
Gauri Ganpati 2022: विदर्भातील गौराईंचे खास वैशिष्ट्ये
आज महालक्ष्मी आवाहन आहे. महालक्ष्मीचे आवाहन शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6.41 पर्यंत करावे. गौरीपूजन (Gauri Pujan 2022) हा महाराष्ट्रातील खास सण आहे. यास काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात. स्थळपरत्वे महालक्ष्मीच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलतात. आज आपण या लेखात विदर्भातील महालक्ष्मीचे काही खास वैशिष्ट्ये पाहणार आहोत.
विदर्भात आगमनाच्या दिवशी महालक्ष्मींना बसल्या तेव्हा चहापाण्याचा नैवेद्य दाखवून मग संध्याकाळी अंबाडीची भाजी-ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवसांमध्ये कांदा-लसूण वर्ज्य असल्यानं भाजी ही कांदा-लसूण विरहीतच केले जाते.
तसंच विदर्भात खास करून काही ठिकाणी लाल रंगाच्या भाज्याही नैवैद्यात वापरल्या जात नाहीत. उदाहरणार्थ- टॉमेटो, लाल मिरची, बिट. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मींची मनोभावे महापूजा करून त्यांना पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घालले जातात.
तसेच मोदक, करंज्या, सांजोऱ्या, वेणी ,फणी यांचा फुलोरा महालक्ष्मींना चढवला जातो. अनेक ठिकाणी तो डोक्यावर बांधतात, तर कित्येक ठिकाणी त्यासाठी महालक्ष्मींच्या वस्त्रांमध्ये खास जागा करून तिथे तो बांधुन ठेवतात. विदर्भात महालक्ष्मी समोर पाच धान्याच्या राशी घातल्या जातात. विदर्भातील महालक्ष्मीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मी बसल्यानंतर गोरक तयार केला जातो. हा गोरक तयार करण्यासाठी गाईचे शेण आणते जाते. नंतर त्याचा गोरख तयार केला जातो त्यावर दही दुध लोणी टाकल्या जाते. पुढे मग नदीवरून लव नावाची वनस्पती आणि नदीतील नऊ खडे आणले जातात ते तांब्याच्या कलक्षात ठेवुन त्यांची देखील पुजा केली जाते.
विदर्भातील महालक्ष्मीच्या महानैवेद्यात काय काय असते?
विदर्भात महालक्ष्मींसाठी कोशिंबीर, चटण्या, मोदक, पुरणपोळी, उडदा-मुगाचे वडे, घोसाळ्याची, अळूची भजी, कढी, आंबील, तांदुळाची खीर, पंचामृत, 16 भाज्यांपासून तयार केलेली भाजी (एक पातळ भाजी आणि एक सुकी भाजी), लाडू, भात-वरण अशा विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. यात खास असते ती म्हणजे कढी, आंबील आणि पंचामृत. हे नैवेद्य केळीच्या पानावर ठेवुन महालक्ष्मीला जेवायचे आमंत्रण दिले जाते.महालक्ष्मीच्या जेवनाच्या पात्रासमोर 21 कणकेच्या उकडलेल्या दिव्याची आरस मांडली जाते. नंतर मनोभावे आरती होते आणि मग घरातील संपूर्ण सदस्य हे घराबाहेर पडतात ,घराचे सगळे दार खिडक्या बंद करुन महालक्ष्मीना जेवायला वेळ दिल्या जातो.आजही विदर्भात महालक्ष्मी जेवतांना कुणालाच पाहु देत नाही. अर्धा तासानंतर मग बैलाच्या घागळमाळा वाजवून घराचे दरवाजे उघडले जाता.म्हणजे महालक्ष्मीला पुर्वसंदेश दिला जातो आता आम्ही घरात येत आहोत.
आता बघू या पडवळाची कढी कशी केली जाते?
खास करून महालक्ष्मीच्या या नैवेद्यात पडवळाचं महत्त्व असतं. कढी ही पडवळ घातली जाते. तसंच घट्ट दही फेटून घेऊन त्यात थोडं पाणी आणि दाटसर होण्यासाठी किंचित बेसन घालतात. नंतर कढई किंवा भांड्यात तुपाची किंवा तेलाची फोडणी तयार करून त्यात जीरे-मोहरी, हिंगाची फोडणी घालतात. त्यात कढीपत्ता घालून तो चांगला तळला गेल्यावर आवडीप्रमाणे आलं-मिरची बारीक करून घालतात. थोडी हळद घातल्यानंतर त्यात पडवळाचे लहान तुकडे शिजवून घेतात आणि नंतर दही आणि बेसनाचं केलेलं मिश्रण घालून त्यात कढीत चवीप्रमाणे मीठ, साखर घालतात.
महालक्ष्मीच्या नैवेद्यातील पंचामृत आणि आंबील कसे करतात?
पंचामृत करताना तीळ, शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचे काप, गूळ, मिरच्या यांचा वापर केला जातो. तर ज्वारीच्या पिठाची आंबील केली जाते. यात प्रथम ज्वारीवर पाण्याचा हबका मारून ती कुटली जाते. त्यानंतर चाळून त्यावरील टरफलं काढली जातात आणि उर्वरीत ज्वारी दळली जाते. म्हणजे गिरणीतून दळून आणली जाते अथवा घरी मिक्सरवर बारीक केली जाते. अर्थात ज्वारीचा भरडा तयार करायचा असतो. म्हणजेच ज्वारी रव्यासारखी दिसेपर्यंत दळली जाते. दळलेली ज्वारी पुन्हा चाळून घेतात आणि मग त्याची आंबिल केली जाते. त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ (ज्वारी), एक वाटी आंबटसर दही, अर्धी वाटी पाणी, मीठ हे साहित्य घेतात. रात्रीच ज्वारीचं पीठ, दही, पाणी एकत्र भिजवून ठेवतात. सकाळी एक ते दीड ग्लास पाणी एका गंजात गरम करायला ठेवून पाण्याला उकळी आली, की त्यात चवीप्रमाणे मीठ घालून ज्वारीच्या पीठाचं मिश्रण त्या पाण्यात घालतात. हे करत असताना आंबील ढवळत राहावी लागते. चांगली उकळी येईपर्यंत शिजू देतात.
महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळीसाठी विदर्भात गुळाचा वापर केला जातो, तर गौरी विसर्जनाच्या दिवशी दही भात, मुरडीचे कानोले यांचा नैवेद्य दाखवला जातो. मराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातही साधारणः याच पद्धतीनं नैवेद्य दाखवला जातो. भाज्यांमध्ये, गोडाच्या पदार्थांमध्ये काहीसा फरक असतो. अनेक ठिकाणी विविध गोड पदार्थ, फळं गौरींसमोर मांडली जातात. शेवटच्या दिवशी महालक्ष्मीला परत भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.आणि केलेल्या फराळातील थोडे थोडे पदार्थ महालक्ष्मी सोबत शिदोरी म्हणून बांधले जातात. महालक्ष्मी उठतांना त्यांच्या गळयात 21 पानांची माळ घातली जाते आणि महालक्ष्मीला परत सासरी वाटी लावण्या