esakal | नंदीरूढा शैलपुत्री
sakal

बोलून बातमी शोधा

Navdurga Navshakti

नंदीरूढा शैलपुत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. कल्याणी हर्डीकर

नवदुर्गांचा उत्सव म्हणजे नवरात्र. शक्तिउपासनेचा हा काळ. त्यानिमित्ताने माहिती घेऊया, नवदुर्गा, नवशक्ती, आदिमातेची...

अमरकोषात पार्वती देवीची एकूण २४ नावे आहेत. शैलपुत्री, हैमवती, दाक्षायणी, सती, पार्वती ही नावे तिची जन्मकथा सांगतात; तर शिवा, भवानी, रुद्राणी ती शिवाची पत्नी आहे, हे सांगतात. कात्यायनी, दुर्गा, चंडिका, अंबिका ही नावे तिने राक्षसवधासाठी घेतलेल्या रूपनावांकडे आपले लक्ष वेधून घेतात. महिषासुरमर्दिनी किंवा महिपमर्दिनी हेही पार्वतीचे रूप. वैदिक वाङ्‌मयात पार्वतीची अंबिका, उमा, हैमवती ही नावे आलेली आहेत, परंतु शिवपत्नीवाचक नावे वैदिक वाङ्मयात नाहीत. पौराणिकांनी मात्र गौरीसकट बाकी सर्व नावे शिवपत्नी म्हणूनच रूढ केली.

शिवशंकरांप्रमाणे माता गौरी आणि माता शैलपुत्रीचे वाहनही नंदी. नवदुर्गामध्ये पहिली दुर्गा म्हणजे शैलपुत्री. पर्वतराज हिमालयाची ही ज्येष्ठ कन्या. नवरात्र पूजनात प्रथम तिची पूजा केली जाते. उपासनेसाठी तिला प्रथम वंदन केले जाते. तिचे वाहन नंदी म्हणजे कामधेनुचा पुत्र. नंदी बैल म्हणजे वृषभ. वृषभ हा समृद्धीचा, सशक्त पौरूषाचा प्रतीक. वृषभचा अर्थ वर्षाव करणारा असाही होतो. वृषभ हा शिवाचा प्रमुख द्वारपालही होता. शिवसहस्त्रनामामध्ये शिवाचे एक नाव म्हणूनही वृषभाचा उल्लेख येतो, रामायणात वृषभाची कथा आहे. रामायणातला वृषभ कुरूप आहे. शरवनात कार्तिकेयाच्या जन्मस्थळी त्याचा निवास असताना रावण तिथे कार्तिकेयाला भेटायला येतो. नंदीला पाहून तो हसतो, माकडतोंड्या म्हणून हिणवतो, तेव्हा नंदी रावणाला शाप देतो, ‘माकडेच तुझा सर्वनाश घडवतील़.’ भागवत पुराणातही पाऊस पाडणाऱ्या इंद्राचा उल्लेख वृषभ असा आहे.

ब्रह्मदेवाने प्रदीर्घ तपानंतर रोहिणी आणि सुरभी धेनूप्रमाणेच नंदीही निर्माण केला. असा हा नंदी शैलपुत्रीचे वाहन. तिचे अस्त्र त्रिशुल. ती शिवाची अर्धागी. प्रजापती दक्ष राजाच्या यज्ञात अपमानित झालेल्या सतीने श्री शिवशंकराची अवहेलना सहन न होऊन योगाग्निच्या सामर्थ्याने स्वतःचा देह भस्मसात केला आणि पुढच्या जन्मात ही सती शैलपुत्री होऊन शंकराच्या आयुष्यात आली. (क्रमशः)

(अधिक माहिती ऐका, तनिष्का व्यासपीठाच्या फेसबुक पेजवर)

loading image
go to top