हजार गाईंची गोशाळा

कणेरी येथील सिद्धगिरी मठाने धार्मिक क्षेत्रात सक्रिय राहण्याबरोबरच सेंद्रिय शेतीही केली आहे. त्या अनुषंगाने विविध जातींच्या देशी गाईंचे जतन करण्याच्या उद्देशाने मठाने पंचवीस वर्षांपूर्वी गोशाळा सुरू केली
हजार गाईंची गोशाळा
हजार गाईंची गोशाळा

-मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर

कणेरी येथील सिद्धगिरी मठाने धार्मिक क्षेत्रात सक्रिय राहण्याबरोबरच सेंद्रिय शेतीही केली आहे. त्या अनुषंगाने विविध जातींच्या देशी गाईंचे जतन करण्याच्या उद्देशाने मठाने पंचवीस वर्षांपूर्वी गोशाळा सुरू केली. आज तेथे सुमारे एक हजार देशी गाईंचे संगोपन केले जात आहे. मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर यांच्या प्रयत्नांतून गोशाळा उभी राहिली आहे. केवळ मठाधिपती म्हणवून न घेता आदर्श व्यवस्थापक म्हणून त्यांचे कार्य सुरू आहे.

काही वर्षांपासून संकरित गाईंचे पालन किंवा त्यांची संख्या वाढत असल्याने देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे विविध जातींच्या देशी गाई मिळविण्यासाठी मठाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. दुष्काळी भागात जायचे, तेथे जनावरे पाहायची व तेथील देशी जनावरे घेऊन यायची, असा उपक्रम त्यांनी राबविला. केवळ त्यांचे पालनपोषण व संवर्धन हाच हेतू ठेवून त्या नेल्या जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गाई मठाला तशाच दिल्या. गाईची जात व इतर वैशिष्ट्ये पाहूनच ती गोठ्यात आणण्याचा उपक्रम सुरू आहे.

गोठ्याची रचना

गोशाळेच्या सुमारे पाच एकर क्षेत्रात जनावरांचा गोठा आहे. यामध्ये मध्यभागी शेड आहे. पाणी, चाऱ्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. एके ठिकाणी जनावरांना पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी बंदिस्त गोठा आहे, तर इतर ठिकाणी मुक्त पद्धतीने जनावरे सोडली जातात. जनावरांच्या खाद्यासाठी विविध प्रकारच्या चारा पिकांचा वापर केला जातो; यामध्ये हायड्रोपोनिक्स, मुरघास, कडबाकुट्टी पशुखाद्य, मिल्क रिप्लेसर, खनिज मिश्रण, मका, ज्वारी, बाजरी, कडवळ, मारवेल गवत, फुले गुणवंत, सुपर नेपियर यांचा जनावरांच्या वाढीसाठी फायदा होतो. यामुळे दुधात अर्धा ते एक लिटर वाढ होते. जनावरांच्या प्रतिकारशक्तीतही चांगली वाढ होते. याशिवाय मका, बाजरी आदी धान्य भरडूनही दिले जाते. पेंडीचा वापरही केला जातो. जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरण व अन्य सेवेसाठी कायमस्वरूपी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. प्रतिजनावर दिवसाला वीस किलो ओला व सुका चारा दिला जातो. दिवसा वीस लिटर पाणी दिले जाते. गोशाळेचे स्वतःचे पशुखाद्य निर्मिती केंद्र आहे, त्यामुळे जनावरांना संतुलित पशुआहार मिळतो, त्यामुळे खर्चात बचत होते व दुधाची प्रत उत्कृष्ट राहते.

सेंद्रिय दूध, तूप, ताकाची विक्री

गोशाळेत दररोज २०० लिटर दुधाचे संकलन होते. यात खिलार गाय सरासरी चार लिटर, गीर दहा लिटर, साहिवाल दहा लिटर, कांक्रेज पाच लिटर, तर खडकी खिलार तीन ते पाच लिटर दूध देते. दूध काढणे व इतर व्यवस्थापनासाठी तीस मजूर काम करतात. शंभर रुपये प्रति लिटर हा दुधाचा दर आहे. कोल्हापूर परिसरातील ग्राहकांना घरपोच विकले जाते. येणाऱ्या पर्यटकांना दहा रुपये ग्लास या दराने ताक विकले जाते. प्रतिकिलो अडीच हजार रुपये दराने तूप विकले जाते. यातून मिळणारे उत्पन्न गोठ्याच्या देखभालीसाठीच वापरले जाते. मठाचा लोकसंपर्क जास्त असल्याने तूप, दुधाची विक्री सहजतेने होते. याशिवाय पंचगव्यापासून (गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप) विविध उपपदार्थ तयार करण्यात येतात. तेल, साबण, धूप, गोमूत्र अर्क आदी उपपदार्थ निर्मितीही नुकतीच सुरू केली आहे.

