Navratri Utsav : मातेच्या अन् मातीच्या सन्मानाचा उत्सव

भारतीय संस्कृतीला विविध सणांची परंपरा आहे. या संस्कृतीप्रमाणे विविध देवी देवता, निसर्ग, निसर्गातील झाडे, प्राणी सर्वांना देवत्व बहाल केले आहे.
Navratri Utsav
Navratri Utsavsakal

- साधना उमरीकर

भारतीय संस्कृतीला विविध सणांची परंपरा आहे. या संस्कृतीप्रमाणे विविध देवी देवता, निसर्ग, निसर्गातील झाडे, प्राणी सर्वांना देवत्व बहाल केले आहे. ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही ती सर्व दैवते असा प्राचीन प्रघातच आहे. निसर्गाची सृजनशक्ती ही पूजनीय मानली आहे. जणू काही ही शक्ती म्हणजे देवी. म्हणून स्त्री रूपातील या शक्तीचा सन्मान करण्याचा काळ. मातीचा आणि मातेचा सन्मान, आदर करण्याचा काळ म्हणजे नवरात्र.

भारतातील बहुतेक सण व्रते, विधी, उत्सव हे कृषिजीवनाशी जोडलेले आहेत. ते मूलतः जमिनीची सुफलनशक्ती वाढावी, जीवन सर्वार्थाने सुखकर व समृद्ध व्हावे या मूलभूत मानवी जाणीवेतून निर्माण झाले आहेत. आपले जीवनचक्र सुरळीत चालावे, प्रत्येकाची अन्नपाण्याची गरज पूर्ण व्हावी, यासाठी भूमी, पाणी आणि निसर्ग या सर्वांचा अभ्यास आणि निरीक्षण मानवाने केले.

मानवाचे सर्व जीवनच अन्नावर अवलंबून आहे. म्हणून सर्वार्थाने आणि प्राधान्याने महत्त्व आले ते अन्ननिर्मितीला. जमीन सुजलाम् सुफलाम् करण्याचा ध्यास त्याने घेतला. याबरोबरच सृष्टीतील कार्यकारणभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सुरवातीच्या काळात सर्जन किंवा निर्मिती ही एक अनाकलनीय गूढ कल्पना होती. परंतु ती नैसर्गिक आणि जगण्यासाठी अत्यावश्यक असल्यामुळे तिचे निरीक्षण आणि अभ्यास करणे क्रमप्राप्तच होते. कोणता काळ वनस्पतीवाढीसाठी योग्य आहे, कोणत्या काळात त्या जोमाने वाढतात? अशा प्रश्नांची उकल करण्याबरोबरच त्या वनस्पतीचा रंग, वास, स्वाद, त्याचे शरीरासाठी किंवा वाढीसाठी उपयोग याचा अभ्यास सुरू झाला.

यासोबतच जमीन, पाणी आणि निसर्गातील इतरही संवर्धनाचा अभ्यास मानवाने केला आणि शेती संस्कृतीचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात मातीमधून नवनिर्मिती होऊ शकते, हे स्त्रियांनीच पुरुषांना दाखवून दिले. मुळात शेतीचा शोधच स्त्रियांनी लावला. यातूनच एकाचे अनेक करण्याचे कसबही त्यांनी जाणले.

विश्वातील दातृत्वाची भावना त्यांच्या लक्षात आली आणि साऱ्या सृष्टीला जोपासणाऱ्या निसर्गाप्रती आदर निर्माण झाला. मानवाचा जसजसा विकास झाला, तसतशी त्याची कल्पनाशक्तीदेखील बहरत गेली. त्यातूनच सृष्टीतील अनाकलनीय गोष्टींना मानवाने देवत्व बहाल केले. ज्या काळात ज्याचा बहर ते त्या काळात पूजनीय आहे म्हणून त्याची आदरयुक्त भावनेने पूजनही सुरु झाले.

अन्ननिर्मितीशी असलेल्या सर्व घटकांना महत्त्व येऊन त्यांच्या पूजनाचा सार्वजनिक उत्सव सुरू झाला. शेतीला म्हणजेच अन्ननिर्मितीला सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते यामुळेच. या शेती संस्कृतीतूनच मानवाची जीवनपद्धती विकसित झाली. या जीवनपद्धतीप्रमाणे एकोप्याने राहणे, सण समारंभ एकत्रित आणि आनंदाने साजरे करणे व निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ईश्वराने दिली या कृतज्ञ भावनेतून दैवतांचे पूजन सुरू झाले.

