दीपोत्सव - आनंदोत्सव

वाळी - दीपावली म्हणजे दिव्यांच्या वाळी प्रकाशाची पूजा आपल्या भारतीय सणातला वर्षातला हा सर्वांत मोठा दीपोत्सव.
दीपोत्सव - आनंदोत्सव
Updated on

सोनसळी आश्‍विन हलकेच पुढे सरकतो. रानात तिळाच्या फुलांची पिवळी लाट वाऱ्यावर लहरत असते. जणू पिवळा गालिचाच. सोनचाफासुद्धा आपल्या स्वर्णकांती सुगंधी फुलांची कुपी उघडून सुगंध उधळत असतो. पहाटे हवेत सुखद गारवा येऊ पाहतो. सकाळी प्रभातफेरीला बाहेर पडल्यावर बुचाच्या झाडाखालचा सुगंधाचा सडा हा पाय तिथेच खिळवून ठेवतो आणि हा सुगंध सांगतो दिवाळी जवळ आली की.

वाळी - दीपावली म्हणजे दिव्यांच्या वाळी प्रकाशाची पूजा आपल्या भारतीय सणातला वर्षातला हा सर्वांत मोठा दीपोत्सव. दिव्याची व्याख्या करायची तर असे म्हणता येईल की, जो स्वतः उजळून दुसऱ्यालाही प्रकाश देतो, अंधार दूर करतो तो दीपक म्हणून तर मानव या दीपाचा, तेजाचा पूजक बनला आहे. अवघ्या मानव जातीला प्रकाशाची कायम ओढ असते. अगदी आदी मानवालाही प्रकाशाची ओढ होतीच की. त्याने जेव्हा झाडाच्या फांद्या एकमेकींवर घासून निर्माण होणारा अग्नी पाहिला असेल, त्या अग्नीचे तांडवनृत्य पाहिलं असेल तेव्हा तो घाबरला असेल; पण जेव्हा गारगोटीवर गारगोटी घासून निघणारा इवलासा अग्नीचा, प्रकाशाचा स्फुल्लिंग पाहिला असेल तेव्हा मात्र तो नक्कीच आनंदित झाला असेल. त्यापुढे अथक परिश्रमाने त्याने प्रकाशाचा मार्ग शोधला असेल. पुढे त्याच्यातही परिवर्तन घडवत प्रगतिशील मानवाने बुद्धीच्या जोरावर नवीन शोध लावले आणि आज जग लखलखत्या, तेजाळलेल्या दुनियेत नहातंय.

दिव्याची जन्मकथा सांगताना असंही सांगितलं जातं की, आर्य सुरवातीच्या काळात ध्रुवीय प्रदेशात राहात होते. तिथे सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असे. एवढ्या थंड, अंधाऱ्या रात्रीनंतर उजाडणारा प्रकाशमय दिवस ते नक्कीच आनंदाने नाचून, गाऊन खाऊन - पिऊन साजरा करत असतील. कदाचित त्याचंच रूपांतर दिवाळीच्या सणात, दीपोत्सवात झाले असेल.

तेजाचे प्रतीक

दीप हा अग्नीचे, तेजाचे प्रतीक आहे. त्याच्यामुळे विजय प्राप्त होतो असं पुराण सांगतात. दिवा हा अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष देणारा आहे म्हणून प्रत्येक शुभप्रसंगी प्रथम दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली जाते. दीप हा आपल्या तेजाने एकटेपणाची, असहाय्यपणाची भावना, भीती दूर करून मन उत्साहित आशादायक बनवतो. शरद ऋतूच्या मध्यात म्हणजे आश्‍विन आणि कार्तिक या दोन महिन्यांच्या संधिकालात दिवाळी येते. हे चार दिवस सर्वत्र दिव्यांचा लखलखाट करत हा दीपोत्सव सुरू असतो. शहरात, खेड्यात श्रीमंतांच्या हवेलीत वा गरिबांच्या झोपडीत सारख्याच तेजाने तो उजळलेला असतो. श्रीमंतांच्या हवेलीत हंड्याझुंबरांत, छान नक्षीदार शामदानात तो प्रकाशतो तसाच गरिबांच्या झोपडीतल्या पणतीतही तो उजळतो. काम एकच अंधार दूर करणे.

