esakal | Navratri 2021 : नवरात्रोत्सवातील उपासना कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

how to do Navratri worship read in detail r

नवरात्रोत्सवातील उपासना कशी करावी? जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

पृथ्वीवर महिषासुर राक्षस माजला होता. त्याने देवदेवता, ऋषिमुनी, साधुसंत, सज्जन आणि भक्त-भाविकांना अगदी सळो की पळो करून ठेवले होते. तो सर्वांनाच त्रास देत होता. तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासुर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तिदेवता प्रगट झाली. त्या शक्तिदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचे सर्वांनी नाव ठेवले महिषासुरमर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र, असे देवीमाहात्म्य ग्रंथात सांगितले आहे.देवीची नऊ रूपे

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम्।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम्।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी, ३. चंद्रघंटा, ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी), ५. स्कंदमाता, ६. कात्यायनी, ७. कालरात्री, ८. महागौरी, ९. सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत.

व्रत करण्याची पद्धत

नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.

-घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.
-नवरात्र महोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत.-मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.
-सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोचेल अशी बांधावी.-नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते.-अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठण (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललितापूजन, सरस्वतीपूजन, नऊ दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्र महोत्सव साजरा करावा.

नवरात्रातील नऊ माळा

पहिली माळ ः शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ.
दुसरी माळ ः अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
तिसरी माळ ः निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा.
चौथी माळ ः केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ ः बेल किंवा कुंकवाची वाहतात.
सहावी माळ ः कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ ः झेंडू किंवा नारिंगीची फुले. आठवी माळ ः तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ. नववी माळ ः कुंकुमार्चनाची वाहतात.

अखंड दीपप्रज्वलन

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायुमंडल शक्तितत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

नऊ दिवस देवीचा नैवेद्य

नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

हेही वाचा: Navratri 2021 : आदिशक्तीच्या विविध मूर्तींनी सजली बाजारपेठ

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती?

-देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.-दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे.
-देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.-देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

कुमारिका-पूजन कसे करावे?

१. नवरात्रीमध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी ‘नऊ’ या विषम संख्येत कुमारिकांना बोलविण्याचीही पद्धत आहे. २. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे. ३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी. ४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.) ५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये आपल्या श्रीकुलदेवीचे दर्शन अवश्य करावे.

(संदर्भ ः देवी भागवत ग्रंथ)

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.))))

हेही वाचा: नवरात्रीत उपवास कारताय 'हे' अ‍ॅप घेतील तुमच्या आरोग्याची काळजी

loading image
go to top