
Spiritual Tips : सहज मिळवता येऊ शकतो निखळ आनंद, जाणून घ्या गीतेतील रहस्य
श्रुती आपटे -
Spiritual Tips For Being Happy : आयुष्यात प्रत्येकच माणूस आनंदाच्या शोधात असतो. त्यासाठी प्रचंड काबाड कष्टही घेतो. पण शेवटी क्षणिक आनंदच मिळतो आणि तोही मावळतो. हा अनुभव आपल्या पैकी बहुतेकांचा असतो. मग पुन्हा माणूस नवा आनंद शोधू लागतो. त्यामुळे आयुष्यभर माणूस आनंदाच्या शोधात धडपडतच राहतो पण निखळ आनंद मिळत नाही.
पण खरा निखळ आनंद कशात हे याचे गुपित गीतेत आहे. ज्यात प्रभू श्रीकृष्णाने सांगितले आहे की हा आनंद प्रत्येकच जण मिळवू शकतो. फक्त जरा दृष्टी बदलणे आवश्यक आहे. जाणून घेऊया सविस्तर.
अरे कौंतेया, पाण्यामधील रसतत्व मी आहे.चंद्र सूर्यातील प्रभा, सर्व वेदांमधील ओंकार, आकाशातील ध्वनी, पुरुषांमधील सामर्थ्य मी आहे.
परमात्मा या चराचरांत भरून राहिला आहे असे वारंवार श्रीकृष्ण सांगतो. परंतु त्याला नक्की कुठे शोधायचे ते कळत नाही. हे जग म्हणजेच माया किंवा जडतत्व आहे. आणि परमात्मा चैतन्य आहे. हे दोन्ही एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की त्यांना वेगळे करणे किंवा जाणणे अशक्य वाटते. म्हणूनच काही प्रमुख उदाहरणे घेऊन श्रीकृष्ण स्पष्ट करतो की, पाण्याचा प्रवाही रस मी आहे. चंद्राची शीतल आणि सूर्याची तळपणारी प्रभासुद्धा मीच आहे. आकाशाचे ध्वनीतत्व, मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. पृथ्वीचा स्वभावतः शुद्ध सुगंध मीच आहे. अग्निमधील तेज मी आहे.
सर्व सजीवांमधले जीवतत्व, तपसव्यांचे तप धर्माला अनुसरून असणारा काम मीच आहे. बलवंतांमधील वासना आणि आसक्ती विरहित असे जे बल ते मीच आहे. या सर्व जीवसृष्टीत सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण कार्यरत असतात. ते माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत. या तीन गुणांमुळेच सृष्टीमध्ये एवढी विविधता निर्माण झाली आहे. अनंत रूपांनी, अनंत नामांनी, अनंत गुणांनी मी प्रगट होतो. प्रत्येक नाम-रूपाचे महत्त्व वेगळे आणि तितकेच मनोहर आहे.
परमात्म्याचे हे स्वरूप समजल्यानंतर असे वाटते की त्याला शोधणे किती सोपे आहे! फक्त ते पाहण्याची दृष्टी आपल्या ठिकाणी विकसित व्हायला हवी. सौंदर्याने पूर्ण नटलेली ही सृष्टी, एखादं छोटंसं सुगंधाची उधळण करणारे फूल किंवा दूरच दूर पसरलेली पाचूचा शेला पांघरलेली धरती, आकाशात अवतरणाऱ्या विविध रंगांच्या छटा, रौद्ररूपात कोसळणारे जलप्रपात, पावसाच्या धारांचं नृत्य, दृष्टी पोहचत नाही इतका दूरवर पसरलेला सागर, त्याची विशालता.
हिमाच्छादित असलेल्या पर्वतरांगा, त्यामधील भावणारी उत्तुंगता, खरंच सर्वच अद्भुत आणि अवर्णनीय असतं. त्यातून क्षणोक्षणी आपल्याला तोच परमात्मा भेटत असतो. भरभरून आनंद देत असतो. आपण मात्र फसव्या खोट्या कृत्रिम सुखाच्या मागे धावून हा निर्मळ आनंद गमावून बसतो. आणि दोष मात्र देवाला देतो.