esakal | जोगेश्वरी I Tambdi Jogeshwari
sakal

बोलून बातमी शोधा

Tambdi Jogeshwari

जोगेश्वरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुण्यात जायचं तर, एकावेळी एक काम न करता, दोन-तीन कामे उरकून घ्यायची, असे पिंपरी-चिंचवड असो की, लगतच्या गावांतील अनेकांचे गणित असते. कारण, पुण्यात एक तर एकेरी वाहतूक. त्यात पार्किंगचा प्रश्न गंभीर. दुचाकी लावायला सुद्धा जागा मिळत नाही. चारचाकी घेऊन जाणे तर दूरच. त्यामुळे अनेक जण एका कामांत अनेक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यात आम्हीही आहोत. तुळशीबाग व लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांतून खरेदीचा बेत आखला होता. शिवाजीनगरहून शनिवाड्यापर्यंत गेलो. तेथून पुढे मंडईपर्यंत जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागला. ट्रॅफिक जाम होते. मंडईच्या समोरील वाहनतळाच्या दुसऱ्या मजल्यावर दुचाकी उभी केली आणि चालतच सर्व कामे उरकण्याचा निश्चय केला. घरून निघताना शेजारच्या काकू म्हणाल्या, ‘‘पुण्यात चालला आहात दगडूशेठ गणपतीचेही दर्शन घ्या. आणि तांबडी जोगेश्वरीचे सुद्धा.’

आम्ही पुण्यात राहात असताना नेहमीच जोगेश्वरीच्या दर्शनाला जायचो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्यामुळे आमच्या ‘सौं’नी त्यांची आज्ञा शिरसावंद्य माणली आणि जोगेश्वरी व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायचा, हट्ट धरला. त्यामुळे आमचाही नाइलाज झाला. तसे पुण्यात अनेकदा जाणे-येणे होते, पण, ‘आपले काम भले अन् आपण भले,’ इतकेच उद्दिष्ट असायचे. आज मात्र नेहमीच्या काम करण्याच्या मार्गात बदल करावा लागला होता. तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांमध्ये खरेदी केल्यानंतर आमची पदयात्रा गणेश चौकातून जोगेश्वरी मंदिराकडे वळली. पण, पोटाने भुकेची जाणीव करून दिली. समोरच दिसणारा डोसा, उत्तप्पा भुकेची जाणीव आणखी वाढवत होता. त्यामुळे यथेच्छ ताव मारत तृप्तीचा ढेकर दिला आणि स्ट्रीट शॉपिंगचा आनंद घेत पुढे चालू लागलो. पिंपळाचे झाड ओलांडून पुढे गेलो आणि पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांनी लक्ष वेधून घेतले. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, अबीर, गुलाल, अगरबत्ती, धूप अशा वस्तूंसह हार व देवीचे कापड व खणही विक्रीसाठी होते. हाच तांबडी जोगेश्वरी मंदिराचा परिसर. शेजारच्या दुकानातून पूजा साहित्य घेतले आणि जोगेश्वरी मंदिराच्या पूर्वाभिमुख दरवाजातून आत प्रवेश केला. त्या आवाराच एक वयस्कर ग्रहस्थ बसलेले होते. त्यांच्याशी संवाद साधला.

‘बाबा!, या देवीला तांबडे जोगेश्वरी का म्हणतात?’

ते ग्रहस्थ सांगू लागले, ‘त्याच्या दोन-तीन आख्यायिका आहेत. कोणी म्हणते, ताम्रसूर नावाच्या राक्षसाचा देवीने वध केला म्हणून तिला तांबडी जोगेश्वरी म्हणतात. कोणी म्हणते देवीची वर्ण अर्थात रंग ताम्र आहे म्हणून तिला तांबडी जोगेश्वरी म्हणतात.’

ते आजोबा पुढे सांगू लागले, ‘कारण, काहीही असलं तरी, तांबडी जोगेश्वरी हे पुण्याचे ग्रामदेवता आहे. पुण्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यातील एक पुरातन मंदिर म्हणजे तांबडी जोगेश्वरी. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे. आणि या देवीचे वर्णन भविष्यपुराणातही आहे. ‘तां नमामी जगदधात्री योगिनी परयोगिनी’ असा उल्लेख भविष्यपुराणात आहे, अर्थात, जिने ताम्रासुराचा वध केला किंवा जीचा वर्ण ताम्र आहे, जिचे दर्शन नवजात शिशू असणारी माता घेते, जी पुण्याचे ग्रामदेवता म्हणून प्रत्येक कार्यात पूजली जाते, ती म्हणजे तांबडी जोगेश्वरी.’ जोगेश्वरी देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या वरील एका हातात डमरू आहे. दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे. खालील एका हातात मस्तक आणि दुसऱ्या हातात पानपात्र आहे, असेही त्या आजोबांनी सांगितले. ते सांगू लागले, ‘प्रत्येक सणाला देवीची महापूजा बांधली जाते. विजयदशमीला पालखी निघते. मंगळवार, शुक्रवारसह पौर्णिमेला दर्शनासाठी अधिक गर्दी असते. नवचंडी यज्ञ केला जातो. पुण्याची ग्रामसंरक्षक देवता म्हणूनही तांबडी जोगेश्‍वरी ओळखली जाते.’

एकंदरीत तांबडी जोगेश्वरी मंदिराचा विचार केल्यास पुण्याच्या मध्यवस्तीत किंवा लक्ष्मी रस्त्यासारख्या मुख्य बाजारपेठेलगत मंदिर आहे.

तांबडी जागेश्वरी मंदिरापासून जवळच श्री कसबा गणपती मंदिर आहे. शिवाय, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरसुद्धा जवळच आहे. एकंदरीत पुनवडी या छोट्याशा गावाची पुणे महानगरपर्यंत झालेली वाटचाल, विस्तार, विकास आणि जडण-घडणीचे साक्षीदार, पुण्याच्या वाटचालीच्या पाऊलखुणा म्हणजे तांबड जोगेश्वरी मंदिर आणि श्री कसबा गणपती मंदिर आहे. देवीचे मनोभावे दर्शन घेतले. पूजा केली. खणा-नारळाची ओटी वाहिली. जोगेश्वरी देवीचे रूप पाहून प्रसन्न वाटले. देवीचे दर्शन घेतले आणि आमची पाऊले दगडूशेठ गणपती मंदिर व श्री कसबा मंदिराकडे वळले. त्यानंतर ऐतिहासिक शनिवारवाडा बघायचा बेत मनात केला होता.

loading image
go to top