Vaikuntha Chaturdashi: वैकुंठ चतुर्दशी व्रत केल्याने खरचं मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होतो का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaikuntha Chaturdashi

Vaikuntha Chaturdashi: वैकुंठ चतुर्दशी व्रत केल्याने खरचं मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होतो का?

हिंदू धर्मात वैकुंठ चतुर्दशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो  वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचीही पूजा केली जाते. शिवपुराणानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवाने भगवान विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी भक्तांनी भगवान विष्णूची 1000 कमळाचा फुलांनी पूजा केली तर त्याला वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते अशी मान्यता आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची आराधना केल्याने साधकाला वैकुंठधामची प्राप्ती होते आणि शिवाच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते. वाराणसीतील बहुतेक मंदिरे वैकुंठ चतुर्दशी साजरी करतात. वाराणसी व्यतिरिक्त वैकुंठ चतुर्दशी ऋषिकेश, गया आणि महाराष्ट्रात साजरी केली जाते.

कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. यंदा 6 आणि 7 नोव्हेम्बर रोजी ही तिथी विभागून आली आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी हरी आणि हर यांची पुढे दिल्याप्रमाणे उपासना करता येईल. 

मृत्यूनंतर नरकात जावे, असे कोणाला वाटेल? आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक!

वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते. आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. 

हेही वाचा: Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात 'ही' झाडे लावा, घरात राहिल सदैव पैसाच पैसा

वैकुंठ चतुर्दशीला काय करतात ?

या दिवशी कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. 

हेही वाचा: Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने बाजरीचा खिचडा कसा तयार करायचा?

देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता, आपसुक माता पार्वतीदेखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता, त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दु:ख, दारीद्र्य नाहीसे होऊन, आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठप्राप्तीचा आनंद अनुभवता येतो.

स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला, तो नरक!

वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली, तो नरक!

मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले, की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठीच चांगल्या कथा-कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते.