरुजी सांगत, ‘स्वर्गात देव सोमपान करतात, आपल्या शरीरातही सोमजल (सेरेब्रो स्पायनल फ्लुइड) असतं. मेंदूतील देवतांना सोमपान करता यावं, पर्यायाने आरोग्य, समृद्धी, समाधान व तेजस्वितेचा लाभ व्हावा यासाठी असते सोम उपासना’.

सोम म्हणजे संतुलन ॐ मेडिटेशन. हिचा मूळ गाभा आहे ॐकार. आज आत्मसंतुलन जेथे उभं आहे ती जागा श्रीगुरुजींना पाहता क्षणी आवडली. पहिल्यांदा या जागेत आल्या आल्या ते सरळ एका ठिकाणी जाऊन थांबले आणि म्हणाले, ‘ॐकाराची प्रतिष्ठापना होईल तो हा बिंदू’! आणि खरोखरच १९८९मध्ये त्याच ठिकाणी जगातलं पहिलं ॐकार मंदिर उभं राहिलं. तेव्हापासून आजपर्यंत येथे ॐकार उपासना अव्याहत, एका दिवसाचाही खंड न पडता सुरू आहे.

श्रीगुरुजी म्हणत, ‘ॐ हा प्रणव आहे, परमपुरुष परमात्म्याचे स्पंदनरूप आहे. नादानुसंधानातून उच्चारलेला ॐ मस्तकात पोचला की त्याचं रूपांतर पुन्हा प्रणवात म्हणजे प्राणशक्तीत होतं आणि ती संपूर्ण शरीराला मिळते’. त्यांनी म्हटलेला ॐ ऐकताना मस्तकामध्ये खरोखरच स्पंदनं अनुभवता येतात. दिवसभर काम करून कितीही थकवा आलेला असला, मन तणावग्रस्त झालेलं असलं, तरी ॐ मंदिरात श्रीगुरुजींच्या आवाजातील ॐ ऐकण्याने ताजेतवाने व्हायला होतं.

सोम उपासना ही याच्याही पुढची उपासना. श्रीगुरुजी म्हणत, ‘सूर्यापासून आरोग्य, अग्नीपासून समृद्धी, महादेवांकडून ज्ञान आणि जनताजनार्दनाच्या सेवेतून मोक्ष यांचा अनुभव सोम उपासनेतून मिळू शकतो’. मात्र, ‘उपासनेला दृढ चालवावे’ हे ध्यानी ठेवावं लागतं. श्रीगुरुजी म्हणत, कमाईतून १० टक्के समाजाला देणाऱ्याला उर्वरित ९० टक्के पैशांपासून आनंद मिळतो, तसंच ५ टक्के उपासनेसाठी आणि ५ टक्के वेळ संधी मिळेल तेव्हा सत्संगासाठी वापरणाऱ्याला उरलेला ९० टक्के वेळ परमसुख देतो. सोम उपासनेसाठी साधकाला रोज एक तास म्हणजे दिवसातील ५ टक्के वेळ द्यायचा असतो, मात्र तो दिवसभरात ३ ते ४ वेगवेगळ्या वेळी द्यायचा असल्याने सोम उपासना सोपी आहे, १० वर्षांवरील कोणालाही करता येते. यात ॐकारासह अग्निमंत्र, ज्योतिध्यान, योग, प्रार्थना, नवग्रहस्तोत्र वगैरेंचा समावेश असतो. यासाठी श्रीगुरुजींची ‘सोम’ सीडी उपलब्ध आहे, गाना वगैरे ॲपवरही ती ऐकता येते. अधिक मार्गदर्शनासाठी त्यांनी लिहिलेले ‘सोम-कम्युनिकेशन विथ्‌ द सेल्फ’ हे पुस्तक उपलब्ध आहे.

नियमित सोम उपासनेमुळे नैराश्य, चिडचिड, प्रकृती अस्वास्थ्य दूर झाले, उत्साह वाढला, चांगली नोकरी मिळाली, अडचणीमध्ये अनपेक्षित मदत मिळाली असे अनेकांचे अनुभव आहेत. उपासनेचा एक तास सुखासमाधानासाठी, आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. कारण यामुळे उर्वरित काळातील कार्यक्षमता वाढते, एकाग्र मनामुळे वेळेचा अपव्यय टळतो. जमीन, सोन्यानाण्यात केलेली गुंतवणूक एक ना एक दिवस सोडून जायचेच आहे. परंतु वेळेची ही गुंतवणूक कायम साथ देईल.

