What is the Significance of Guru Purnima? : भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय़ महत्त्वाचा आहे. या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरुचं पुजन करतो आणि त्यांच्याप्रती असलेली आपली भक्ती दर्शवतो. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंही म्हणतात. यावर्षी हा सण उद्या म्हणजे गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे.
या दिवशी गुरुपुजनाला अधिक महत्त्व आहे परंतु आजकाल अनेकांचा गुरु नसतो, अशावेळी त्यांनी कुणाची पुजा करावी? कुणाला गुरू मानावं? असे अनेक प्रश्न मनात आपसूकच निर्माण होतात.
धार्मिक श्रद्धेनुसार, वेदांचे निर्माते महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता आणि हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. महर्षी वेद व्यास यांचे बालपणीचे नाव कृष्णद्वैपायन व्यास होते आणि जेव्हा त्यांनी वेदांचे विभाजन केले तेव्हा त्यांचे नाव वेद व्यास पडले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेद व्यास यांची गुरु म्हणून पूजा केली तरीही चालते.
याशिवाय, ज्यांना गुरु नाही ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवांचे गुरु मानले जाणारे गुरु बृहस्पती यांची पूजा करू शकतात. या दिवशी गुरु बृहस्पतींना पिवळी फुले आणि पिवळे वस्त्र अर्पण केले जातात. या दिवशी, ज्या मंदिरात नवग्रह आहेत, तेथे गुरु बृहस्पतींची मूर्ती देखील असते, तेथे जाऊन पूजा करणे शुभ मानले जाते.
याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हटले जाते आणि लोक या दिवशी उपवास करतात. तसेच, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपवास करताना भगवान सत्यनारायणाची पूजा करावी. त्यांची कथा वाचून आणि आरती करून देवांचे आशीर्वाद मिळवावेत.
टीप – येथे दिलेली सर्व माहिती ही सामाजिक आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. esakal.com त्याची पुष्टी करत नाही. यासंदर्भात जाणकरांचे मार्गदर्शन घ्यावे.