कुलाचार नवरात्रीचा..!

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालणारा दुर्गा देवीचा उत्सव, अर्थात ‘शारदीय नवरात्र’. ऋतुंवरून प्रचारात आलेला हा धार्मिक उत्सवही आहे.
Aadishakti Navratra
Aadishakti NavratraSakal

- डॉ. नयना कासखेडीकर

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालणारा दुर्गा देवीचा उत्सव, अर्थात ‘शारदीय नवरात्र’. ऋतुंवरून प्रचारात आलेला हा धार्मिक उत्सवही आहे. दुर्गा किंवा काली ही अनेकांची कुलदेवता असल्याने भारतात हा उत्सव एक कुलाचारही असतो. यावर इथला प्रादेशिक ठसा उमटलेला आहे.

या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थितः ।

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थितः ।।

या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थितः ।

नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमस्तस्यैः नमो नमः ।।

उत्तर भारतात नवरात्र उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दुष्ट शक्तीवर मिळविलेला विजय म्हणून साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवणारी शक्ती म्हणून देवीचे पूजन होते. रजपूत लोकांनी उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. ते लोक शिवोपासक होते. रजपूत लोक नवरात्रात तोफेची पूजा करतात. त्यावर त्रिशूळाचे चिन्ह काढतात. महाराष्ट्रातही ‘स्वराज्य’स्थापनेनंतर आपले उपास्य दैवत भवानीदेवीच्या पूजेचा प्रसार झाला. चारही दिशांना ही देवालये स्थापित झाली.

पश्चिम भारतात गुजरातमध्ये नवरात्रात नऊ दिवस अखंड दीप लावून शक्तिमातेचा जागर म्हणून गरबा मांडला जातो. यात गरबा म्हणजे गर्भदीप लावला जातो. सछिद्र मातीच्या घटात दिवा तेवत ठेवतात. हा घट म्हणजे मनुष्याच्या शरीराचे आणि आतला तेवत असलेला दिवा म्हणजे शुद्ध आत्म्याचे प्रतीक मानले जाते. ही आत्मरूपी ज्योत अखंड तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना आदिशक्ती दुर्गादेवीकडे केली जाते. पूर्वेकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडे नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापूजा केली जाते. यातील सिंहावर आरूढ झालेली देवी हातात सर्व शस्त्र घेतलेली आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे.

दक्षिण भारतात बाहुल्यांचे प्रदर्शन ‘कोलू’ असते. ते बघायला सर्वजण एकमेकांच्या घरी जातात. कर्नाटकात नवरात्रात रात्रभर पुराणकथांवर आधारित यक्षगानचे प्रयोग नऊ दिवस केले जातात. दुष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या थाटामाटात ‘म्हैसूर दसरा’ साजरा केला जातो. काही भागात नवमीला आयुधांची पूजा करतात. केरळमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर लहान मुलांचा विद्यारंभ केला जातो. भाषा आणि वेष आणि आहार वेगवेगळा, पद्धती वेगळ्या; परंतु या संस्कृतीतून दिला जाणारा संदेश एकच. विविधतेतून एकता हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य, हीच परंपरा. अनेक काव्यातून वाड्मयातून शक्ती देवीची स्तुती केलेली दिसते.

जगातील दुष्ट लोकांचे प्राबल्य कमी करण्यासाठी, लोकांची त्यातून सुटका करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो, अशी समजूत आहे. ईश्वर निर्गुण असल्याने त्याला जेव्हा कार्य करायचे असते, तेव्हा तो अवतार घेऊन आपल्या शक्तीदेवीला प्रेरित करतो आणि ही शक्ती वेगवेगळ्या रूपात प्रगट होते, म्हणून त्या अवतारांची पूजा करतात. ज्या ऊर्जेतून तेजस्वी ताऱ्यांचा, सूक्ष्म मानवी मनाचा, भावनांचा जन्म होतो ती ऊर्जा/शक्ती म्हणजे देवी असे म्हटले जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश याप्रमाणे पार्वती, लक्ष्मी, सरस्वती ही शक्तीची तीन रूपे मानली जातात. या शक्तीचे मुख्य नऊ आणि इतर अनेक असे अवतार मानले जातात.

विविध महिन्यात महत्त्व असलेल्या चैत्र गौर, अन्नपूर्णा-चैत्र, ज्येष्ठ गौर व हरितालिका-भाद्रपद, मंगळागौर-श्रावण, आश्विनातील ललिता ही शक्तीची सौम्य रूपे मानली जातात. दुर्गा, काली, चंडी ही रौद्र रूपं. पृथ्वीवरील राक्षसांच्या निःपातासाठी या शक्तीने/देवीने रौद्र रूप घेतले. नऊ दिवस युद्ध करून त्यांचा नाश केला. आम्ही काही काळी स्त्रीला अबला मानलं होतं. परंतु शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली.

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

नऊ दिवसात देवीची ही नऊ रूपे पूजली जातात. ऊर्जा हे देवीचे मूळ तत्त्व. संरक्षणाची देवता दुर्गादेवी, ऐश्वर्याची देवता लक्ष्मीदेवी आणि ज्ञानदेवता सरस्वतीदेवी या शक्ती रूपात आपण मानतो. हे मानणे म्हणजेच आपल्या मनातील द्वंद्वाच्या, त्रासदायक नकारात्मक भावनांना दूर सारून सकारात्मक दृष्टीचा स्वीकार. कारण जेव्हा एखादा मनुष्य लहान, मोठ्या संकटाचा सामना करत असतो, तेव्हा तो आधार शोधतो. मन:शांती शोधतो. ती त्याला अध्यात्मामधून, साधनेमधून कुठल्याही रुपातल्या आराधनेमधून मिळते. ही रूपे अर्थातच शक्तीची असतात. त्याची मनुष्याने प्रतीके शोधली. कारण अमूर्ताला मूर्त स्वरूप दिले की आश्वासक वाटते. म्हणून वेगवेगळ्या प्रतीकांतून सूचक अर्थ निघत असतात. प्रतिकांचा वापर आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून दिसतो. प्रतीक म्हणजे एखादं चिन्ह किंवा खूण.

देवीची नवरात्र चार प्रकारची आहेत. शारदीय, वासंतिक, शाकंभरी आणि गुप्त नवरात्र. इतर नवरात्र म्हणजे चंपाषष्टीला खंडोबाचे नवरात्र असते आणि मार्गशीर्षात नृसिंहाचे नवरात्र असते. थोडक्यात, मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे म्हणूनच तो चराचराचा, निसर्गाचा, प्राणिमात्रांचा विचार करतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. तसाच तो या अमूर्त शक्तीची पूजा करतो. हे आपल्या देशाचे सांस्कृतिक महत्त्व आहे. ते मूळ भावात आपण जपले पाहिजेत.

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com