esakal | नवरात्रोत्सवात तरुणाईला गरब्यात थिरकण्यास बंदी; शारदीय उत्सवास आजपासून प्रारंभ I Navratri Festival
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival

महिलांसह तरुणाई ज्या नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहात असते, तो उत्सव आजपासून (गुरुवार) सुरू होत आहे.

नवरात्रोत्सवात तरुणाईला गरब्यात थिरकण्यास बंदी

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : गणेशोत्सवापाठोपाठ (Ganeshotsav) महिलांसह तरुणाई ज्या नवरात्रोत्सवाची (Navratri Festival) आतुरतेने वाट पाहात असते, तो उत्सव आजपासून (गुरुवार) सुरू होत आहे. पण, कोरोना कमी झाला असला तरी संपलेला नाही. त्यामुळेच यावर्षीही संगीताच्या तालावर, विद्युत प्रकाशाच्या झोतात तरुणाईला रास दांडिया गरब्यात थिरकता येणार नाही. यावर्षीही आदिमाया, आदिशक्ती देवी भगवती दुर्गामातेचा हा उत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे.

लाडक्‍या गणरायांना निरोप दिल्यानंतर उत्सवप्रिय नागरिकांना दुर्गामातेच्या (Shardiya Navratri) पूजनाचे, नऊ रात्री जागविण्याचे वेध लागलेले असतात. शहरासह ग्रामीण भागातही नवरात्रीची धूम, जल्लोष जोरात सुरू असायचा. मात्र, कोरोनाने वर्षानुवर्षाचे हे चित्रच बदलून टाकले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही अद्याप कोरोनाचे सावट आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली होती. त्यामुळे प्रशासनाने काही नियम शिथिल केले. कोरोना कमी झाला. पण, तो संपलेला नाही. आता गेल्या चार दिवसांत पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने मंदिरे खुली केली असली तरी उत्सवावर बंदीच ठेवली आहे. त्यामुळेच यावर्षीही रास गरबा दांडिया काही रंगणार नाही.

हेही वाचा: भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी; 12 वी विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज

मात्र, नागरिक हा उत्सव साधेपणाने पण उत्साहाने साजरा करणार आहेत. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या दुर्गामातेच्या मूर्ती कुंभारवाड्यात तयार झाल्या आहेत. उद्या (गुरुवार) त्यांची साधेपणाने प्रतिष्ठापना करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरीही बहुतेक मंदिरांत होमहवन, मंत्रपठण, आरती अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या घरोघरी, अनेक मंदिरांतून घटस्थापना होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीने आज बाजारपेठ भरून गेली आहे.

हेही वाचा: उद्या 'घट' बसतील; पण घरातच 'घट्ट' बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?

कॉलेजकुमार अन्‌ कन्याही आचरतात व्रत

नवरात्रात महिला नऊ दिवस उपवास करतात. या उपवासासाठी प्राधान्याने फळांचा वापर केला जातो. त्यामुळे साताऱ्याची बाजारपेठ फळांनी भरून गेली आहे. महिलांसह पुरुष आणि तरुण, युवतीही हे उपवास भक्‍तिभावाने करत असतात. अगदी कॉलेजकुमार आणि कन्याही नऊ दिवस पादत्राणे न घालता दुर्गामातेचे व्रत करतात.

loading image
go to top