Krishna Janmashtami 2023: कृष्ण जन्माष्टमीला का फोडली जाते दही-हंडी?

Dahi Handi
Dahi HandiEsakal

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. त्यातही महाराष्ट्रात दहीहंडीचा सण का साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.

दहीहंडी उत्सव का केला जातो आयोजित?

दहीहंडी उत्सवादरम्यान, दही किंवा लोणीने भरलेले मातीचे भांडे दोरीने लटकवले जाते. गोविंदा नावाच्या खेळातील सहभागी त्यांच्या संघासह पिरॅमिड तयार करून दही आणि लोण्याने भरलेले भांडे फोडण्याचा प्रयत्न करतात. दहीहंडी हा सण हा भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग आहे ज्याद्वारे लहान मुलांच्या करमणुकीत भगवान श्रीकृष्णांनी केलेल्या खोड्यांचे चित्रण केले आहे.

Dahi Handi
Krishna Janmashtami: गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी कोणती प्रार्थना करावी?

जन्माष्टमी दहीहंडी का फोडतात ?

लहानपणी भगवान श्रीकृष्ण ज्याप्रकारे गोकुळात शेजाऱ्यांच्या घरातून दही, दूध आणि लोण्याचे भांडे फोडत असत, तेव्हा सुख-समृद्धी येत असे, असे मानले जाते. या गोष्टींना पूजेचे साधन बनवून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. प्रचलित कथांनुसार दहीहंडीचा सण साजरा केल्याने घरात आणि परिसरात समृद्धी येते आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद कायम राहतो. दहीहंडी थर रचून फोडली जाते.

दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी, एक गट तयार केला जातो ज्याला गोविंदा पथक म्हणतात. एकामागून एक गोविंदांचा समूह थर रचून दूध-दह्याने भरलेले भांडे फोडण्याचा प्रयत्न करतो. खेळात सहभागी होणारा संघ मडकं फोडण्यात अपयशी ठरला तर तो त्यांचा पराभव मानला जातो. मडके फोडण्यात यशस्वी झालेल्या गोविंदांच्या संघाला विजेता घोषित करून गौरविण्यात येते.

महाराष्ट्रातील दहीहंडी कशी असते?

महाराष्ट्रातच दहीहंडीचा उत्साह सर्वाधिक पाहायला मिळतो. पुणे, मुंबई यासह राज्यभरात इतर ठिकाणीही हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. तरुणांची अनेक मंडळे एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी ‘गोविंदा आला रे’च्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com