
अनादी कालापासून या भारत वर्षात सूर्याची उपासना होत आहे. प्रत्यक्ष दृष्टीला दिसणारी अशी ही देवता आहे. 'आरोग्यम् भास्करात् इच्छेत्' अर्थात उत्तम आरोग्य पाहिजे असल्यास सूर्याची उपासना करावी असे शास्त्र सांगते. सूर्य शब्दाचा अर्थ 'सरति आकाशे इति सूर्य:' अर्थात आकाशामध्ये कोणत्याही आधाराशिवाय जो भ्रमण करतो त्याला सूर्य असं म्हणलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये सूर्य फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते पण प्राचीन ज्योतिष शास्त्रामध्ये पृथ्वीला स्थिर मानून सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे असं कल्पिलेलं आहे. सूर्य ज्या वृत्तावरती फिरत असतो त्याला क्रांतीवृत्त असं म्हटलं जातं. या क्रांतीवृत्ताचे 12 समान भाग केलेले आहेत त्याला बारा राशी असं म्हणतात व त्या मेष पासून मीन पर्यंत आपल्याकडे संबोधल्या जातात. या प्रत्येक राशी मधून सूर्याचे भ्रमण अनुक्रमे होत असते. एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये जो सूर्याचा किंवा अन्य ग्रहांचा प्रवेश होतो त्याला संक्रांती अथवा संक्रमण असे म्हटले जाते. त्यातील मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो त्यास मकरसंक्रांति असे म्हटले जाते. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याचा जो संक्रमणाचा काळ असतो तो अत्यंत सूक्ष्म असतो जो आपल्या चर्मचक्षंना दिसू शकत नाही. म्हणून वशिष्ठ ऋषी असं सांगतात.