
श्रावण महिना लागला की, सलग सणवार सुरू होतात. त्यातला पहिला सण हा नागपंचमी असतो. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो. हिंदू संस्कृतीत घालून दिलेल्या रुढी, परंपरा आणि सणवारांना त्या -त्या काळा, वेळानुसार शास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारण असतं. पण याबरोबरच काही पौराणिक कथाही त्याच्याशी जोडलेल्या असतात. जे त्याचे महत्व सांगतात.
अशाच काही कथा नागपंचमी या सणाविषयी सांगितल्या जातात. त्यापैकीच नाग देवतेला बंधू बनवल्याची कथा काय आहे जाणून घेऊया.
प्राचीन काळात एका धनिकाची ७ मुले असतात. त्यांचा विवाह झालेला असतो. सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार, चारित्र्यवान असते. पण तिला कोणीही भाऊ नसतो.
एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली. ते घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र फावडा, खुरपं घेऊन निघाल्या. माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या. तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला.
मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले. तेवढ्यात लहान सुनेने तिले अडवले. त्या मुक प्राण्याला मारू नका, तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं.
हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला. तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की, तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते. इथून कुठेही जाऊ नका, असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या. कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की, तिने नागाला थांबायला सांगितले आहे.
तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोहचली. नाग देव तिथेच बसलेले बघून ती बंधू प्रणाम म्हणाली. नागदेव म्हणाले, तू मला बंधू म्हटले आहे म्हणून सोडून देतो. अन्यथा खोट बोलल्यामुळे मी तुला डसला असतो. तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली.
त्यावेळी आजपासून तू माझी बहिण आणि मी तुझा भाऊ, माग तुला काय हवे आहे, असे नाग तिला म्हणाले. त्यावेळी माझं कोणीही नाही. तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाल्याचं तिने सांगितलं.
काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रुपात तिच्या घरी येतो. माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो. त्यावेळी घरचे नकार देतात. हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात. पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो. त्यानंतर तिला घेऊन निघतो.
वाटेत तिला सांगतो की, मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहे. त्यामुळे घाबरू नकोस. वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड. त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोहचली. तिथलं धन, ऐश्वर्य बघून ती आश्चयचकीत झाली.
एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की, मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील. तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं. त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळलं. नागाची आई फार रागावली. पण नागाच्या समजवण्याने शांत झाली. तेव्हा नाग म्हणाला की, बहिणीला आता तिच्या घरी पोहचवून द्यायला हवे. त्यावेळा नाग बंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने, चांदी, हिरे माणके, कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहचवले.
एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्षा झाली. ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे. तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे. हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या. त्या मोठ्या सुनेने झाडू सुद्धा सोन्याचा मागितला तर तो ही आणून दिला.
लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरेमाणकांचा हार दिला. ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहचली. तिने राजाला सांगितलं की, मला तो हार हवा आहे. राजाने फर्मान सोडलं की, त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भूत हार आणून द्या. धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला.
त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले. तिने नागाला प्रार्थना केली की, राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे. तुम्ही असं काहीतरी करा की, जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरेमाणकांचा हार होईल. नागाने तसेच केले. तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली.
हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले. धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला. राजाने तिला विचारले की, तू काय जादू केली आहेस? खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेन. सून म्हणाली महाराज, माफ करा पण हा हारच असा आहे की, माझ्या गळ्यात हिरेमाणकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो. राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आता घालून दाखव. तिने घालताच तो हिरेमाणकांचा झाला.
हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. खुश होऊन अधिक मूद्रापण दिल्या. सून घरी परत आली. हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की, लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे. यावर त्या लहान मुलाने तिला विचारले हे धन कुठून आणत आहेस? तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले.
त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की, माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन. हे ऐकून लहान सुनेचा पती खूश झाला. त्याने नाग देवतेचा यथायोग्य सत्कार केला. त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.