परिवर्तनाची मुहूर्तमेढ!

फुलापानांतून सजलेल्या चैत्राचं स्वागत गुढ्या-तोरणांनी केलं जातं, ते सर्वांगांत चैतन्य निर्माण करणाऱ्या चैत्र शुध्द प्रतिपदा वर्षारंभीचा दिवस म्हणजेच चैत्र पाडवा.
Gudi Padwa
Gudi PadwaSakal
Summary

फुलापानांतून सजलेल्या चैत्राचं स्वागत गुढ्या-तोरणांनी केलं जातं, ते सर्वांगांत चैतन्य निर्माण करणाऱ्या चैत्र शुध्द प्रतिपदा वर्षारंभीचा दिवस म्हणजेच चैत्र पाडवा.

- शुभांगी कात्रेला, प्राधिकरण

फुलापानांतून सजलेल्या चैत्राचं स्वागत गुढ्या-तोरणांनी केलं जातं, ते सर्वांगांत चैतन्य निर्माण करणाऱ्या चैत्र शुध्द प्रतिपदा वर्षारंभीचा दिवस म्हणजेच चैत्र पाडवा. आज काळोख्या आभाळाला झालेला हा सोनेरी किरणांचा स्पर्श, त्याच सोनेरी किरणाच्या स्पर्शाने एकमेकांतील सुसवांदाची द्वारे आज उघडायची अन् नव्या परिवर्तनासह या विजयोत्सवाचं दिमाखदार प्रतीक असलेल्या चैत्रगुढी स्वागत करायचं...

संस्कृतीच्या क्षितिजावर

पहाट नवी उजळून आली

आयुष्यात पुन्हा नव्याने

क्षण हे मोलाचे घेऊन आली

वेचून घेऊ क्षण ते सारे

सुसंवादनं करू नववर्ष साजरे...

फाल्गुन-होळीचे सप्तरंग मनामनांत ताजे असतानाच कोवळा, हिरवा, पोपटी पर्णसंभार सृष्टीचं अप्रूप लेणंच वाटतं. चैत्र म्हणजे वंसत ऋतुतील पालवीचे सुंदर मनोगत! या दिवसात असं एकही झाड नसतं ज्याला चैत्र शुध्द प्रतिपदेचा खास मोहोर फुटत नाही. निसर्गातील प्रत्येक झाड, वेली या वसंतात सर्वांगाने फुलून येतं. आपल्या अलौकिक सुगंधानं मोहित करणारा मोगरा, लाल, हिरवे, जांभळे सडे शिंपणारा गुलमोहर, पानाआडून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा सुगंधी पिवळा चाफा. आपल्या उन्मादक मदनाची ग्वाही देऊन मंद गंधाची उधळण करणारी रजनीची राणी म्हणजे रातराणी. सुगंधाची ही संगत चैत्रात मनामनाला सुखवणारी असते. असा हा सृष्टीचा निसर्गाचा एकमेकांशी असलेला शब्देविण संवादु असा हा निसर्ग आपल्याला एकमेकांशी सुसंवादाची साद घालण्याचाच कानमंत्र देत असतो. फुलापानांतून सजलेल्या चैत्राचं स्वागत गुढ्या-तोरणांनी केलं जातं, ते सर्वांगांत चैतन्य निर्माण करणाऱ्या चैत्र शुध्द प्रतिपदा वर्षारंभीचा दिवस म्हणजेच चैत्र पाडवा.

आज काळोख्या आभाळाला झालेला हा सोनेरी किरणांचा स्पर्श, त्याच सोनेरी किरणाच्या स्पर्शाने एकमेकांतील सुसवांदाची द्वारे आज उघडायची अन् नव्या परिवर्तनासह या विजयोत्सवाचं दिमाखदार प्रतीक असलेल्या चैत्रगुढी स्वागत करायचं...

चैत्र म्हणजे वसंताचा ऊँ. वसंत म्हणजे चैतन्याचा कोंब. वसंत म्हणजे हिरवाईचा ध्यास. वसंत म्हणजे नवनिर्माणाची आस. अन् वसंत म्हणजे भविष्यकाळ पहाण्याची दृष्टी. मानवी नात्यांमधील ओलावा सुसंवादातून जपण्याचा वृध्दिंगत करून वसंतासारखीच हिरवाई सर्वत्र निर्माण करणारा गुढीपाडवा. वातावरणातलं संजीवक सत्व आपल्याही अंतःकरणात नवं ते, नवी ऊर्मी बहाल करतं. थंडीचे दिवस संपून उषःकाल सुर होतो.