लाइफ इन् बॅलन्स

२०१९-२०मध्ये संपूर्ण जगाने अकल्पनीय गोष्टी अनुभवल्या. पॅन्डेमिकच्या सावटाखाली संपूर्ण जग एकाएकी थांबलं, जणू प्रत्येकालाच आपलं काय चुकलं, याचा विचार करण्याची संधी मिळाली. श्रीगुरुजी म्हणत, ‘कोरोना आला तो योगायोगाने नाही. मानवाने केलेला निसर्गाचा ऱ्हास, कमी झालेली माणुसकी, वाढता स्वार्थ, नीतिमत्तेची पायमल्ली, गुरुजनांचा अनादर अशा अनेकानेक कारणांमुळे आचार-विचारांचं जे असंतुलन झालं, त्यातून कोरोना आला. यातूनही मनुष्य काही शिकला नाही, बदलला नाही तर होणारे परिणाम भयंकर असतील.’

बदल कधीच एकाएकी होत नाही. सकारात्मक बदल होणं तर अजूनच अवघड असतं. पण यासाठीच श्रीगुरुजींसारखे असामान्य, द्रष्टे व्यक्तिमत्त्व परमेश्र्वराने योजलेलं असतं. ‘लाइफ इन्‌ बॅलन्स’ हा त्यांचा प्रकल्प याचीच साक्ष देतो.

पुन्हा एकदा विज्ञान व अध्यात्म यांच्यात सांगड घालता यावी, आधुनिक सुखसोयींसह जीवनात संस्कृतीला स्थान मिळावं, भौतिकतेला श्रद्धेची, प्रेमाची जोड मिळावी यासाठी हा प्रकल्प आहे.

यात विचारांपेक्षा आचाराला, कृतीला महत्त्व आहे. श्रीगुरुजी सांगत, ‘विचारांना नेहमी शास्त्राचे व कृतीचे पाठबळ असावं लागतं. नुसत्या शब्दांनी मनाला समजावणे अवघड असते, कारण मनाची इंद्रियांकडे ओढ अधिक. एखाद्या छान विषयावर प्रवचन ऐकल्यावर ऐकणारा भारावून जाईल, स्वतःत बदल व्हायला हवा हे पटेल, परंतु ते प्रत्यक्षात येईलच असं नाही. कळतं पण वळत नाही हे जे आपण म्हणते ते हेच. मात्र मनाच्या नकळत, संस्कृती सांभाळण्याच्या किंवा एखाद्या संस्थेत, प्रकल्पात सहभागी असण्याच्या निमित्ताने ज्या कृती केल्या जातात, त्या हळूहळू अंगवळणी पडतात आणि कृतींमधला संदेश पेशींपर्यंत पोहोचतो. श्रीगुरुजी म्हणत, ‘आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी पेशीच असते. परमात्म्याची जाण व्यक्तीपेक्षा पेशीलाच जास्त असते, कृतीमुळे सरळ पेशीपर्यंत पोचलेला संदेश अंतप्रेरणेत रूपांतरित होतो. आपल्या प्रार्थनांचे, विचारांचे तरंग शक्तिवान होतात. यातून संपूर्ण विश्र्वात सकारात्मक बदल होऊ शकतो.’

या पार्श्र्वभूमीवर ‘लाइफ इन्‌ बॅलन्स’मध्ये मुख्य सहा मॉड्यूल्स (विभाग) व प्रत्येक मॉड्यूलमध्ये आठ क्रिया आहेत. उदा. भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वीदेवतेची क्षमा मागणे, पाणी बसूनच पिणे, दिवसभरात एका तरी गोष्टीची प्रशंसा करणे वगैरे. यातून वैयक्तिक आरोग्याबरोबर परिवारासह दृढ संबंध, निसर्गाबरोबर जवळीक, समाजाप्रती कृतज्ञता यासारख्या अनेक गोष्टींचा लाभ होऊ शकतो.

श्रीगुरुजी म्हणत, ‘संपूर्ण लोकसंख्येच्या १० टक्के व्यक्ती यात सहभागी झाल्यास पुन्हा रामराज्य उभं राहील’. तेव्हा आपण सर्वांनी या प्रकल्पात सहभागी व्हावं, परिवार व मित्रमंडळींनाही प्रेरित करावं, हे संतुलनकडून आवाहन!

loading image
go to top