भारतीय युद्धकला गुरूकुलम्

विद्यार्थी-शिक्षकांच्या श्रमदानातून वेंगरूळला
विद्यार्थी-शिक्षकांच्या श्रमदानातून वेंगरूळला
विद्यार्थी-शिक्षकांच्या श्रमदानातून वेंगरूळलाsakal

अडीच एकरात उभारणी अडीच एकर शेतजमीन दान भारतीय युद्धकलांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे देशातील पहिले सव्यसाची गुरूकुलम् वेंगरूळ (ता. भुदरगड) येथे भुदरगडच्या पायथ्याशी उभारले आहे. गारगोटीतील मौनी महाराज शैक्षणिक संकुलापासून पुढे पुष्पनगर आणि तेथून पुढे वेंगरूळ गाव. गावच्या कमानीपासून थेट उत्तरेकडे मेघोली धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर अगदी रस्त्याकडेलाच हे गुरुकुल आहे. येथे आल्यानंतर प्रमुख आचार्य लखन जाधव स्वागत करतात. श्री. जाधव हे मूळचे वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबावरचे.

सुरुवातीला सूरज ढोली, विनय चोपदार यांच्याकडे त्यांनी शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. गेली अठरा वर्षे ते युद्धकलांचा अभ्यास आणि प्रशिक्षणासाठी देशभर भ्रमंती करत आहेत. या साऱ्या प्रवासात त्यांनी बारा वर्षांपूर्वी अशा पद्धतीच्या गुरुकुलाचा संकल्प केला आणि चार वर्षांपूर्वी तो सिद्धीस नेला. गुरुकुलाच्या उभारणीचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. अजूनही येथे बऱ्याच गोष्टी करायच्या असल्याचे ते सांगतात. संस्थेचेच कार्यकर्ते आणि वेंगरूळ गावचे रहिवाशी नितीनराव जोशी यांनी स्वतःची अडीच एकर शेतजमीन या गुरुकुलासाठी दान केली आणि येथे गुरुकुलाच्या उभारणीला प्रारंभ झाला. एक पर्णकुटी उभारली आणि प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. विंचू आणि सापांच्याच अधिवासाचा हा सारा परिसर. त्यात आडमार्गावर आणि लांब. त्यामुळे गवंडीही यायला तयार होईना. अखेर वेंगरूळातील एका ज्येष्ठ गवंड्यांना विनंती केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतीलच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गुरुकुल बांधकामाचा निर्णय घेतला. दीड वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर गुरुकुलातील आखाड्याची इमारत उभी राहिली आणि त्यानंतर भोजनगृह. लॉकडाऊन काळात परिसरातील विविध स्तंभ आणि शिल्प उभारणी झाली. त्याचं कास्टिंग आणि सर्वच कामंही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीच केली.

सत्तर हजारहून अधिक जणांना प्रशिक्षण

मन, मेंदू आणि मनगट बळकट करणाऱ्या अनेक युद्धकला देशभरात आहेत. महाराष्ट्राची जशी शिवकालीन युद्धकला, तशीच केरळची कलारीपयट्टू, मणिपूर, तमिळनाडू, पंजाब असो किंवा प्रत्येक राज्याची एक वेगळी युद्धकला. भारतातील अशा वीसहून अधिक युद्धकला येथे शिकायला मिळतात आणि येत्या तीन वर्षांत जगभरातील सतरा भाषांमध्ये येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारंगत केलं जाणार आहे. देशभरात दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत संस्थेचे दीडशेहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. तीसहून अधिक ठिकाणी ते निवासी आणि अनिवासी पद्धतीनं युद्धकलांचं प्रशिक्षण देतात. आजअखेर सत्तर हजारहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिंनी या माध्यमातून युद्धकलांचं प्रशिक्षण घेतल्याचे श्री. जाधव सांगतात.

सामंजस्य करार, ६ वर्षांचा अभ्यासक्रम

श्री. जाधव यांच्याबरोबरच आता नितीनराव जोशी, केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूडच्याही युद्धपटांसाठी मार्गदर्शन करणारा श्रीकांत लुगडे, गुरुकुलाचे व्यवस्थापन पाहणारा वैभव खेतल ही मंडळीही संवादात सामील होतात. सध्या गुरुकुलात तीस विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. गावातीलच शाळेत त्यांची ॲडमिशन केली असून, केवळ परीक्षेसाठी ते जातात. त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रमही गुरुकुलातच शिकवला जातो. युद्धकला हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला पाहिजे, यासाठी आता आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुकुल आणि पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. स्पेनमधील एका मासिकाने तर याच विषयावर आधारित चाळीस पानांचा विशेषांक केला असून तो लवकरच प्रकाशित होणार आहे. कुस्तीचाच विचार केला तर प्राचीन ग्रंथात हनुमंती, जांबुवंती, भीमसेनी आणि जरासंधी अशा चार विभागांत ती विभागली आहे. आपल्याकडे सध्या खेळली जाणारी कुस्ती त्यातील अगदी अल्पसा भाग आहे. आखाड्यातील हौदा जमिनीपासून किमान एक मजला (किमान दहा फूट) खाली असावा, असे शास्त्र सांगते. तसाच हौदा येथे तयार केला आहे. जोर-बैठकांचाच विचार केला तर त्यातही नव्वदहून अधिक प्रकार आहेत. जसा सूर्यनमस्कार तसा चंद्रनमस्कार आणि भूमीनमस्कारही आहे. तलवार ही कमीत कमी सातशे आणि जास्तीत जास्त बाराशे ग्रॅमचीच असते आणि तिला चोवीस अंगे असतात. एकूणच सर्व प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून गुरुकुलाने सहा वर्षांचा मल्लयुद्धांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. तो गुरुकुलात शिकवला जाईलच. त्याशिवाय शालेय पातळीवर तो कसा जाईल, यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे ही मंडळी सांगतात.

