

- प्रा. प्रवीण महालिंग फुटके, परळी वैजनाथ
भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वांत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. भारतात सर्वधर्मीय यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते की दिवाळी हा रोषणाई, उल्हास, प्रेम, मैत्री आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. आपल्या देशात दिवाळी आश्विन महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मोठ्या उल्हासात साजरी होते. आजकाल दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले असले तरी दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व लोक आजही जाणतात. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते.
घरी बनविलेल्या फराळाचे आदानप्रदान केले जाते. दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो, ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतेसह अयोद्धेला परतले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात. अशावेळी दिवाळी आपल्या प्रियजनांना भेटण्याची संधी घेऊन येतो. चला तर मग आपणही आपली दिवाळी फटाके न फोडता प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि पर्यावरण संवर्धनात आपलेदेखील योगदान देऊया.
दिवाळीला आम्रपर्णाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावले जाते. अंगणात रांगोळ्या काढल्या जातात. त्याबरोबर घरात चारही बाजूंना पणत्या लावल्या जातात. दिवाळीसाठी नवीन वस्तू खरेदी होते किंवा या उत्सवात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. मुख्यतः महिला या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. दिवाळी साजरी करण्यामागे कोणतेही कारण असो बाजारात या उत्सवादरम्यान उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वांत प्रसिद्ध उत्सवांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ रोषणाईचा सम किंवा दीपोत्सव असा आहे. भारतभर वेगवेगळ्या धर्माचे लोक हा उत्सव साजरा होतो. पाच दिवस चालणारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. घराघरात एक-दोन आठवड्याअगोदरच दिवाळीची तयार सुरू होते. यामध्ये घराची साफसफाई, रंगरंगोटी आदी कामांचा समावेश होतो. कपड्यांसह फराळ साहित्याचीदेखील या काळात खरेदी होते. घरासमोर आकाश कंदील लावले जातात. अंगण सडा-रांगोळीने सजविले जाते.
दिवाळीच्या पाच दिवसांनी सुरवात ही धनत्रयोदशीने होते. या दिवशी लोक नवीन वस्तू आणि दागिन्यांची खरेदीला प्राधान्य देतात. दिव्यांनी घर सजविले जाते. धन्वंतरी पूजन केले जाते. दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा असतो. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून मानला जातो. तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. पाच दिवसांच्या उत्सवातील सर्वांत महत्त्वाचा दिवस. ज्याला आपण दिवाळी असेही म्हणतो. या दिवशी मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने माता लक्ष्मी, श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. घरासह अंगणात दिव्यांची सजावट केली जाते. रांगोळ्या काढल्या जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात. या दिवशी व्यापारी, उद्योजक आपल्या आस्थापनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.
दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. पाचवा दिवस हा भाऊबीजेचा असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करते. भाऊ बहिणीला छानसे उपहार भेट देतात व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. रक्षाबंधनाइतकाच हा दिवस पवित्र मानला जातो. या दिवशी विवाहिता भावाला ओवाळण्यासाठी माहेरी येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.