दीपक हा कितीतरी तऱ्हेने मानवी जीवनाला सहाय्यक ठरतो. रात्रीचा गडद काळोख संपून भल्या पहाटे हलकेच सूर्योदयाची चाहूल लागते. मग दिवसभर तो तेजाची, प्रकाशाची उधळण करतो. संध्याकाळी तो अस्ताला निघताना होणाऱ्या संधिप्रकाश रेषेवर, तिन्हीसांजेला घरीदारी सर्वत्र दिवे लागतात. घरात देवापुढे सांजवात लावून ‘शुभम करोती कल्याणम्‌’ ही दिव्याची प्रार्थना केली जाते. अशी ही प्रकाशज्योती दिवस - रात्र कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तळपून जगातला अंधार दूर करते. घरगुती दिवे पडवी, ओसरी, अंगण, परिसर उजळून टाकतात. तर भरसमुद्रातले दीपस्तंभ नावाड्यांना अंधारात मार्ग दाखवतात. कंदिलाची ज्योत मार्गस्थांना वाट दाखवते तर पालखीपुढे हीच ज्योत दिवट्या होऊन नाचते.

विविध धर्मांमध्ये दीपावलीचे महत्त्व

जैन धर्मीयांमधेही दीपावलीचा उत्सव मोठ्या आस्थेने व आदराने केला जातो. याविषयी एक कथा सांगितली जाते की, अश्‍विनी अमावास्येला भगवान महावीर या शेवटच्या तीर्थंकरांचे महानिर्वाण झाले. त्या वेळी तिथे देव, राजे व अनेक भक्त उपस्थित होते. त्यांनी भगवान महावीरांची पूजा करून दीपाराधना केली. ज्ञानदीप निर्वाणाला गेला. आता आपण साधे दिवे लावून त्यांच्या ज्ञानाचा प्रसार कायम ठेवू. असा विचार जैन मंडळींनी केला. तेव्हापासून भगवान महावीरांचे भक्त दरवर्षी जिनेश्वरांची पूजा करून दीपोत्सव साजरा करू लागले. ही तिथी महत्त्वाची मानून वीर निर्वाण संवत नावाचा एक नवा शकही सुरू करण्यात आला.

कुबेराचा उत्सव

भारतीय वाङ्‌मयातही दिवाळीचे उल्लेख अनेक नावांनी आले आहेत. यक्षरात्री नावाच्या एका उत्सवाचा असाच एक उल्लेख येतो. ही यक्षरात्री म्हणजेच दिवाळी असावी. कारण कुबेर हा यक्षांचा, धनाचा, संपत्तीचा राजा आहे, असे म्हटले जाते. त्या महायक्ष कुबेराचा हा उत्सव. कुबेर पत्नी लक्ष्मीचे या दिवशी पूजन करायचे. हा सणच मुळी उजळलेल्या लक्ष - लक्ष दिव्यांचा, ऐश्‍वर्याचा!

श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून, रावणाबरोबरचे युद्ध जिंकून सीतामाई लक्ष्मणासह अयोध्येला परतले तो दिवस हा. त्यांच्या आगमनाने आनंदित झालेल्या अयोध्यावासीयांनी मग हर्षोत्फुल्ल होऊन हा दीपोत्सव आनंदोत्सव मांडला. अज्ञान मग ते कुठल्याही स्वरूपातले असो, अंधश्रद्धा, अविवेक, अनाचार अशा अनेक अज्ञानरूपी अंधाराचा नाश करून ज्ञानाच्या प्रकाशाने मानवी जीवन उजळण्याचे काम हा ज्ञानदीप अखंड करत असतो; म्हणून तर तो पूजनीय वंदनीय होतो. त्याचा आनंदोत्सव दीपोत्सव मांडला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com