दुर्मिळ शस्त्रं, साडेचार हजार दुर्मिळ ग्रंथ

गुरुकुलात साडेचार हजारहून अधिक प्राचीन ग्रंथ अभ्यास आणि संशोधनासाठी उपलब्ध आहेत. त्यात संगीत, नृत्य, नाट्य या विषयांवरील दुर्मिळ ग्रंथही आहेत. त्याशिवाय देशभरातील सातशेहून अधिक प्रकारची शस्त्रे शस्त्रागारात आहेत. युद्धकला प्रशिक्षणात भारतीय संगीताचाही सुरेख वापर करून घेतला आहे. गुरुकुलातील दिवस पहाटे चारला उगवतो आणि रात्री नऊपर्यंतचे शेड्यूल ठरलेले असते. सकाळी योगा-प्राणायामापासून ते व्यायाम, प्रशिक्षण आणि आहाराबाबतचे नियम तंतोतंत पाळले जातात. चहाऐवजी विविध आयुर्वेदीय पेयांचा वापर केला जातो. गुरुकुलात गोशाळा, दोन घोडे आहेत आणि त्याचबरोबर मैदाने आणि इतर कामेही विद्यार्थ्यांनाच करावी लागतात. येत्या काळात सुसज्ज मैदानाबरोबरच विशेष प्रावीण्य पदवी केंद्र, व्यायाम मंदिर, ध्यान मंदिर, चिकित्सालय, मालिश केंद्राची उभारणी होणार आहे. आठ दिवस, पंधरा दिवसांची निवासी प्रशिक्षण शिबिरेही येथे होतात. विना शस्त्र समोरच्या शत्रूला नामोहरम करणं असो किंवा महिलांसाठी उपलब्ध साहित्यात स्वसंरक्षणाचे धडेही येथे दिले जातात.

भेदाभेद गाडून सशक्त तरुणाईचे ध्येय

सर्व प्रकारचे भेदाभेद गाडून सशक्त तरुणाईचे ध्येय घेऊन गुरुकुलाचे काम सुरू आहे. त्यामुळेच शस्त्रांबरोबरच शास्त्राचेही शिक्षण येथे मिळते. सकाळी यज्ञातील समिधेपासून रात्री बीबीबी न्यूजपर्यंत म्हणजेच परंपरा जपताना किंवा मातीची नाळ न सोडता आधुनिक जगाचं भान असणारी तरुणाई निर्माण व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. ‘मर्दानी खेळ’, ‘शिवकालीन शस्त्रास्त्रे’, ‘भारतीय युद्धशास्त्राचा अभ्यासक्रम’, ‘व्यायाम ज्ञानकोश एक ते दहा’ ही पुस्तकेही प्रकाशित केली जाणार आहेत. श्री संत सेवा संघ, संजय गोडबोले (गुरुजी) यांच्यासह गुरू बंधू आणि विविध संस्था, सेवाभावी व्यक्तींच्या सहकार्यातूनच वाटचाल राहिली आणि येत्या काळातही त्या बळावरच वाटचाल केली जाणार असल्याचे श्री. जाधव सांगतात. हरिहर (कर्नाटक) येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर श्‍वेतांबरी बोंगाळे आपल्या मुलींसह सध्या गुरुकुलात युद्धकलांचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे नवा आत्मविश्‍वास मिळाल्याचे त्या आवर्जुन सांगतात.

‘अहो श्रीगुरूते जै पुसावे! येणे माणे सावध व्हावे! हे एकचि जाणे आवघे! सव्यसाचि!’ ज्ञानेश्‍वरीतील ही ओवी आणि धनुर्धारी श्री अर्जुनाचं भव्य शिल्प पाहताच आपण एका वेगळ्या दुनियेत आल्याचं जाणवत राहतं. आत प्रवेश करताच गुरुकुलच्या विद्यार्थिनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून भाळी टिळा लावतात आणि अनेक मैलांचा प्रवास करून आलेला शीण कुठल्या कुठे पळून जातो. त्यानंतर मग पुढे प्राचीन ग्रंथ, देशभरातील दुर्मिळ शस्त्रे, विविध युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, धनुर्विद्या, अश्‍वारोहण अशा साऱ्या माहौलात दुपारचा प्रहर कधी उलटतो याचे भानही राहत नाही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com