अन् वसंताचं आगमन कोकिळेच्या सादेने होतं. वसंत म्हणजे नवीन रचनेचे, सृष्टिचे प्रतिक होय. शिशिरात झालेली पानगळ पायातळी अंथरून निष्पर्ण झालेली विरागी झाडं निसर्गाचा संदेश शिरसावंद्य मानून, समर्पणभाव जागृत करत जुनी पाने गळून नव्या अंकुरांना जागा करून देतात. अंग झटकून आळस देतात आणि तयारी सुरू होते ती ऋतुराजाच्या स्वागताची म्हणजेच वसंताची.

प्रत्येक सणामागे रूपक दडलेले असते. गुढीपाडव्यासोबतच वसंत ऋतू आगमन होते. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा वसंत आणि उत्सवातून संवादरूपी शब्दांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा वसंत बहरायला हवा. यातूनच विचारांची देवाण-घेवाण आणि संस्कृती टिकू शकेल. त्यामुळे उत्सव हे ऐक्याचे बोधक आणि प्रेमाचे संवर्धक आहेत.

सत्यम शिवम सुंदरम या त्रिसूत्रीधा संगम म्हणजे भारतीय संस्कृती. सण, उत्सव, समारंभ साजरे करण्यामागे भावशुध्दी चित्तशुध्दी, कर्मशुध्दी असे उद्देश असतात. सण आणि उत्सव हे आनंद देण्यासाठी, एकमेकात संवाद साधून एकसंघ होण्यासाठी असतात. कोवळ्या पालवीला नवचैतन्य देण्याचे कार्य निसर्ग करत असतानाच निसर्ग मानवाला देखील एकमेकांत संवाद साधून कौतुकसोहळा कृतज्ञतेने साजरा करून जीवनाचा उत्सव साजरा करण्याचा संदेश देत असतो.

चैत्राची सोनेरी पहाट

नव्या स्वप्नांची नवी लाट

नवा आरंभ, नवा विश्वास

नव्या सुसंवादाची हीच तर खरी सुरुवात...

राजाचं राजेपण असो की रंकाच साधेपण. दोघांनाही डौलदार सामर्थ्य सृष्टीनं आरंभलेल्या सण संवाद महोत्सवातच आहे. रानावनातल्या तरुवेलीचा चैत्रजागर आपोआपच माणसापर्यंत येतो कडूलिंबही मधुर आहे, हे सांगत परंपरा सुंदर जगण्याचंच समुपदेशन करते. ऐकणारे कान उपस्थित असतील. तर ठाई ठाई संजीवन देणारे स्वर असतातच. त्याच स्वरांची मैफल आता जळी-स्थळी सर्वत्र जमून आली आहे. पृथ्वीलाही भोग सुटत नाहीत. आपण तर पामर माणसाची काय कथा? पण तीही शिशिर अलिप्तेतून सुटका करून घेत चैत्रातून मोहरतेच. जणू येणाऱ्या वैशाखाला सांगते तुला काय दाह द्यायचा तो दे. पण मी माझं बहरणं सोडणार नाही, हे सांगत अस्मितेची गुढी उभारते. या अखंड वाग्यज्ञाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? कारण तेच तर आपल्या आयुष्याचं संवादसंगीत आहे. त्या आतल्या संवादाकडे पाठ फिरवली तर आपल्याला आपला सूर कसा सापडेल, हा सच्चा संवादाचा सूर आपण शोधालाचं पाहिजे हे सांगणारी ही संवादगुढी म्हणजे चैत्रगुढी. नकळत उसवलेल्या जुन्या गुंत्याचं जग जणू टपोर भरतकामाकडे वळलं आहे.

समर्थ रामदास स्वामी सांगतात...

‘जनी वादविवाद सोडून द्यावा,

जनी सुखसंवाद सुखे करावा...’

कालचे रुसवे उद्याच्या प्रीतीत रूपांतरित होतील ते संवादाच्या माध्यमातून आजपावेतो ठसठसणारे दश क्षमेच्या मुशीतून बाहेर येत नव्या मैत्रीसाठी नव्या नात्यासाठी साद घालीत आहेत. संवाद आणि परिवर्तन ही आपल्या यशस्वी जीवनाची पताका आहे हीच जीवनाची पताका आपण चैत्रगुढीच्या. संस्कृतीच्या सहाय्याने पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे.

