मंगळागौर आणि सामाजिक भान

श्रावणातील मंगळागौर म्हणजे ‘गौरी गौरी सौभाग्य दे’ अशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर म्हणजे पार्वतीच्या रूपातील अन्नपूर्णा. मंगळागौरीची पूजा करणं हे विशेषतः महाराष्ट्रातले पारंपरिक व्रत.
Nayana Kaskhedikar writes mangalagaur information Social Consciousness
Nayana Kaskhedikar writes mangalagaur information Social Consciousnesssakal
Updated on
Summary

श्रावणातील मंगळागौर म्हणजे ‘गौरी गौरी सौभाग्य दे’ अशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर म्हणजे पार्वतीच्या रूपातील अन्नपूर्णा. मंगळागौरीची पूजा करणं हे विशेषतः महाराष्ट्रातले पारंपरिक व्रत.

- डॉ. नयना कासखेडीकर

मंगळागौरीप्रमाणे बंगालमध्ये मंगलचंडिका नावाने महिला पूजा करतात. पुराण ग्रंथात भगवती मंगल चंडिका स्तोत्र आहे. शिव शंकराने तिला जगन्माता म्हटले आहे. ही भगवती सर्व संकटांचा नाश करणारी आणि सदैव कल्याण करण्यात तत्पर असणारी आहे. सढळ हाताने शुभ, मंगल करणारी, मंगल ग्रहाची परंतु इष्ट देवता असणारी मंगलाधिष्ठात्री आहे. या स्तुतीतले हे वर्णन भगवान शंकराने भगवतीची उपासना करताना केलेलं आहे असे म्हटले आहे. या मंगला देवीची सर्व प्रथम श्री शंकराने उपासना केली त्यानंतर, देवता, मुनी आणि नंतर मानवाने ही उपासना सुरू केली. मनाला विश्वास देणारी एक शक्ती आपण मानत असतो. त्यामुळेच अशा उपासना होत असतात.

कौटुंबिक संस्कार

मंगळागौरीचा खेळ प्रकारचा कौटुंबिक संस्कार आहे. हिंदू धर्मातील कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठीचा मूल्यसंस्कारच. कारण शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती-पत्नी मधील प्रेम आणि निष्ठा याचं हे उदाहरण आहे. मंगळागौर पूजेचे हे अधिष्ठान म्हणजे हेच आदर्श आमच्यात यावेत. शिवाय पूजा समूहाने म्हणजे आपल्या नवविवाहित मैत्रिणी, बहिणी यांच्या समवेत एकत्रितपणे ही आराधना करणे म्हणजे सामुहिक संस्कारच. नवीन लग्न झालेल्या सुनेला, मुलीला या निमित्ताने आपल्या घरातील नातेवाईक मंडळींचा तसेच आपले हितचिंतक, ओळखीचे यांचा परिचय व्हावा हा यामागचा उद्देश आहे.

खेळ आणि व्यायाम

मंगळागौरी पूजनानिमित्त समवयस्क मैत्रिणी व बहिणी जमलेल्या असताना आपले अनुभव एकमेकांना सांगताना, गप्पा मारताना आणि मनोरंजन म्हणून मंगळागौरीचे खेळ व गाणी म्हणण्याची पद्धत आहे. हे खेळ म्हणजे सर्वांगाला व्यायाम देणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच आहेत. महिलांना घरातली कामांबरोबर मनोरंजन, आनंद मिळावा या हेतूने गाण्याची जोड देऊन हे खेळ खेळले जातात. हे जिम्नॅस्टिकच आहे. मनाची एकाग्रता, शरीराची लवचिकता, नेम साधणे हे सर्व आजच्या ॲरोबिक्सप्रमाणे गीतांच्या तालावर व चालींवर खेळले जातात. यात अनेक प्रकारच्या फुगड्या, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ असे ११० प्रकारचे खेळ खेळले जातात. ते खेळताना स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर केलेला असतो. या गीतांतून नवविवाहितेच्या मनातील विचारच प्रगट होतात.

मनातील भावनांना वाट

पूर्वी लहान वयात मुलींचे लग्न होत असे. मुलगी म्हणून बंधने असत. खेळण्या बागडण्याचे वय असतानाही तिला सासरी शिस्तीत राहावे लागे. घरात बोलायची सोय नसल्याने मन कोणाजवळ मोकळे करायचे? जिवाभावाच्या मैत्रिणीशिवाय दुसरं कोण? त्या एक तर समदु:खी असतात. त्यामुळे तिला मन जास्तच कळेल या भावनेतून अशी गीते लिहिली गेली असणार. एकत्र येण्यासाठी निमित्त म्हणून श्रावणात मंगळागौर, भाद्रपदात हरितालिका जागविणे, भोंडला किंवा हादगा किंवा भुलाबाईची पूजेचे प्रयोजन केले जाते. नागपंचमी, संक्रांत, चैत्र गौरच्या निमित्ताने केलेले हळदी कुंकू समारंभ, विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्ग शिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी स्वच्छता यातील कला कौशल्य दाखविणे, संस्कार करणे अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण हे सर्व त्या मुलीला तिच्या आयुष्यात उपयोगी पडणार असते.

मंगळागौरीमागचा उद्देश

वनस्पतींची, आयुर्वेदाची ओळख, औषधी वनस्पतीबद्दल माहिती, संयम, आदर, प्रेम, पदार्थ शिकणे, गाणी म्हणणे, याबरोबरच जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्ये शिकविणे हा उद्देश आवश्यक आहे. त्यामुळे पूर्वी केवळ घरांपुरती मर्यादित असलेली मंगळागौर सामाजिक झाली आहे. सर्वच जण आता हे खेळ आपल्याकडे मुलींना बोलावून कार्यक्रम म्हणून ठेवत आहेत. त्यातून सामाजिक संस्कार घडत आहे. आपल्या संस्कृतीचा जागर असाच होत राहिला पाहिजे. ‘वेळ नाही’च्या निमित्ताने या गोष्टी केल्या नाहीत तर अनेक संस्कार करायचे राहून जातील आणि सतत वरच्या वर्गात ढकलल्यासारखे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com