esakal | घटस्थापना I Ghatasthapana
sakal

बोलून बातमी शोधा

Ghatasthapana

घटस्थापना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव संपला की वेध लागतात ते पंधरा दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाचे. आदिमाया, आदिशक्तीच्या आगमनाचे. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’ अशी अनंत चुतुर्दशीच्या गणपतीला घातलेली साद विसरतो न विसरतो तोच, ‘उदे गं अंबे उदे...’ चे वातावरण निर्मिती होते. बघता बघता पितृपक्षाचे पंधरा दिवस संपतात आणि आश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस उजाडतो. नवरात्रोत्सावाचा पहिला दिवस. घटस्थापनेचा दिवस. अर्थात आजचा दिवस, गुरुवार. सात ऑक्टोबर. तिथीनुसार आश्विन शुद्ध प्रतिपदा. शके १९४३. घराघरांत आज उत्साह आहे. घरांमधील सर्व भांडी, अंथरूण, पांघरून धुवून झाले आहेत. सकाळपासूनच मंगलमय वातावरण आहे. घटस्थापना अर्थात कलश स्थापनेची लगबग सुरू आहे. कारण, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची प्रथा आहे. नवरात्रीची सुरुवातच घटस्थापनेच्या दिवसापासून होते. कलशालाच पूजेत मोठे स्थान आहे. घराघरांतील गृहिणींची त्यासाठी तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापना करताना ईशान्य दिशेला अधिक महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. त्याचीच तयारी घराघरांत दिसते आहे. घट बसवायचे असलेली जागा गंगाजलाने स्वच्छ केली जात आहे. जमिनीवर किंवा पाटावर किंवा केळीच्या पानावर काळी माती पसरली जात आहे. त्या मातीवर वेगवेगळ्या प्रकारचे धान्य अर्थात बियाणे घातले जात आहे. काही जण त्या ते बियाणे मातीने झाकत आहेत. काही जण बियाणे झाकलेल्या मातीवर पाणी शिंपडत आहेत. काहींचे बियाणे पेरून झाले आहे. त्या मातीवर आता कलश ठेवला जात आहे. अर्थात घटस्थापना केली जात आहे. कलशामध्ये सुद्धा पाणी भरलेले आहे. काही जणांनी त्यात लक्ष्मीचे प्रतीक म्हणून नाणं टाकलेले आहे. कलश स्थापन करून झाला आहे. आता त्यावर उजवा हाथ ठेवून मंत्रोच्चार केला जात आहे...

गंगे!च यमुने! चैव गोदावरी!

सरस्वति! नर्मदे! सिंधु! कावेरि!

जले..स्मिन् सन्निधिं कुरू।।

अर्थात सप्तनद्यांचा नामोच्चर केला जात आहे. कलशाच्या तोंडावर कलावा बांधला जात आहे. कलशावर ठेवण्यासाठी नारळ अर्थात श्रीफळ आणलेले आहे. काही भांड्यांमध्ये धान्य भरून ठेवले आहे. कोणी तुळजापूरच्या भवानी मातेची, कोणी माहूरच्या रेणुकामातेची प्रतिमा ठेवली आहे. काहींनी कोल्हापूरच्या अंबाबाईची तर काहींनी वणीच्या सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा पूजेसाठी ठेवली आहे. नऊ दिवसांच्या या नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे. त्यासाठी सुवासिनींची लगबग सुरू आहे. अखंड दीपप्रज्वलनासाठी नंदादीप किंवा समईची व्यवस्था केली आहे. कोणी माहात्म्यपठण अर्थात चंडीपाठ करण्याच्या तयारीत आहे. कोणी सप्तशतीपाठ, कोणी देवीभागवत पठण करणार असल्याचे दिसते आहे. जागरण, गोंधळाचे कार्यक्रमही अनेक ठिकाणी होणार आहेत.

घरामध्ये आईची सुरू असलेली लगबग पाहून चिमुकली गौरी विचारते आहे, ‘‘मम्मी मम्मी हे काय आहे? आज काय आहे?’’ त्यावर तिची आई म्हणाली, ‘‘आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी घटस्थापना करायची आहे. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करते आहे. काही काल आणून ठेवले आहे.’’

‘काय काय लागतं, घटस्थापनेला?’’ गौरीने विचारले.

आई म्हणाली, ‘‘घटस्थापनेसाठी मातीचा किंवा धातूचा घट लागतो. त्याला माठ कवा घागर म्हणतात. त्यासाठी शेतातून काळी माती आणावी लागते. त्यावर पेरण्यासाठी धान्ये लागतं. त्यात जव, गहू, तीळ, मूग, राळे, हरभरा अशा धान्यांचा समावेश होतो. विड्याची पाने लागतात. हळदी-कुंकू, गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी व अन्य पूजेचे साहित्यही लागते. गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी लागते. नैवेद्य लागतो. नऊ दिवस अखंड ज्योत तेवत ठेवावी लागते. त्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर केला जातो.’

‘मम्मी, नवरात्र का साजरे करतात?’’ गौरीच्या प्रश्नावर तिची आई म्हणाली, ‘अगं पुराण काळात महिषासुर नावाचा राक्षस होऊन गेला. त्याचा विनाश देवीने केला होता. त्यामुळे नवरात्रोत्सव साजरा करतात. आश्‍विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. देवीने नऊ दिवस महिषासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळवला. त्याचा आनंदोत्सव, विजयोत्सव म्हणून दसरा साजरा केला जातो. या दिवशी आश्विन महिन्यातील शुद्ध पक्षातील दशमी ही तिथी असते. त्यामुळे या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. आजपासून दहाव्या दिवशी आपण दसरा अर्थात विजया दशमी साजरी करू.’’

‘हो, पण या नऊ दिवसांत काय करायचे?’’ गौरीने विचारले.

गालात हसत तिची आई म्हणाली, ‘‘नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपण वेगवेगळ्या देवींच्या दर्शनाला जाऊन येऊ.’’

‘हे, येस...’ म्हणत गौरी घराबाहेर खेळायला पळाली आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात तिची आई घटस्थापनेच्या तयारीला लागली.

loading image
go to top