
Diwali Festival 2021 : सणांवेळी दारासमोर रांगोळी का काढतात? जाणून घ्या...
दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
दीपावलीच्या दिवसांमध्ये घरासमोर रांगोळी काढण्याची प्रथा आहे. रांगोळी रंगवली, रंगमाळी, रंगमाळा, रंगावली , रंगोली या नावांने ओळखली जाते, कर्नाटकात रांगोळीला ' रंगोली ' म्हणून संबोधतात. आंध्रप्रदेशात ' मुग्गुलू ' किंवा ' मुग्गु ' या नावाने ओळखतात. तामिळनाडूमध्ये रांगोळीला ' कोलम ' या नावाने रांगोळीला ओळखले जाते. केरळमध्ये रांगोळीला ' पुविडल ' असे म्हणतात. गुजरातमध्ये रांगोळीला ' साथिमा ' म्हणतात. सौराष्ट्रात रांगोळीला ' सथ्या ' म्हणतात. राजस्थानमध्ये रांगोळीला ' मांडणा ' म्हणतात. बंगालमध्ये रांगोळी ' अल्पना ' या नावाने ओळखली जाते. बिहारमध्ये ' अलिपना ' , उत्तर प्रदेशात ' सोनराखना ' आणि ओरिसामध्ये रांगोळी ' झुंटी' किंवा ' ओसा ' या नावाने ओळखली जाते.
विष्णुपुराणात लक्ष्मी-विष्णूच्या विवाहप्रसंगी शुभ चिन्हांच्या तसेच फुलांच्या रांगोळ्या काढल्याचा उल्लेख आहे. तुलसीरामायणातील बालकांडात " रंगवल्ली बहुविध काढल्या कुंजरमणिमय सहज शोधल्या " असे राम-सीता विवाहप्रसंगीच्या वर्णनात सांगितलेले आहे. मार्कंडेय पुराणात सडासंमार्जनानंतर रांगोळीने स्वस्तिकाकृती काढण्याचे महत्त्व वर्णन केलेले आहे. सातव्या शतकातील वरांगचरित यामध्ये पंचरंगी चूर्ण, धान्य आणि फुले यांनी रांगोळी काढण्याचे सांगितलेले आहे. शिशुपाल वधाच्या वर्णनात रांगोळीला ' रंगावळी ' असे म्हटले आहे. वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांमध्ये रांगोळी काढण्याच्या कलेचा अंतर्भाव आहे. इसवीसनाच्या तिसर्या शतकातील साहित्यात धान्याचा-फुलांची रांगोळी काढली असल्याचा उल्लेख आहे. पूर्वी सरस्वती, रामदेव आणि शिवमंदिरातही रांगोळीचा उल्लेख सापडतो.
रांगोळी ही सर्वत्र शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. जिथे रांगोळी आहे तिथे देवदेवतांचा निवास असतो असा समज आहे. रांगोळीमध्ये बिंदू, सरळ रेषा,अर्धवर्तुळ , वर्तुळ, गोपद्म , सर्प रेषा , कोयरी , स्वस्तिक, ॐ , केंद्रवर्धिनी, तुरा ,श्री, सरस्वती, कलश ,शंख, चक्र ,गदा , कमळ , ध्वज, धनुष्य ,बाण ,त्रिशूळ , त्रिदल , अष्टदल, शृंखला, श्रीफळ, विष्णुपाद, लक्ष्मीची पावले, दीप इत्यादी चित्रे काढून रांगोळी अधिक सुंदर आणि वैभवशाली केली जाते.