आजच आपले जग अतिशय गतिमान झाले आहे. थांबला तो संपला अशी अवस्था आहे. कुणाशी कुणाला बोलायला वेळ नाही. वेळ न मिळणे हीच एक समस्या बनली आहे. कार्यालयात फायलीमधून डोके वर काढायला उसंत नसते. प्रवासातही माणसे गप्प असतात. नाही तर लॅपटॉप चालू असतो. इअरफोन कानाला लावलेला असतो. शेजारी बसलेल्यांची फिकीर नसते, फ्लॅट संस्कृतीत तर दारे बंदच असतात. बंगला संस्कृतीत तर आपल्या आपल्यातलेच अंतर वाढवलेले दिसते.

दूरचित्रवाणीच्या संचाचा आवाज सर्वत्र बोलत असतो. आभासी दुनियेतल्या सुखदुःखांशी एकरूप होतात. पण आजूबाजूच्या जिवंत माणसांशी, एकमेकांशी बोलायला फुरसत नसते. मग एकमेकांना जाणून कसे घेणार, बोलल्याशिवाय माणूस समजत नाही.

संवाद हे माणूस जाणण्याचे प्रभावी माध्यम आहे. आज विसंवादाची दरी वाढत जाताना दिसते. आपण एकलकोंडे बनत आहोत. संवाद तुटणे म्हणजे मनोरुग्ण बनणे नव्हे का? आजी-आजोबांना नातवांशी दंगामस्ती करायची असते. त्यांना त्यांच्या बरोबर आपलं ही बालपण अनुभवयाचं असतं. दुधावरची साय जपायची असते. पण संवाद तुटलेल्या घरकुलात त्यांनाही स्थान राहत नाही. संवादाविना, सहसंवादाविना कुटुंब मोडकळीला येऊ लागली आहेत. संवाद हा नुसता संवाद कधीच नसतो तर सहसंवाद असतो. त्यातूनच जाणीवा, वेदना कळतात, अन् जेव्हा जाणीवा, वेदना सहवेदना होतात तेव्हाच तर मनाची मंदिर उभी राहतात.

चैत्र हा जगण्याचा अर्थ सांगणारा महिना. भविष्याचे सोनेरी वरदान घेऊन, समृध्दीची चिन्हे उमटवत वर्षप्रतिपदा येते ते आपले जीवन नव आशांनी नव आकांक्षांनी जागृत करण्यासाठी. सप्तरंगांची उधळण करत चैत्री पाडवा येतो. तो मनामनांची नाती दृढ करण्यासाठी. आयुष्यातील यशस्वितेचा आराखडा दोन पावलांवर उभा करावा, एक पाऊल व्यक्तिचं, तर दुसरं पाऊल समाजाचं समाज म्हणजे व्यक्तिव्यक्तिची एकत्रता, सहकार्य, सहभागीपणा. एकमेकांशी एकतेचे धोग जोडत संवादाची परपरेची संस्कृती जागृत करायची. आपण सगळी माणसे मानव आहोत. आपल्या संगळ्यांचे रथ भूमीवरूनच चालायचे. देवाण घेवाण हा आयुष्याचा भाग आहे, असे जाणून पुनःभेटीच्या आनंदासाठी आश्वासक भाव मनात घेऊन सुसंवादाचे पुल बांधत गाणे म्हणायचं. सातत्याने सुंसवादाच्या विश्वासत राहायचे. मनातले हे सुंसवादी सुरच पुनःप्रत्ययाचा आनंद देतात आणि भविष्यातील सुसंवादी भेटीची स्वप्नेही रंगवतात.

ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्व निर्माण केले. असे मानले जाते ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीतील सर्वात नितांत सुंदर गोष्ट म्हणजे माणूस होय. त्याच्यातील माणसाला माणुसकीच्या संवादाची आज जाग आली तर संबंध मानव जातीच्या कल्याणाची पहाट झाल्याशिवाय राहणार नाही. जे मुळात आहे, ते अधिक सुंदर करणे म्हणजे संस्कृती. संस्कृतीमध्ये संस्कार आणि कृती, परिवर्तन असा अद्वैतभाव आहे. हीच आपली संस्काराची, सुसवादाची गुढीची संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला प्रदान करायची. खऱ्या अर्थाने सुसंवाद, परिवर्तन, सामर्थ्य, विजय व आनंद याचे प्रतीक असलेल्या गुढीच्या या संस्कृतीमुळे आपणा सर्वांच जगणं अधिक सुंदर व संवादमय होईल यात शंका नाही.

नवरंगांची करीत उधळण

आली ही पाडव्याची गुढी

प्रातःकाळी अशी उमटली

दारी रंगावली

असा सणांचा वसा जपावा

चालीरीती शिकवूनी

फुलत रहावी परंपरेतून

संस्कृती सदनी...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com