शेण-गोमूत्र मठाच्या शेतीला

मठाची सुमारे शंभर एकर सेंद्रिय शेती आहे. यात ऊस, चारा पीक, आंबा, भात, भुईमूग आदी पिके आहेत. आता मकाही घेतला आहे. गोठ्यात तयार होणारे शेण, मलमूत्र मठाच्या सेंद्रिय शेतीत वापरले जाते. यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होते. गोठ्याची स्वच्छता केलेले पाणीही थेट शेतीलाच दिले जाते.

गोबरगॅस प्रकल्पातून इंधननिर्मिती गोठ्याच्या ठिकाणीच गोबरगॅसचा प्रकल्प आहे. दररोज तीस अश्‍वशक्ती ऊर्जा तयार होते. दिवसाला पाच ते सहा तास त्याचा वापर केला जातो. गोठ्याशेजारीच असणारे सिद्धगिरी इस्पितळ, गुऱ्हाळघर यांना इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो.

गोशाळेची वैशिष्ट्ये

  • गाईंची जोपासना केल्यास जमिनीचे व मानवी आरोग्य सुधारते. यामुळे त्यांचे जतन करून जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न.

  • कोणत्याही देशी गाईचा संगोपनासाठी स्वीकार.

  • देशभरातील दुर्मीळ जातीच्या देशी गाईंचा गोठ्यात संग्रह.

  • शेणखताचा मठाच्या शेतीसाठी उपयोग.

  • शेणखतावर प्रक्रिया करून विक्री.

  • प्रत्येक जातीसाठी वेगळा गोठा.

  • कोणताही व्यापारी हेतू न ठेवता दुर्मीळ देशी गाईंचे संवर्धन व्हावे यादृष्टीनेच गोशाळेची उभारणी.

  • ज्या शेतकऱ्यांना आपल्या गाईंचे व्यवस्थापन करणे अशक्‍य होते, ते शेतकरी या गोशाळेत गाई आणून सोडतात. दुष्काळी भागातून, तसेच कसायांकडे जाणाऱ्या गाईही इथे आणल्या गेल्या आहेत.

विविध जातींचे संवर्धन

मठाने जशा उपलब्ध होतील तसे गाईंचे संकलन केले. बोटांवर मोजण्याइतक्या गाईंपासून गोठा अस्तित्वात आला. आज देशातल्या बावीस जातींच्या गाई मठाच्या गोठ्यात आहेत. प्रत्येक गाईची वेगळी नोंद आहे.

गोवंश मूळस्थान

वेचूर - कोटाय्याम-केरळ

उंबलचेरी - तंजावर नागापट्टणम व दिंडी गुल तमिळनाडू.

थारपारकर -कच्छ – गुजरात. जैसलमेर व जोधपूर – राजस्थान.

साहीवाल - फिरोजपूर – पंजाब, श्रीगंगानगर – राजस्थान.

बारगूर - इरोड, पेरियार, बारगूर टेकड्या – तमिळनाडू.

राठी - बिकानेर, गंगानगर व हनुमानगड – राजस्थान, अमोर-पंजाब.

कंगायाम - इरोड, कोईमतूर - तमिळनाडू.

अमृतमहाल - हसन मंगरूळ-कर्नाटक.

डांगी - नाशिक, धुळे, नंदुरबार – महाराष्ट्र. पंचमहल, डांग – गुजरात.

गीर - अमरेली, कावनगर, जुनागढ राजकोट. गीर जंगलावरून गीर हे नाव पडले

देवणी - लातूर उदगीर – महाराष्ट्र, आंध्र प्रदेश.

म्हैसूर खिलार - म्हैसूर, मंड्या, कोलार, हसन, चित्रदुर्ग- कर्नाटक.

कांक्रेज - कच्छ, मेहसाना, अहमदाबाद- गुजरात, खेडा- जोधपूर.

कोकण कपिला - कोकणपट्टी, पश्‍चिम घाट विभाग - महाराष्ट्र.

खिलार - सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर- महाराष्ट्र.

कृष्णावेल्ली - घटप्रभा, बेळगाव – कर्नाटक. मिरज, सातारा, कोल्हापूर- महाराष्ट्र.

ओंगल - प्रकाशम, नेल्लोर, गुंटूर- आंध्र प्रदेश.

निमारी - बडवानी, खारगाव- मध्य प्रदेश.

लाल कंधारी - लातूर, नांदेड व मराठवाडा- महाराष्ट्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com