Gudi Padwa 2022 : गुढीपाडवा का मानला जातो वर्षारंभाचा उत्तम मुहूर्त ! | All you need to know about the Marathi New year | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gudi Padwa 2022

Gudi Padwa 2022 : गुढीपाडवा का मानला जातो वर्षारंभाचा उत्तम मुहूर्त !

Gudi Padwa 2022 : यंदा शनिवारी म्हणजेच २ एप्रिल रोजी गुढीपाडवा सण आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा शालिवाहन शक वर्ष १९४४ शुभकृत् संवत्सराचा  प्रारंभ होत आहे.  युगाब्द ५१२४ चा प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा  हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

तुम्हाला एखाद्या नवीन चांगल्या उपक्रमाला सुरुवात करायची आहे काय ? मग हा गुढीपाडव्याचा दिवस तुमच्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. याकडे, वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर २१ मार्चला सूर्य विषुववृत्तावर असतो. वसंत संपात बिंदूपाशी असतो. पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रिमान समान असते. वसंत ऋतू असतो. या दिवसा जवळचा चांद्रमहिना सुरू होण्याचा हा दिवस असतो. नवीन वर्षाचा प्रारंभ होत असतो.

हेही वाचा: पैठणला नाथषष्ठीच्या तीनदिवसीय सोहळ्याची उत्साहात सांगता

कसा साजरा केला जातो गुढीपाडवा

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजासमोर रांगोळी काढावी. नवीन वस्त्रे परिधान करावी. देवाची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची ( बांबूची ) एक काठी घेऊन , ती स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र , फुलांची व साखर माळ घालून त्यावर एक लोटी ठेवावी. अशा रितीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून त्यावर उभी करावी. या गुढीस ‘ ब्रह्मध्वज ‘ असे म्हणतात. तिची पूजा करावी.

गुढीची पूजा केल्यानंतर कडुनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि सर्वानी थोडे थोडे खावे. वर्षारंभी कडुनिंब खाल्ल्याने वर्षभर आरोग्य चांगले रहाते. मात्र कडुनिंबाचे अतिसेवन करू नये. त्यानंतर पंचांगातील वर्षफल वाचावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. समाजकार्य करून गरीबांना मदत करावी. दानधर्म करावा. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती उतरावी.

पंचांगपूजन

गुढीपाडव्यापूर्वी नवीन वर्षाचे पंचांग आणले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचे पूजन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून त्याचा वापर सुरू होतो.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 मार्च 2022

कसा सुरू झाला गुढीपाढवा सण?

गुढीपाडवा सणाची उपपत्ती अनेक प्रकारे सांगण्यात आली आहे.—

१) ब्रह्मदेवाने ही सृष्टी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केली असे पुराणात सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा वाढदिवस दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो.

२) शालिवाहन शकांसंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. पहिल्या कथेप्रमाणे शालिवाहन नावाच्या एका राजाने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजया प्रीत्यर्थ शालिवाहननृपशक सुरू झाला. म्हणजेच मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.

दुसऱ्या कथेप्रमाणे पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली आणि त्या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला.

३) वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद्र झाला. स्वर्गातील अमरेंद्राने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला. म्हणून तो दिवस आनंदोत्सव म्हणून सर्वत्र पाळला जातो.

४) भगवान श्रीविष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव करून त्यांना ठार मारले. त्यानंतर त्यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या-तोरणे उभारून त्यांचे भव्य स्वागत केले. तेथपासून चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस गुढ्या-तोरणे उभारून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

५) नारद मुनीना साठ मानसपुत्र होते. तीच ६० संवत्सरे होत. प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस गुढ्या-तोरणे उभारून आनंदाने साजरा करण्याची प्रथा पडली.

Web Title: Gudi Padwa 2022 Date And All You Need To Know About The Marathi New Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top