पिकाचे नियोजन

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंशी निगडीत विविध उत्सव सुरू झाले. पावसाळा संपल्यानंतर येणारा पिकाचा काळ म्हणजे रब्बी हंगाम. या काळात खरिपाचे पीक हाती आलेले असते. त्यामुळे शेतकरी आनंदात असतो आणि पुढील हंगामाची जुळवाजुळव करत असतो. नवरात्र म्हणजे खरीप पिकाचे स्वागत आणि रब्बी पिकाच्या बियाणांची उगवणक्षमता तपासण्याची प्रयोगशाळाच असते.

बीजपरीक्षण, मातीपरीक्षण, पाणीपरीक्षण आणि हवामान इत्यादींची चिकित्सा करणे व त्यावरून आडाखे बांधून पुढील पिकाचे नियोजन करणे म्हणजे नवरात्र साजरे करणे होय. म्हणून शेतीच्या दृष्टीने घटस्थापनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भाद्रपद महिना संपून आश्विन महिना सुरू होतो. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते.

मातीच्या आणि मातेच्या अद्‍भुत सृजनशक्तीचे प्रतीक म्हणून घट बसवतात. घट बसवणे ही प्रतीकात्मक संकल्पना आहे. घट म्हणजे कुंभ. हा घट किंवा कुंभ आपल्याच शेतातील माती आणून देवासमोर बसवून त्यावर रब्बी हंगामात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पेरले जाते. या घटात शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घातले जाते. घट हा मातीचाच वापरला जातो.

कारण त्यातून पाणी झिरपून बियाणे रुजविणे आवश्यक असते. घटातील हळूहळू झिरपणारे पाणी धान्याला मिळाल्यामुळे ते बहरून येते. घटातील पाणी झिरपण्याच्या निरीक्षणावरूनच आज अनेक सिंचन पद्धती विकसित झालेल्या आहेत. बियाणे रुजून धान्य उगवण्याचा काळ हा साधारणपणे आठ दिवसांचा असतो. जे धान्य चांगल्या प्रकारे उगवून आले ते रब्बी हंगामात पीक घेण्यास उत्तम असा संकेत किंवा अंदाज शेतकऱ्यांना येतो.

त्याप्रमाणे तो पिकांची निवड करून पेरणी करतो. विजयादशमीच्या दिवशी हे धान म्हणजे धन समजून घेऊन तो सीमोलंघन करतो. हे धान इतरांनाही वाटतो. आपल्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक तो सीमेपर्यंत पोचवतो. घरोघरी घेण्यात आलेल्या परीक्षणाचे निकाल एकत्र करून देवाणघेवाणीतून अभ्यासले जातात. कोणते धान्य पेरल्यास जोम धरून येईल, या विचारांची देवाणघेवाण होते.

या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणि बीजपरीक्षण जसे होते त्याचबरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे, याचेही परीक्षण केले जाते.  सर्वानुमते कोणते मुख्य पीक घ्यायचे यास मान्यता देऊन देवीच्या नावाने आनंदाने घोषणा दिल्या जातात, तिचा उदोउदो करतात.

अशाप्रकारे पावसाळा संपला असल्यामुळे ‘पाणी जपून वापरा’, ‘पाण्याचा संचय करा’ असाही संदेश यातून दिला जातो. एकूणच नवरात्र साजरे करणे ही शास्त्रीय पद्धत असून तिला देवाचे अधिष्ठान दिल्यास सर्व समाज आदरयुक्त भीतीने का होईना एकत्रित येईल आणि स्वकल्याणासाठी निसर्गनिर्मितीस हातभार लावेल, अशी प्रथा, परंपरा निर्माण झाली.

या परंपरेचे पालन करणे आणि सुरू ठेवणे हे फक्त शेतकऱ्यासाठीच नव्हे तर समस्त मानवजातीसाठी हितकारकच आहे. कारण आपण सर्वजण शेतकऱ्यांप्रती आणि पर्यायाने निसर्गाप्रती ऋणी राहिलेच पाहिजे. हीच आपली परंपरा आणि हाच आपला उत्सव !!

(लेखिका बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (गृहमातीविज्ञान) आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com